खान्देशचा काकोरी कांड | Kakori incident

खान्देशचा काकोरी कांड

खान्देशचा काकोरी कांड | Kakori incident-

१४ एप्रिल १९४४. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काकोरी काण्ड हे क्रांतिकारांच्या धाडसाचे सोनेरी पान लिहले गेले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडलेल्या या घटनेच्या निमित्ताने क्रांतिकारानी इंग्रज सरकारला मुळापासून हादरवून टाकले होते. या घटनेच्या बरोबर १९ वर्षानंतर याच धाटणीची खजिना लुटीची यशस्वी घटना खान्देशच्या धर्तीवर आजच्या धुळे जिल्हातील शिंदखेड़ा तालुक्याच्या चिमठाणे- साळवे गावाजवळ घडली होती. जिच्या स्मरणार्थ आज तिथे क्रांतिस्मारक उभारण्यात आला आहे.(खान्देशचा काकोरी कांड)

क्रांतिसिंह नाना पाटील यानी १९४२ ते ४६ या चार वर्षात भूमिगत राहून प्रतिसरकार उभारले होते. अशातच पश्चिम खान्देश जिल्ह्यातील (आजचे धुळे आणि नंदुरबार) ब्रिटिशांच्या खजिन्याबद्दल स्थानिक क्रांतिकाराना माहिती होती. जर हा खजिना लुटला तर प्रतिसरकारसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फळी उभी करता येऊ शकते हे विष्णुभाऊ पाटील यांनी हेरुन हा खजिना लुटण्याचा बेत त्यांनीआखला. साधारण ३० मार्च १९४४ च्या आसपास साताराहून आलेल्या १६ बंदूकधारी क्रांतिकारानी बोरकुंड जवळील एक शेतात कोणाच्याही नजरेत येणार नाही अश्याप्रकारे तळ ठोकला.दयाराम पाटील व भाऊराव पाटील हे दोघी इंग्रजांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती क्रांतिकारीना देत असत. यादरम्यान १४ एप्रिल १९४४ रोजी इंग्रजांचा साढ़ेपांच लाख रुपयांचा खजिना धुळ्याहून नंदुरबार कड़े नेण्यात येणार असल्याची पक्की खबर क्रांतिकारांच्या हाती आली. किसन मास्तर, जी.डी. लाड, राम माळी, नागनाथ नायकवाड़ी, ड़ॉ. उत्तमराव पाटील,शंकरराव माळी, निवृत्ति कळके,अप्पादाजी पाटील, व्यंकटराव धोबी, रावसाहेब शेळके यांच्या मसलतीत लुटीच्या योजनेची आखणी करण्यात आली. क्रांतिकाराना छोट्या छोट्या तुकडीत विभागुन योजनेतील विविध टप्प्यांची जवाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

१४ एप्रिल १९४४ ला इंग्रजांचा खजिना घेऊन जाणारी गाडी धुळेहुन निघून नंदुरबारकड़े मार्गस्थ झाली. चिमठाने येथे पोलिस स्टेशन असल्यामुळे तिथे खजिना न लुटता आज जिथे क्रांतिसमारक आहे तिथे लुटण्याची जागा निश्चित करण्यात आली. नियोजन प्रमाणे गाडीचा पाठलाग चालू होता. क्रांतिकारांचे दोन गट पिशव्या घेऊन चिमठान्यापुढे निघून गेले, तर दोन गट चिमठान्यापासून जवळ असलेल्या एक होटल च्या ठिकाणी वाट बघत होते. होटल जवळ एक पोलिस शिपाई उभा होता. होटल जवळील क्रांतिकारांच्या गटाने त्या पोलिसाबरोबर गप्पा मारत चहा पाजला व गप्पा मध्ये गुंतवून आम्ही दोंडाईचा जवळील मालपुर गावात लग्नाला जात आहोत त्या साठी आम्हाला गाडीत जागा मिळवून दया अशी विनंती चा बनाव केला.एव्हाना सकाळी साढ़े दहाला गाडी होटल जवळ पोहचली. ह्या विनंतीला यश मिळून त्यांनी गाडीत प्रवेश मिळवला. गाडीत चालक शेजारी खजिनदार कारकुन व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस बसलेले होते.

चिमठाणे पासून एक किलोमीटर अंतरावर आजच्या स्मारकाच्या जागी खजिन्याची गाडी आल्यावर गाडीतील एका क्रांतिकाराने उलटी-खोकल्याच्या नाटक करीत गाडीच्या खिड़की बाहेर डोकावुन लाल रुमाल दाखवत रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या गटाला इशारा दिला. हां गट रस्त्यातील एक चढ़च्या ठिकाणी अचानक भांडण करत गाडी समोर येऊन थांबला. या भांडणामुळे काही क्षणासाठी गाडीतील खजिन्यासाठीच्या रक्षणाकारिता तैनात असलेल्या पोलिसांचे लक्ष विचलित झाले.याच संधीचा फायदा घेत गाडीतील क्रांतिकारानी पोलिसांना काही समजण्याच्या आत झटापटीत त्यांच्या हातातील बंदूक हिसकावून घेतल्या. क्रांतिकारी गाड़ी बाहेर पडून हवेत गोळीबार करत वंदेमातरम देत होते. तेवढ्यात रस्त्याने जाणारा एक ट्रक तिथे थांबला व त्याने ओळखले की हे कोणी लुटारु नसून क्रांतिकारी आहे. ट्रक चालकाने क्रांतिकाराना सहकार्य करीत लुटलेला खजिना आणि क्रांतिकाराना ट्रक मध्ये घेऊन लामकानी गावाकडे निघून गेला. दरम्यान क्रांतिकारानी जख्मी पोलिसांना झाडाखाली बांधून दिल होते.तो पर्यंत या घटनेची माहिती शिंदखेड़ा पोलिसांना लागून पोलिस क्रांतिकारांच्या शोधात निघाली. क्रांतिकारांच्या मागावर असलेल्या पोलिसांचा आणि क्रांतिकारांची चकमक संध्याकाळी रुदाणे गावाजवळील एक शेतात उडाली. दोन्ही कडून गोळीबार झाला. पण लवकरच अंधाराचा फायदा घेत क्रांतिकारी तिथुन पसार झाले.

लूटीनंतर खजिना महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकाराना स्वातंत्र्यच्या लढ्यासाठी वाटण्यात आला.या लूटीत शिंदखेड़ा तालुक्यातील शिवराम आबा, महिपत पाटील, दमयंतीबाई बाबूराव गुरव,व्यंकटराव धोबी,कापडण्याचे विष्णुभाई पाटील,जुनवण्याचे यशवंतराव, शहाद्याचे सखाराम शिंपी,प्रकाशाचे नरोत्तमभाई,माणिक भिल, वडजाईचे फकीरा अप्पा,केशव वाणी, देऊरच्या मेनकाबाई नाना देवरे,रामदास पाटील,झुलाल भिलाजीराव पाटील,गोविंदभाई वामनराव पाटील अश्या अनेक स्वातंत्र्यसैनिकानी सक्रीय सहभाग घेतला. यापैकी व्यंकटराव धोबी, शंकर पांडु माळी,धोंडीराम तुकाराम माळी, कृष्णराव विष्णु पवार,अप्पाजी उर्फ़ रामचंद्र भाऊराव पाटील, विष्णु सीताराम, शिवाजी सीताराम सावंत हे क्रांतिकाराम पकड़ले गेले, पुढे दोन वर्ष त्यांच्यावर खटला चालवला गेला. खटल्याअंती १८ फेब्रुवारी १९४६ रोजी व्यंकटराव धोबी, शंकर पांडु माळी, धोंडीराम तुकाराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली तर विष्णु पाटील,शिवाजी सावंत ह्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

धन्यवाद – टीम एक्सप्लोर खान्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here