अविमुक्त क्षेत्र काशी आणि मुस्लिम शासक, गागाभट्ट व मराठे

अविमुक्त क्षेत्र काशी आणि मुस्लिम शासक, गागाभट्ट व मराठे

अविमुक्त क्षेत्र काशी आणि मुस्लिम शासक, गागाभट्ट व मराठे –

प्राचीन काळापासून हिंदूंच्या सर्वोच्च श्रद्धेचं स्थान आणि हिंदूधर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक राजधानीचं स्थान म्हणून काशीक्षेत्र विख्यात आहे. आपल्या पापांची शुद्धी होण्याचे आणि मोक्ष मिळण्याचे क्षेत्र आणि महातीर्थ म्हणून काशीक्षेत्राला प्रत्येक आस्तिक हिंदू ओळखतो. पापमुक्तीचे स्थान म्हणून जसे काशीक्षेत्र हिंदूंमध्ये विख्यात आहे, तसेच काशीक्षेत्राची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे, काशीचा विश्वनाथ ! सश्रद्ध हिंदूंचे मस्तक ज्याचे नाव ऐकताच नमन करते आणि अबालवृद्धांपासून ते आस्तिक आणि नास्तिकांपर्यंत तसेच भारतात आणि भारताबाहेर ज्याच्यामुळे काशीक्षेत्र बहूविख्यात झाले, तो हा काशीचा विश्वनाथ अथवा विश्वेश्वर महादेव ! (अविमुक्त क्षेत्र काशी)

भगवान विश्वेश्वर महादेवाचे हे काशीक्षेत्र विविध साहित्यात विविध नावांनी  उल्लेखलेले आहे. काश्रृ दीप्तौ म्हणजे स्वतेजाने प्रकाशणारी, ह्या संस्कृत धातुपासून काशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. परमेश्वर येथे साक्षात प्रकाशमान असतो, म्हणून यास काशी म्हणतात, असे काशीखंड सांगते. काशीचे दुसरे नाव म्हणजे बनारस हा वाराणसीचा अपभ्रंश असल्याचे काशीखंड सांगते. वरूणा व असि ह्या नद्यांमधील प्रदेशास वरूणाअसि किंवा वाराणसी म्हणतात, असा उगम वायुपुराणामध्ये दिलेला आहे. भगवान शंकर काशीस कधीही सोडून जात नाही, म्हणून काशीखंडाने ह्यास अविमुक्त क्षेत्रसुद्धा म्हटलेले आहे. रुद्राचा वास असलेलं हे ‘रुद्रावास’, महाश्मशान, आनंदवन अश्या विविध नावांनी ह्या क्षेत्रास काशीखंडाने वाखाणलेलं आहे.  श्रीमच्छङ्कराचार्य ‘काशी सर्वप्रकाशिका’ असं ह्या क्षेत्राचं वर्णन करतात.

अश्या ह्या सर्वप्रकाशिका काशीत वास करणारा विश्वनाथ, हा प्रत्येक आस्तिक हिंदूंस पूजनीय आणि वंदनीय आहे. आपल्या देवघरातील महादेवाची पूजा करतांना  प्रत्येक हिंदू जणू आपण त्या काशी विश्वनाथाची पूजा करीत आहोत, असे मानतो.  अश्या ह्या विश्वनाथाचे काशीचे मंदिर मुसलमानी परकीय आक्रमकांचे आक्रमण सहन करीत होते. आणि एके दिवशी तर त्याचे अस्तित्वच संपले.

इ.स.११९४, काशीवर गाहडवालवंशीय राजांचे राज्य होते. इ.स. ११९४ मध्ये  कुतुबुद्दीन ऐबकाने वाराणसी किंवा काशी जिंकून मंदिरांना नेस्तनाबूत करण्याचा हुकूम दिला.  कुतुबुद्दीन ऐबकाच्या ह्या हुकुमानुसार काशीतील १००० मंदिरं पाडली गेली.   ह्याच १००० मंदिरात विश्वनाथाचं मंदिरही असावं. पुढे इ.स. १२१२ मध्ये बंगालच्या सेनावंशीय राजा विश्वरूपाने हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित साधनं आणि वेळेच्या अभावामुळे मंदिराचं बांधकाम त्याला शक्य झालं नसावं.  पुढे अलाउद्दीन खिलजीनेही काशीवर आक्रमण करून तेथील मंदिरे पाडली आणि त्यावर मशिदी उभारल्या. अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर काशीतील काही मंदिरे दुसऱ्या जागी पुन्हा बांधण्यात आली.  हाच परिपाठ सिकंदर लोदीनेही सुरू ठेवला. त्याने मंदिरं पाडण्याचा हुकूम दिल्यापासून पुढील ८० वर्षं कोणतेही मंदिर काशीत बांधले नाही.(अविमुक्त क्षेत्र काशी)

इ.स. १५८५ च्या सुमारास एका प्रकांड पंडिताने विश्वनाथाचे मंदिर बांधले. त्या प्रकांड पंडिताचे पूर्वज  रामेश्वर भट्ट कधीकाळी पैठणास राहात असत. पुढे ते काशीस गेले व तेथे कायमचे स्थायिक झाले. त्यांचा पुत्र नारायण भट्ट, अत्यंत विद्वान आणि ज्ञानी म्हणून त्यांची कीर्ती होती. अनेकांशी केलेल्या शास्त्रार्थात ते विजयी झालेले होते.  ह्याच नारायण भट्टांनी इ.स. १५८५ मध्ये विश्वनाथाचं मंदिर बांधलं. ह्या कार्यासाठी तोडरमलाचं अर्थसहाय्य असावं.  नारायण भट्टांना दोन पुत्र होते, जेष्ठ रामकृष्ण भट्ट तर शंकरभट्ट कनिष्ठ. शंकरभट्टांना कवींद्र चंद्रोदय ह्या ग्रंथात  बनारसमधील मुख्य पंडित म्हटलेलं आहे. उभय बंधूंच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. रामकृष्ण भट्टांना तीन पुत्र- दिनकर/ दिवाकर भट्ट, कमलाकर भट्ट आणि लक्ष्मण भट्ट . ह्यापैकी दिनकर किंवा दिवाकरभट्टांचा पुत्र विरेश्वर उर्फ गागाभट्ट. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीक्षेत्राहून महाराष्ट्रात येणारे हेच ते गागाभट्ट ! गागाभट्टांच्या पणजोबांनी काशीक्षेत्रात विश्वनाथाची पुर्नस्थापना केली. ३ सप्टेंबर १६३२ रोजी ब्रिटिश प्रवासी पिटर मंडी वाराणसीत आला. त्याने आपल्या रोजनिशीत विश्वनाथाचे वर्णन केलेले आहे. विश्वनाथाच्या मंदिराप्रमाणेच त्याने तेथील इतर मंदिरेही पाहिली. त्यात गणेश, देवी इ.चा उल्लेख करतो. मंडीने आपल्या रोजनिशीत विश्वनाथाचं चित्रही  दिलेलं आहे.

पुढे इ. स. १६५८ साली औरंगजेब गादीवर आला. पुढच्याच वर्षी त्याची काशीवर नजर पडली आणि कृत्तीवासेश्वराचे मंदिर पाडून त्याने आलमगीर मशीद बांधली.  त्यानंतर १६६९ साली तर त्याने हिंदूंच्या मूळ श्रद्धेवरच घाव घातला.  दि. ८ एप्रिल १६६९ रोजी त्याने वाराणसीचे मंदिरे व शाळा पाडून टाकण्याचा हुकूम दिला.  दुसऱ्याच दिवशी त्याचा चांद्रवर्षानुसार ५३ वा वाढदिवस होता. त्याच्या एक दिवस आधी औरंगजेबाने हा हुकूम दिला आणि २ सप्टेंबर च्या सुमारास काशी विश्वनाथाचे देऊळ पाडून टाकण्यात आल्याची बातमी त्याला मिळाली.  तेथे त्याने मशीद बांधली. ज्ञानवापी मंदिर आता ज्ञानवापी मशीद म्हणून ओळखले जाऊ लागले. औरंगजेब फक्त मंदिर पाडून आणि मशीद बांधून शांत झाला नाही, तर त्याने वाराणसीचं नाव बदलवून महंमदाबाद ठेवलं. पण ते रूढ करण्यात त्याला यश आलं नाही.

इ. स. १७४२ साली नानासाहेब पेशवे बंगालच्या स्वारीवर जात असतांना काशी घेण्याच्या उद्देशाने त्यांनी मिर्झापुरात तळ दिला. मल्हारराव होळकरांना काशीवर पाठविले. तेथे ज्ञानवापी मशीद पाडून मंदिर बांधण्याचा मनसूबा तेथील पंडितांना सांगितला. पण ब्राह्मणांनी नारायण दीक्षितांच्या नेतृत्वात नांनासाहेबांना मशीद न पाडण्याची विनंती केली. कारण ‘जर मशीद पाडली  तर, आयोध्येचा नवाब आम्हास त्रास देईल, तशी त्याने धमकी दिलेली आहे’, असे पंडितांनी पेशव्यांस कथन केले. त्यामुळे हा मनसुबा तसाच राहिला.   पुढे महादजी शिंद्यांनी मराठ्यांचा विजयध्वज दिल्लीवर फडकविला.

नाना फडणीसांनी मथुरा,वृंदावन त्याच बरोबर काशीच्या विश्वनाथाचे मंदिरही ताब्यात घेण्याचा पाटीलबावांना तगादा लावला. त्यावर भिकाजी नारायण, शिंदेंच्या फौजेतून मथुरेहून लिहितो,  “त्यास अलीकडे पातशाईत कोणी काय समजावून मसीद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन, पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे हिंदूधर्मास योग्य आहे.’ पुढे इ.स. १७८५ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी विश्वनाथाचं मंदिर ज्ञानवापीच्या जवळच बांधलं. काशीचा विश्वनाथ पुन्हा अधिष्ठित झाला. पण आमचं मूळ मंदिर मुक्त करण्याचं स्वप्न नानाविध कारणांमुळे पूर्ण होऊ शकले नाही. लक्षावधी हिंदू सुमारे साडे ३०० वर्षांपासून विश्वनाथाला मुळ मंदिरात भेटण्याच्या इच्छेने जगत आहेत. स्वतः नंदी आपल्या नाथाच्या दर्शनाची व्याकुळतेने वाट बघत आहे.

©अनिकेत वाणी

संदर्भ-

१) काशी का इतिहास – डॉ.मोतीचंद्र
२) Flight of Deities and Rebirth of Temple – मीनाक्षी जैन
३)काशी – डॉ. अनंत सदाशिव अळतेकर
४) Catalogue of the Sanskrit Manuscript in     Library of Indian Office – Part 1
५) Varanasi Down the Ages – Kuber Nath Sukul
६) मासिरे आलमगीरी – रोहित सहस्त्रबुध्दे
७) इतिहास संग्रह – द.ब.पारसनीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here