महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,711

कर्नाळा पक्षी अभयारण्य

By Discover Maharashtra Views: 3924 16 Min Read

कर्नाळा पक्षी अभयारण्य…

रायगड जिल्ह्यतील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे.  हे अभयारण्य पाताळगंगेच्या खोर्‍यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे.  याचे भौगोलिक स्थान १८० ५४’ ३१” उत्तर व ७३० ६’ ९” पूर्व या अक्षांश रेखांशावर असून हे माथेरान व कर्जत या ठिकाणांपासून सुध्दा जवळ आहे.  मुंबईपासून ६० किमी.वर आहे.  याचा एकूण विस्तार ४.४६ चौ.किमी. आहे. महाराष्ट्र शासनाने १९६८ मध्ये यास पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.  अभयारण्यातील कर्नाळा किल्ला अकराव्या शतकातील आहे. या किल्ल्याला अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे. हा सुळका गिर्यारोहकांचे आवडते स्थान आहे. या अभयारण्यात दमट मिश्र पानझडी वने व सदाहरित नदीकाठची वने अशी दोन्ही प्रकारची वने आढळतात.

कर्नाळा अभयारण्य परिसरात पक्ष्यांच्या सुमारे १५० स्थानिक व सुमारे ३७ स्थलांतरित  प्रजाती आढळून येतात. येथे कोतवाल, हळदी, टकाचोर, लिफबर्ड (Chloropseidae), छोटा सूर्यपक्षी, राखाडी धनेश, मोर, चातक, साळुंकी, सातभाई, हरियाल (हिरवे कबूतर) मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट,पांढर्‍या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, बहिरी ससाणा, शहाबाज,  इत्यादी वर्षभर दिसणारे सर्वसामान्य पक्षी असून वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांमध्ये स्वर्गीय नर्तक (Terpsiphone paradisi), भृंगराज कोतवाल (Dicrurus paradiseus), गोमेट (Pericrocotus cinnamomeus), पर्वतकस्तुर (Thrush) शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, राखी कपाळाची हारोळी, नारंगी डोक्याचा कस्तूर, टिकेलचा निळा माशीमार, बाकचोच सातभाई, निलगिरी रानपारवा, पाचू होला, निलांग माशीमार, लाल छातीचा माशीमार, राखी डोक्याची पिवळी माशीमार, रान धोबी, पांढºया गालाचा कुटुरगा, कोतवाल, जाड चोचीचा फुलटोच्या, टोई पोपट, राखी कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, करडा धोबी, भांगपाडी मैना, दयाळ, हुदहुद, ठिपकेवाला पिंगळा, पांढऱ्या भुवईचा धोबी, पट्टेदार कोकीळ, शिक्रा, मलबार शिळ कस्तूर, जांभळा शिंजीर, तांबट छोटा सोनपाठी सुतार, तिबोटी धिवर, सामान्य धिवर, शिंपी, शामा, सामान्य खरुची, तुरेवाला सर्पगरुड, पिंगट पोटाचा सातभाई, जंगली मैना, पांढऱ्या छातीचा धिवर, पिवळी रामगंगा, नील कस्तूर, भारतीय नील दयाळ, राखी वटवट्या, चिमण चंडोल, काळटोप कस्तूर, सुभग, डोमकावळा, भारतीय राखी धनेश, तांबूस सुतार, ठिपकेवाला सातभाई, पांढऱ्या ठिपक्यांची नाचण यांचा उल्लेख करता येईल. समुद्री घार, ससाणा, घुबड हे येथील शिकारी पक्षी आहेत. तसेच येथे हिवाळ्यामध्ये स्थलांतरीत पक्षी देखील पहावयास मिळतात.  येथील स्थलांतरीत पक्षी मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सैबेरियातून येथे येतात.

विभिन्न पक्ष्यांबरोबरच रानडुक्कर, ससे, माकडे, रानमांजर, भेकर, कोल्हा, मुंगूस, साळींदर, वानरांच्या काही जाती व क्वचित एखादा बिबट्या या अभयारण्यात आढळतात. वेगवेगळ्या जातींचे विषारी व बिनविषारी सर्प, सरडे देखील येथे सापडतात.

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे, तर दऱ्याखोऱ्यातील नाल्यालगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरित नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत.

अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात.  कर्नाळा अभयारण्यात कोशिंब (Schleichera oleosa), किंजल (Terminalia paniculata), कळंब (Neolamarckia cadamba), जांब (Syzygium jambos), अळू (Colocasia esculenta), अंबा (Mangifera indica), पुत्रंजिवा (Putranjiva roxburghii), जांभूळ (Eugenia jambolana), उंबर (Ficus racemosa), सुरंगी (Mammea suriga), लोखंडी (Maytenus rothiana), कारपा आणि अंजनी (Memecylon umballatum) इत्यादी वृक्षसंपदा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी वनखात्याने झाडांवर त्यांच्या प्रजातींची नावेही लिहिली आहेत. याशिवाय येथे विविध प्रकारच्या औषधी व दुर्मिळ वनस्पती देखील आहेत.

येथील कमाल व किमान तपमान १६० ते ३३० से. इतके आहे. नसर्गप्रेमी व अभ्यासक यांसाठी जंगलात जाण्यासाठी चार पायवाटा आहेत. या वाटा सुरक्षित असल्या तरी दाट जंगलामध्ये जाणाऱ्या वाटांसाठी वाटाड्याला सोबत नेणे योग्य ठरते. हे अभयारण्य मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या इतक्या जवळ असल्यामुळे येथील जीवसंपदेला पर्यटकांचा नेहमी उपद्रव होत राहतो. पर्यटकांनी टाकलेल्या अन्नपदार्थांमुळे येथे डोमकावळ्यांची (Corvus macrorhynchos) संख्या वाढत आहे. ते इतर पक्षांना पळवून लावत असल्यामुळे येथील पक्षीजीवन धोक्यात आले आहे. निसर्गसंवर्धनाबाबत जागृती व्हावी या हेतूने येथे निसर्ग परिचय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

कर्नाळा हे मुंबईकरांसाठी खूप सोईचे ठिकाण. धकाधकीच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी मुंबईकरांच्या मनाला आनंद देऊन जातात, त्यात या कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. भल्या पहाटे निघाले तर एका दिवसाच्या भटकंतीमध्ये या अभयारण्य भ्रमंतीचा आनंद घेता येतो. मुंबईप्रमाणे हे अभयारण्य सतत पक्ष्यांच्या किलबिलाटानं जागं असल्याचं लक्षात येतं.

पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओहळ इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच मोहक दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. जंगल भटकंतीचे रंजक मार्ग आपल्याला इथे सांगितले जातात. जसे की हरियाल निसर्ग मार्ग हा जवळचा, सोपा मार्ग असला तरी पक्ष्यांच्या मोहमयी दुनियेचं विस्मयकारक दर्शन घडवून आणतो. लांबवर चालत जाऊन ज्यांना रानवाटांचा अधिक आनंद लुटायचा आहे, त्यांनी मोरटाक मार्गानं जावं. तो सरळ अभयारण्यातून ६ कि.मी लांबवर जातो. वेगवेगळ्या रंगांची भरपूर फुलपाखरं आपण इथं पाहू शकतो.

राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत.

कर्नाळा अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या काही पक्षांबद्दल :-

१) कोतवाल :

कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात.  हे पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.  कोतवाल पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो तसेच ईराणसह, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.  हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात.  कोतवाल (पक्षी) मुख्यत्वे कीटभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात.

२) हरियाल :

हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी जवळ जवळ दुर्मिळ होत आहे. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’.  पाचू-कवडा नावाचे जे कबूतर आहे त्याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात.  गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीच्या झाडांवर अढळतात. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. पक्षीनिरीक्षणांच्या वेळी हरियाल सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसल्याच्या नोंदी सापडतात.  मार्च ते जून या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात.  हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो.

३) लिफबर्ड किंवा पत्रगुप्त पक्षी (Chloropseidae) :

लिफबर्ड याला पत्रगुप्त, सोनकपाळी पर्णपक्षी, हरेवा किंवा हिरवा बुलबुल असे सुध्दा म्हणतात. हा साधारण १९ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नराचा मुख्य रंग गवतासारखा हिरवा असून माथा सोनेरी रंगाचा, हनुवटी आणि गळ्याचा भाग जांभळ्या आणि काळ्या अशा दोन उठावदार रंगाचे असतात. मादी नरासारखीच असते फक्त रंग फिकट असतात.  लिफबर्ड घनदाट जंगलात तसेच शेती जवळच्या दाट झाडांमध्ये राहणे पसंत करतो. तो एक उत्तम नकलाकार आहे, बुलबुल, कोतवाल, दयाळ या स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचेही हुबेहुब आवाज हरेवा काढतो.  फुलातील मध, फळे, कीटक आणि कोळी हे हरेवाचे खाद्य आहे. मे ते ऑगस्ट हा लिफबर्डचा वीणीचा काळ असून त्याचे घरटे उथळ, गवत, काटक्या, झाडाची कोवळी मूळे वापरून बनविलेले, उंच झाडावर, व्यवस्थीत लपविलेले असते. मादी एकावेळी सहसा २ अंडी देते.  लिफबर्ड हा समुद्र सपाटीपासून सुमारे २००० मी. उंच डोंगराळ भागापर्यंत भारतभर आढळणारा पक्षी असून बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशातही हरेवा आढळतो.

४) हळदी :

या पक्ष्याची पीलक, कांचन व सुवर्ण मंजू ही देखील नावे आहेत. याच्या सुमारे ३० जाती यूरोप, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांत आढळून येतात. भारतात आढळणाऱ्या हळदी पक्ष्याचे शास्त्रीय नाव ओ. कुंडू असे आहे. तो आसाम वगळता भारतात सर्वत्र आणि हिमालयात समुद्रसपाटीपासून सुमारे १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळतो.  हळदी पक्ष्याचा आकार साळुंकी एवढा असतो. नराच्या शरीराचा रंग सोनेरी पिवळा असून पंखांचा बराच भाग व शेपटीचा मधला भाग काळा असतो. नराच्या शरीराचा ज्या ठिकाणी पिवळा रंग असतो त्या ठिकाणी मादीचा हिरवट-पिवळा आणि ज्या ठिकाणी काळा असतो त्या ठिकाणी तपकिरी रंग असतो. डोळे किरमिजी चोच गुलाबी असते.  पाय काळसर रंगाचे असतात.  तो वड, पिंपळ, उंबर आणि इतर झाडांची फळे व किडे खातो. तसेच फुलातील मध देखील पितो.  याची घरट्याची वीण एप्रिलपासून जुलैपर्यंत असते.  मादी घरट्यात ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यांवर काळ्या रंगाचे लहानलहान ठिपके असतात.  कोतवाल पक्षी ज्या झाडावर घरटे बांधतो, त्याच झाडावर हळदी पक्षी पुष्कळदा घरटे बांधतो. त्यामुळे त्यांना आपोआपच कोतवाल पक्ष्याकडून संरक्षण मिळते.

५) राखाडी धनेश किंवा धनचिडी :

जवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा धनचिडी ,राखाडी धनेश किंवा राखी शिंगचोचा हा २४ इंच आकारमानाचा पक्षी आहे. म्हणजे याचा आकार साधारणपणे घरीएवढा असतो. याचा मुख्य रंग राखाडी असून चोच काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार असते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असते. सर्व वेळ झाडावरच घालवणारा हा पक्षी वड, पिंपळ अशा वृक्षांवर राहणे आणि त्या झाडांची फळे खाणे, मोठे किडे, पाली, सरडे, उंदीर, क्वचित प्रसंगी लहान पक्षी खाणे पसंत करतो. याला इंग्रजीमध्ये Hornbill म्हणतात. हा आफ्रिका, आशिया व मेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारा पक्षी आहे.  धनचिडीचा अंडी देण्याचा काळसुध्दा मार्च ते जून महिने असा असून त्याचे घरटे झाडाच्या ढोलीत असते. घरटी मोठ्या झाडांच्या ढोलीत बांधली जातात. धनेशची मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते.  धनचिडीच्या चोचीवर शिंगासारखे जाड आवरण असल्यामुळे त्याला शिंगचोचा असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये या पक्षाला इंडियन ग्रे हॉर्नबिल असे म्हणतात.

६) सातभाई :

सातभाई या पक्षाला इंग्रजीमध्ये लार्ज ग्रे बॅबलर असे नाव आहे.  या पक्षाचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते.  सातभाई नेहमी सातच्या संख्येत दिसतातअसा समज आहे.मात्र ८-१० पक्षांपासून २०-२२ पक्षांपर्यंत ही थवे दिसून येतात.हे पक्षी छोट्यामोठ्या थव्यांमध्ये विखुरलेले असतात. जमिनीवरचे किडे,वाळव्या ,अळ्या,आणि गवताच्या बिया हा त्यांचा मुख्य आहार असतो. थव्यातला एक पक्षी जवळच्या झाडाच्या शेंड्यावर बसून टेहाळनीचे काम करतो. एखादा शिकारी पक्षी दिसला की विशिष्ट आवाज काढून जमिनीवर खाद्य शोधात असणाऱ्या पक्षांना सावध करतो. धोक्याचा इशारा मिळताच जमिनीवरचे सर्व पक्षी ताबडतोब जवळच्या एखाद्या झाडावर किवा झुडपात दडून बसतात.  अशी या पक्षाची पद्धत असते.

७) धिवर किंवा खंड्या :

धिवर, खंड्या, किलकिल्या किंवा White Breasted Kingfisher, (व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.  खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्‍या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या अशी आहेत. किंगफिशर किंवा धिवर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू नाव सांगतात.  मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जात आहे.

अशाप्रकारच्या १५० पक्षांच्या जाती या अभयारण्यामध्ये आहेत.  तसेच दिंडा, वावडिंग, कारवी, पांगारा, बहावा, तामण,जांभूळ, साग, आंबा, कोशिंब, किंजल, कळंब, जांब, ई. अशाप्रकारची झाडी-झुडूपं व वृक्ष आहेत.

अभयारण्यात महामार्गाकडून पूर्वेकडे हरियल व मोरटाक या दोन महत्त्वाच्या निसर्गवाटा आहेत. अनुभवी पक्षी निरीक्षकांना या वाटांवर एका भेटीत ४७ पेक्षा जास्त पक्षी पाहता येतात. महामार्गाच्या पश्चिमेला गारमाळ ही अजून एक निसर्गवाट अस्तित्वात आहे.

कर्णाळा किल्ला :

कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.

किल्लाच्या अंगठ्यासारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. पक्षी कर्णाळा अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे.

किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे.  किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हत्ती आणि वाघांच्या अनेक कोरीव आकृती आहेत. प्रवेशव्दा्रातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक मोठा वाडा आहे, वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.

कर्नाळ्याला जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था :-

राहण्यासाठी खोल्या :

किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या शासकीय विश्रामगृहात रहाण्याची सोय उपलब्ध आहे.

कसे जावे :

मुंबई-गोवा महामार्गाने जाताना पनवेल नंतर शिरढोण गाव लागते. गावाच्या जवळच कर्नाळा किल्ल्याचा परिसर आहे.

अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी ठाणे वन्यजीव विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. अभयारण्याच्या सुरुवातीलाच पक्ष्यांची माहिती कोणत्या परिसरात कोणते पक्षी सापडतील, याची माहिती देणारे फलक लावले आहेत.  निरीक्षणासाठी रेस्ट हाउस समोर, गोल प्लॅटफॉर्म, हरियाली ट्रेल, मोरटाका ट्रेल, हरियाली ट्रेल मध्यभाग, बर्ड वाचर्स पॉइंट, कर्नाळा किल्ला अशी सात ठिकाणे निवडून पक्षिप्रेमींना वनविभागाचे अधिकारी व संयुक्त वनसमितीमध्ये काम करणारे, स्थानिक, गावांमधील कर्मचारी अभयारण्याची व पक्ष्यांचीही माहिती देतात. राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळाची ओळख निर्माण झाली असून, ती टिकविण्यासाठी वनविभागाने विविध सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृह, गेस्टहाउस, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम व जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पर्यटनासाठी योग्य वेळ :

कर्नाळा अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी आॅक्टोबर ते फेब्रुवारी ही योग्य वेळ आहे. सद्यस्थितीमध्ये वातावरण चांगले आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली असून, पक्षी निरीक्षणासाठी व पर्यटनासाठीही हीच योग्य वेळ असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी देत असतात..

माहिती साभार -Yogesh Bhorkar

Leave a comment