महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवभारत | शिवभारतकार कवींद्र परमानंदांची समाधी

By Discover Maharashtra Views: 2256 4 Min Read

शिवभारत | शिवभारतकार कवींद्र परमानंदांची समाधी –

‘शिवभारत’, शिवचरित्राच्या सर्वाधिक विश्वसनीय आणि समकालीन साधनांपैकी एक. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या नेवासाच्या कवींद्र परमानंदांनी ते लिहिले. इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर यांनी १९२७ मध्ये अतिशय कष्टाने ‘शिवभारता’ची हस्तलिखित प्रत तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातून मिळवून शिवभारत प्रकाशात आणले. ‘शिवभारत’ नसते तर सर्वाधिक देदीप्यमान असलेल्या शिवचरित्रातील कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत झाल्या नसत्या. कवींद्र परमानंदांनी आणि दिवेकरांनीही किती थोर कार्य करून ठेवले आहे.

शिवछत्रपतिंच्या पदरी जे काही मोजके कवी, पंडित, विद्वान होते; त्यात कवींद्र परमानंदांचे स्थान सर्वात वरचे होते. शिवचरित्राच्या इतिहासात त्यांचे अनेकदा उल्लेख आढळतात. महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाकडे जाताना जी काही मोजकी विश्वासू माणसे बरोबर घेतली होती त्यात परमानंद होते. आग्र्याला नजरकैदेत पडल्यावर महाराजांनी औरंगजेबाच्या परवानगीने आपली बरीचशी माणसं दक्षिणेकडे पाठवली त्यात परमानंदांनाही महाराजांनी सत्कारपूर्वक एक हत्ती, एक हत्तीण, एक घोडा, दोन उंट, हौद चढवलेली हत्तीण, चाळीस सैनिक, पालखी, एक हजार रुपये इत्यादी लवाजमा देऊन पाठवले. पुढे महाराज आग्र्याहून निसटल्यावर औरंगजेबाच्या आदेशाने दक्षिणेकडे जाणाऱ्या महाराजांच्या अनेक माणसांची धरपकड होऊ लागली. त्यात कवींद्र परमानंदानाही दौसा व हिंडौलाजवळ अशा दोन ठिकाणी दोनदा अटक झाली. नंतर सुटकाही झाली. आग्रा प्रकरणावरच्या राजस्थानी रेकॉर्ड्स मधील अनेक पत्रांत परमानंदांचे उल्लेख आहेत. परमानंदांनी काशीयात्रा केली. आपण शिवछत्रपतिंचे हे चरित्र काशीला धर्मसभेत काशीच्या ब्राह्मणांना सांगत आहोत असे परमानंदांनी ‘शिवभारता’च्या आरंभी लिहिलेले आहे.

शिवभारताचे मूळ नाव ‘अनुपुराण’. परमानंदांना हा त्यांचा ग्रंथ महाभारत, रामायणासारखा करायचा होता. पण त्यांना काही अज्ञात कारणाने शिवभारत पूर्ण लिहायला जमले नाही. शिवभारताच्या उपलब्ध असलेल्या प्रतींमध्ये ३१ अध्याय पूर्ण आणि ३२वा अध्याय अपूर्ण आहे. ३१ अध्यायांमध्ये एकूण २२५३ श्लोक आहेत तर बत्तीसाव्या अध्यायात फक्त नऊच श्लोक आहेत. असा शिवचरित्राचा इ.स. १६६१ पर्यंतचाच इतिहास शिवभारतात आहे. म्हणजे शिवभारत अपूर्ण आहे. पण जे आहे ते अतिशय बहुमोल आहे. परमानंदांचा मुलगा देवदत्त आणि नातू गोविंद हेही पुढे अनुक्रमे संभाजीराजे, राजारामराजे, ताराराणी यांच्या पदरी होते आणि या दोघांनीही असे लेखन केलेले आहे. ताराराणींवरचे ते सुप्रसिद्ध मराठी काव्य परमानंदांचा नातू गोविंद याचेच. शिवभारताविषयी अजून खूप काही सांगता येईल.

कवींद्र परमानंदांनी रायगड – प्रतापगड मार्गातल्या पोलादपूरला मठ स्थापन करून वास्तव्यास होते. मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंदने साठ माणसांनिशी पन्हाळा जिंकल्यावर महाराज अतिशय आनंदाने रायगडावरून पन्हाळ्याला यायला निघाले. त्यांची मिरवणूक पाचाड – महाड थांबून पोलादपूरला आली. पोलादपूरला त्यांनी परमानंदांची सादर भेट घेतली. तेव्हा परमानंदांच्या मठातील ब्राह्मणांनी महाराजांना त्यांच्यावरील काही गौरवपर श्लोक ऐकवले ते शिवभारतातील असावेत. शहाजीराजे, व्यंकोजीराजे यांच्या पदरी असलेल्या आणि तेव्हा महाराजांच्या सहवासात असलेल्या कवी जयराम पिंड्येने हे सगळे वर्णन ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’मध्ये लिहून ठेवले आहे. पोलादपूरचे संस्कृत नामकरण तो ‘पौलस्त्य नगर’ असे करतो. शिवभारताचे लेखन राज्याभिषेकापूर्वी झालेले आहे असे मानतात.

पोलादपूरला शिवभारतकार कवींद्र परमानंदांची समाधी आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे. खुद्द पोलादपूरच्या बहुतांश लोकांना माहीत नाहीये. समाधीच्या जागी आता सिमेंट, फरश्या वगैरे वापरून नवीन मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या आवारात काही प्रसिद्ध गडकिल्ल्यांच्या विटा, सिमेंट वापरून उत्तम अशा प्रतिकृती यंग ब्लड ऍडव्हेंचर नामक संस्थेने साकारल्या आहेत. त्या उघड्यावर असल्यामुळे आणि दुर्लक्षामुळे खराब होत चालल्या आहेत. एकूणच परमानंदाच्या समाधी मंदिराचा परिसर दुर्लक्षित आणि उपेक्षित आहे. या भागाचे मूळ नाव मठगल्ली हे आहे पण तेही विस्मृतीत गेले आहे. पोलादपूरमध्ये महाराजांचा पुतळा आहे तिथून प्रतापगडकडे जो रस्ता जातो त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या बाजारपेठेच्या मागे ही समाधी आहे. मी आत्ताच गुगल मॅपवर ऍक्युरेट लोकेशन टाकले आहे.

– प्रणव कुलकर्णी.

1 Comment