महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,383

कवी कलश

By Discover Maharashtra Views: 2243 10 Min Read

कवी कलश – एक व्यक्तिवेध –

पूर्वायुष्यात गंगाकिनारी बसून तिर्थोपाध्याय या नात्याने पळी-पंचपात्रीचा मधुर मंत्रघोष करणारा, भविष्यात मराठा साम्राज्यात महत्वाची पण विवादास्पद भूमिका गाजवणारा, ‘सर्व सिद्धीनां मुद्रा कलशहस्तगा ‘- वामाचाराच्या मार्गातून सर्व सिद्धी प्राप्त झालेला असा म्हणजे कवी कलश होय.

कवी कलश हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील तसेच आयुष्यातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. समकालीन साधनं, बखरी ज्याला वाईट ठरवतात तो आज प्रत्येक मराठी इतिहासप्रेमीच्या मनात आदराने वावरतो. आयुष्यभर ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पाऊले यशस्वीरीत्या उचलली त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या चेतनादायी उपस्थिती मुळे देदिप्यमान ठरला.

( टीप – इथे माझा हेतू कवी कलशाची आज जी प्रतिमा आहे तिला विरोध करण्यासाठी नाही तर त्याचे आयुष्य, त्याने घेतलेले निर्णय, त्याने प्रभाव पाडून घ्यायला लावलेले निर्णय हे सर्व एका सामान्य अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून ससंदर्भ मांडण्याचा आहे. वाचकाने लक्षात घ्यावे की छत्रपती संभाजी महाराजांना वाईट दाखवण्याचा आणि त्यांची हेतुपूर्वक किंवा नकळत नाचक्की करण्याचा माझा काही उद्देश नाही. कवी कलशाचे मराठ्यांच्या राजकारणामधील योगदान विश्लेषणासहित क्रमाने पुढे मांडत आहे.)

कवी कलश हा एक कान्यकुब्ज ब्राह्मण. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीदरम्यान हा मराठ्यांच्या संपर्कात आला असावा आणि पुढे महाराजांच्या सेवेत रुजू झाला.

इ.स. १६७६

शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयास निघाले तेव्हा त्यांनी संभाजी महाराज यांना शृंगारपुरास धाडले. यावेळी संभाजी महाराजांसोबत कवी कलशही होता. त्याने तिथे वामाचारी मार्गाने बरीच अनुष्ठाने केली.

मद्य मासं तथा मत्स्य मुद्रा मैथुनमेवच |

शक्तिपुजा विधावाद्ये पंचतत्व प्रकीर्तितम् ||

शाक्तपंथीय वामचारी मार्ग म्हणजे पंचतत्व विधीने म्हणजेच मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन या विधींनी देवीची पूजा करणे.

इ.स. १६७८

या साली छत्रपती संभाजी महाराजांनी कलशाभिषेक करवून घेतला तेव्हासुद्धा कवी कलश तिथे होता.

इ.स. १६८०

अ) छत्रपती शिवाजी महाराजांचे अकस्मात निधन.

अनुपुराणाच्या मते शिवाजी महाराजांचे निधन, संभाजी महाराजांचे राज्यारोहण वगैरे घटना कवी कलशाला आधीपासूनच माहीत होत्या.

ब) संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाल्यानंतर त्यांनी बाकरे शास्त्रींना एक दानपत्र पाठवलं आहे. त्यात कलशाचा उल्लेख “कवी कलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यात लाली आली आहे” असा येतो.

– यावरून हे दिसून येतं की शृंगारपुरापासून कलश मराठी राजकारणात शिरला व संभाजी महाराजांच्या मंचकारोहणापर्यन्त त्याने पूर्णपणे त्यांचा विश्वास कमवला होता.

इ.स. १६८१

अ) छंदोगामात्य

राज्याभिषेकावेळी संभाजी महाराजांच्या प्रधान मंडळात छंदोगामात्य हे पद कवी कलश यांस देण्यात आले.

ब) संभाजी महाराजांविरुद्धचा कट.

संभाजी महाराजांच्या विरुद्ध पहिला कट हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच मे १६८० मध्ये झाला. यात मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी व राहुजी सोमनाथ हे प्रमुख सूत्रधार होते. या सर्वांना अटक करण्यात आली. परंतु संभाजी महाराजांनी उदार अंतःकरणाने सर्वांना सोडून दिले आणि पुन्हा सेवेत रुजू करून घेतले.

पुढे संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला व बुऱ्हाणपूर, मलकापूर वगैरे त्यांच्या प्रमुख शहरांवर हल्ले करून तेथून प्रचंड लूट आणली.

दरम्यान कलशाचे प्रस्थ दरबारात वाढत होते. औरंगजेबाचा मुलगा अकबर आणि दुर्गादास राठोड हे मराठ्यांच्या आश्रयाला पाली इथे आले.

इथे असे सांगितले जाते की, अकबराला अण्णाजी दत्तोने कटासंबंधीचं पत्र पाठवलं होतं ते त्याने दुर्गादास राठोडाच्या सल्ल्यावरून संभाजी महाराजांपर्यंत पोचवले.  यावरून संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद, सोमाजी दत्तो, शामजी नाईक पुंडे वगैरेंना पकडले आणि शिरच्छेद, कडेलोट, हत्तीच्या पायी वगैरे शिक्षा दिल्या.

– मुळात या कटासंबंधी निकोलाय मनूची आणि पंतप्रतिनिधी बखर सोडल्यास कोणत्याही ऐतिहासिक आणि समकालीन साधनांमध्ये कुठेही, काहीही उल्लेख येत नाही. किंवा ते पत्र जे अण्णाजी दत्तोने अकबराला पाठवलेलं, ते ही मिळत नाही.

अ) निकोलाय मनूची ने अनेक खोटी विधाने त्याच्या पुस्तकात केली आहेत. संभाजी महाराजांना शिव्या घातल्या आहेत. ‘संभाजीस जे जय मिळाले ते त्याच्या शौर्यामुळे नाही तर त्याच्या सेनाधिकाऱ्यांमुळे मिळाले’ असे तो म्हणतो. कटात सामील असलेल्या मंत्र्यांनी अकबराशी संधान साधून कट रचला ही गोष्ट त्याने औरंगजेबाला सांगितली असे तो म्हणतो. पण औरंगजेबाच्या कोणत्याही पत्रात, अखबरात या गोष्टीचा उल्लेख येत नाही. समकालीन मुघल इतिहासकार साकी मुस्तैदखान किंवा खाफिखान सुद्धा या गोष्टीचा उल्लेख करत नाही. त्यामुळे निकोलाय मनूची खोटे लिहीत होता हे यावरून सिद्ध होते.

ब) पंतप्रतिनिधी बखर ही १८४४ सालची आहे. म्हणजे या घटनेच्या जवळजवळ दीडशे वर्ष नंतर. त्यामुळे ही बखर नक्कीच विश्वासार्ह नाही.

यावरून हा असा कट खरंच मंत्र्यांनी रचला होता हे कसे मानायचे?

मंत्र्यांच्या शिक्षेसंबंधी काही महत्वाच्या साधनांत आलेल्या नोंदी –

अ) जेधे शकावली

” भाद्रपद मासी संभाजी राजे याणी कवीकलशाच्या बोलेमागुती अण्णाजी दत्तो सचिव यांजवर ईतराजी करन मार दिल्हा त्या माराने राजश्री अनाजी पंडित व बाळ प्रभु व सोमाजी दत्तो व हिराजी फर्जंद परळी खाले कैद करून मारिले कर्णाटकांत शामजी नाईक यास कइद करविले.”

ब) शाहू महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांचे वंशज जिवाजी खंडेराव यांना पाठवलेल्या पत्रामध्ये ते लिहतात,

” थोरले महाराज कैलासवासी जहालेयावर कैलासवासी तीर्थरूप स्वामी यांणी कोणी गैरवाका समजाविल्यावर राज्यभर सरकारकुन यासि शिक्षा केल्या.”

इथे,

– थोरले महाराज म्हणजे शिवाजी महाराज

– तीर्थरूप स्वामी म्हणजे संभाजी महाराज

– गैरवाका म्हणजे खोटी हकीकत सांगणे, A false statement. (म्हणजेच शाहू महाराज इथे सांगतायत की कोणी खोटं सांगितल्यावर(पटवून दिल्यावर) संभाजी महाराजांनी शिक्षा दिल्या.

क) संभाजी महाराजांचा समकालीन फ्रा. मार्टिन याने डिसेंम्बर १६८१ साली त्याच्या दैनंदिनीत नोंद केली आहे की,

” संभाजी महाराजांनी ब्राह्मणांचा छळ चालू ठेवला. त्यांना पदच्युत करून त्याचे जागी त्याच्या भावास तुरुंगातून मुक्त करून त्याचे जागी बसविणार असल्याचे कोणी सांगितलेवरून त्याने १४ लोकांना ठार केले.”

या तिन्ही संदर्भांवरून हेच सिद्ध होते की कवी कलशाने अतिशय धुर्तपणे स्वतःच्या वाटेत येणाऱ्या सर्व मंत्रांना अलगदपणे दूर केले.

(याबद्दल अजून एक सांगायचे की पुढे दुसऱ्या शिवाजी राजेंचे अण्णाजी दत्तोच्या मुलाला पत्र आहे. त्याचा सारांश असा की थोरल्या शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तोला संगमेश्वरचे गावकुलकर्णीचे वतन दिले होते जे संभाजी महाराजांच्या काळात कटामुळे बंद पडले ते दुसऱ्या शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तोच्या मुलाला राघो अण्णाजीला पुन्हा परत केले. जर अण्णाजी दत्तो वगैरेंनी खरंच स्वराज्याशी फितुरी केली असती तर छत्रपतींनी वतन पुन्हा चालू का केलं असतं?)

इ.स. १६८३

अ) संभाजी महाराजांनी कवी कलशास कुलअखत्यारी दिली. त्याच्याकडे सर्व कारभाराचे अध्यक्षपद आले.

ब) संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचंड विजय मिळविला आणि त्यांनी कवी कलश आणि अकबर यांस पोर्तुगीजांशी तह करण्यासाठी मागे ठेवले. कलशाने अतिशय वेळ घालवला आणि शेवटी तह असा काही झालाच नाही.

इ.स.१६८४

मानाजी मोरे, राहुजी सोमनाथ, गंगाधर जनार्दन हणमंते, वासुदेव जनार्दन हणमंते यांस कटात सामील म्हणून अटक करण्यात आली.

– या कटासंबंधीही समकालीन साधनात कुठेही काहीच सापडत नाही. वरील १६८१ चं प्रकरण बघता हे ही कलशाच्याच बोलेमागुती झाले असावे. कारण राजाराम महाराज आणि येसूबाईंनी संभाजी महाराज्यांच्या कैदेनंतर या सर्वांना १२ फेब्रुवारी १६८९ रोजी लगेच मुक्त केले.

इ.स.१६८५

मानाजी मोरे वगैरेंच्या अटकेनंतर ३ महिन्यातच अकबराचे संभाजी महाराजांना खालील आशयाचे पत्र

” मोगल उतरून आले तेव्हा कवी कलश यांनी झुंज दिली हे महमूदखान आणि खिदमत फरस्तखान यांच्या लिहिण्यावरून कळले. कवी कलश हा आपला उत्कृष्ठ एकनिष्ठ सेवक आहे. कुणाच्या मत्सराने त्याचा नाश होईल असे परमेश्वर न करो. कवि कलशावर आपली कृपा रहावी व आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय.”

इ.स.१६८८

अ) शिर्के स्वारी

“शके १६१० कार्तिक मासी कवि कलश याजवरी सिरके पारखे झाले. कलश पळोन खिळणीयावर गेला. ”

यानंतर कलशाच्या मदतीला रायगडावरून संभाजी महाराज आले आणि त्यांनी शिर्केंचा पराभव केला.

ब) प्रल्हाद निराजी

शिर्के बंडाच्या वेळी प्रल्हाद निराजी पन्हाळ्यावर होता. न्यायाधीश म्हणून संभाजी महाराजांनी सोपविलेल्या एका तक्रारींचेच निवारण करीत होता. इथेही

” संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रल्हादपंत व सरकारकून व कित्येक लोकांस धरिले.”

—————————————–

ही वरची यादी म्हणजे १६७६ पासून १६८८ पर्यंत कवी कलश सामील असलेल्या काही महत्वाच्या घटना. बारकाईने बघितलं तर प्रत्येक घटनेत कवी कलश संशयास्पद आढळतो. यावरून कलशासंबंधी काही प्रश्न पडू शकतात ते असे,

१. कवी कलश खरंच संभाजी महाराजांचा, स्वराज्याचा हितचिंतक होता  का?

२. कवी कलश औरंगजेबाला फितूर होता का?

कवी कलश कितीही दुराचारी असला तरी तो संभाजी महाराजांशी प्रामाणिक होता. संभाजी महाराजांवर त्याची भक्ती निरपवाद होती हे बहादूरगडातील बादशहाच्या छावणीतील त्याच्या वर्तनातून दिसून येते.

पण तो स्वराज्याचा हितचिंतक नक्कीच नव्हता. तो राजकारणी होता आणि पाताळयंत्रीही होता. त्याच्याकडे प्रशासकीय गुण मुळीच नव्हते. उलट स्वतःच्या(किंवा इतरांच्या?) स्वार्थासाठी त्याने स्वराज्याला एकनिष्ठ असलेल्या कित्येकांना दुखावले. सभासदानेही बखरीत वर्तविलेल्या भविष्यनिदानांत “लहान माणसे गुलाम यांचा पगडा पडेल” असे म्हटले होते.

कवी कलश फितूर –

कोणी कितीही नाकारलं तरी कलशाचा मराठी इतिहासातील वावर संशयास्पद आहे. समकालीन मराठी साधने उगाच त्यास वाईट संबोधत नाहीत. ईश्वरदास नागर त्याला औरंगजेबाचा हेरच म्हणतो. कलश फितूर नव्हता म्हणणारे. “फितूर होता तर मग औरंगजेबाने का मारलं?” असा प्रश्न करतात. यासाठी त्यांनी स्वतः औरंगजेबाकडे बघायला हवं. जो स्वतःच्या भावांना मारू शकतो, बापाचे हाल करू शकतो, सरदारांना मारू शकतो त्यासमोर कलश काय चीज आहे!

शेवटी काय तर कवी कलश हा राजाचा प्रिय होता पण जनतेला अप्रिय होता. जनतेला किती अप्रिय होता हे त्याच्या हत्येनंतर त्याच्या बायका-मुलाच्या झालेल्या हालावरून दिसून येतं. असे २ परस्पर विरोधी जीवनक्रम उपभोगण्याचा मान आयुष्यात फारच थोड्या लोकांना मिळत असतो. कवी कलश हा असाच दुर्मिळ लोकांपैकी एक होता.

फोटो – राघो अण्णाजी वतन पत्र.

संदर्भ –
1.जेधे शकावली.
2.सभासद बखर.
3.ज्वलज्वलनतेजस संभाजीराजे – डॉ. सदाशिव शिवदे.
4.शिवपुत्र संभाजी – डॉ कमल गोखले.
5.ताराबाईकालीन कागदपत्रे खंड पहिला – अप्पासाहेब पवार.
6.मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा.
7.छत्रपती संभाजी एक चिकित्सा – जयसिंगराव पवार.

©ओंकार ताम्हनकर.

Leave a comment