कामातून गेलेल्या वस्तू भाग 3

गुलाबजल पात्र

कामातून गेलेल्या वस्तू भाग 3

गुलाबजल पात्र आणि मद्यनिर्मिती पात्र

या आधीच्या माझ्या दोन्हीही लेखांना आपण दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. एका हॉटेलवाल्या मित्राने, त्याच्या हॉटेलात खाली बसून जेवणाऱ्यांसाठी खास लाकडी ” ढींचणिया ” बनवून घेणार असल्याचे सांगितले तर कुणी आपल्या वैयक्तिक वापरासाठी बनवून घेणार आहेत. अगडबंब हत्तीसारखे दिसणारे हुंड्याचे हंडेही सर्वांना खूप आवडले. आज आपण वापरातून हल्ली बाद झालेल्या, अत्यंत वेगळ्या अशा आणखी दोन वस्तूंची माहिती घेऊ या !

गुलाबपाणी या एका वेगळ्याच गोष्टीची माहिती हजारो वर्षांपासून भारतीयांना आहे. जगभरात ग्रीस, पर्शिया, रोम तसेच आशियातील अनेक देशांमध्ये याचा वापर होत असे. भारतात खाद्य पदार्थ, मिठाया, गुलकंद, औषधे, सरबते, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक गोष्टींमध्ये गुलाबपाणी व गुलाबाचा अर्क वापरला जातो. अनेक हिंदू धार्मिक विधींमध्ये गुलाबपाणी वापरले जाते. ख्रिश्चन धर्मात विशेषतः ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये गुलाबपाण्याला महत्व आहे. मुस्लिम धर्मामध्ये काबा येथील पवित्र वास्तू स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाणी आणि झमझम हे पवित्र पाणी यांचे मिश्रण वापरले जाते. बहाई धर्माच्या ‘ किताब- ए -अकदस ‘ मध्ये गुलाबपाण्याचा वापर करण्याची आज्ञा केलेली आहे. पारशी धर्मामध्ये गुलाबपाण्याला मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमधून आजही परंपरागत चांदीची गुलाबदाणी ( आणि अत्तरदाणी ) पाहायला मिळते.

मद्य ही देखील हजारो वर्षांपासून माहिती असलेली एक विश्वव्यापी गोष्ट आहे. भारतामध्ये सिंधू खोऱ्यातील संस्कृतीपासूनच मद्याची माहिती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, चरक संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथांमध्ये मद्याचा उल्लेख आढळतो. त्याचे कार्य, उपयोग, प्रकार वेगवेगळे आहेत. औषधांमध्ये ते स्वयंनिर्मित ( self generated alcohol as a preservative ) असायचे. मद्याला सुरा, सोम, मधू अशी विविध नावे आहेत. संस्कृतमधील शब्द ‘ सोम ‘ आणि पारशी अवेस्ता ग्रंथातील ‘ हाओम ‘ हे एकच असले पाहिजेत. पूर्वीच्या काळातील राजे हे युद्धभूमीवर जातांना सुरापान करीत असल्याचे उल्लेख आढळतात. सप्तशतीच्या ग्रंथामध्ये असुरांशी लढण्यापूर्वी खुद्द देवीने सुरापान केल्याचे उल्लेख आहेत. ही जर दारू असेल तर ती प्राशन केल्यावर नीट पणे लढण्याचे भानच राहणार नाही. मला वाटते की ही सुरा म्हणजे दारू नसून एखादे खास पेय असावे. युद्धात होणाऱ्या जखमा सहन करता याव्यात, अधिक काळ आणि अधिक जोमाने लढत यावे यासाठी एखादे खास उत्तेजक पेय बनविले जात असावे.

धार्मिक ग्रंथांमध्ये कुठले मद्य कुणी प्यावे, कसे प्यावे याच्यादेखील संहिता होत्या. ब्राह्मण आणि विद्यार्थी यांना मद्यसेवनाची सक्त मनाई होती. फळांपासून बनविलेले मद्य पिण्यास क्षत्रियांना परवानगी होती. तर अतिश्रम करणाऱ्या श्रमिक वर्गाला धान्यापासून बनविलेले मद्य पिण्यास परवानगी होती. यज्ञातून उत्पन्न होणारा सोमरस प्राशन करण्याची अनुमती फक्त यज्ञाचा यजमान आणि त्याचे पौरोहित्य करणाऱ्यांनाच होती. हा सोमरसही फक्त राजसूय आणि सौत्रमणी या यज्ञांमध्येच प्राप्त होत असे. काहींच्या मते यज्ञातील सोमरस उत्पत्ती ही केवळ एक समाधीसदृश्य अध्यात्मिक अवस्था होती.

आपल्याला हे सर्व वाचल्यावर असे वाटेल की या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत आणि यांचा एकमेकांशी संबंध काय ? …..यांच्यामध्ये तीन प्रकारची साम्ये आहेत. पहिले म्हणजे या दोन्हीही गोष्टी पूर्वी आपल्याकडे घरांमधून सहज बनविल्या जात होत्या. दुसरे असे की त्या बनविण्याची कृती जवळपास सारखीच होती आणि तिसरे म्हणजे आता त्या वस्तू बनविणे , व्यवहारातून जवळपास पूर्णपणे बाद झाले आहे. कालपरवा या गोष्टी कशा बनविल्या जात असत याची आणि आता वापरातून पूर्णपणे बाद झालेल्या, त्याच्याशी संबंधित भांड्यांची माहिती करून घेऊ या.

सोबतच्या पहिल्या छायाचित्रामध्ये, तोंडांशी बगळ्याच्या चोचीसारखी लांब नळी असलेले आणि झाकण असलेले तांब्याचे भांडे पाहायला मिळते. हे गुलाबजल पात्र किंवा बकपात्र ! या भांड्यामध्ये प्रामुख्याने उत्तम प्रतीच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी भरून ते मंद अग्नीवर तापविले जात असे. पाणी उकळू लागले की ऊर्ध्वपतनाने( distillation ) त्याची वाफ तोंडाशी असलेल्या लांब नळीतून बाहेर पडू लागत असे. नळीच्या तोंडाशी एका भांड्यात, वाफेतून तयार होणारा द्रवपदार्थ जमा केला जात असे. यातून उत्कृष्ट प्रतीचे गुलाबाचे अत्तर वेगळे केले जात असे. मूळच्या भांड्यातील गुलाबपाकळ्यांचा काढा थंड झाल्यावर त्यातून गुलाबपाणी प्राप्त होत असे.

आपण वर मद्याचा उल्लेख वाचला. त्याबद्दल जरी धार्मिक बंधने, अधिकृत शिष्टाचार, सामाजिक मान्यता कांहीही असल्या तरी सौम्य प्रकारचे घरगुती मद्य पिण्याची पद्धत आणि परंपरा देशभर फार मोठ्या प्रमाणावर आढळते. गावागावात आपल्या परसामधील भाजी ज्या सहजतेने वापरली जाते त्याच सहजतेने, घरातच सौम्य प्रकारच्या मद्याची निर्मिती केली जात असे. त्या मद्याचे स्वरूप बेवडा आणि पिणारा तो ‘ व्यसनी ‘ असे टोकाचे नव्हते. तांदूळ, बार्ली, गहू अशी धान्ये, द्राक्षे, जांभूळ, संत्री, मोसंबी अशी फळे, मोहाची फुले इत्यादींपासून मद्य निर्मिती केली जात असे. आजही या मद्याचे अनेक स्थानिक अवतार खूप लोकप्रिय आहेत. गोव्यातील ताज्या काजूची उराक आणि फेणी प्रसिद्धच आहेत. आसाममधील तांदूळ किंवा उसाच्या मळीपासून बनणारी सुलाई, लडाखमधील छांग, मिझोरमची झोलाईडी, राजस्थानची केसरकस्तुरी, नागालँडची झुथो, झारखंडची हांडिया, त्रिपुराची चुवारक स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहेत. देशात विविध राज्यांमध्ये अनेक घरगुती समारंभात विशेषतः लग्नांमध्ये पाहुण्यांच्यासाठी अशा मद्यनिर्मितीची खास व्यवस्था करण्यात येते.

खालील छायाचित्र क्रमांक २ आणि ३ मध्ये आपल्याला अशा घरगुती मद्य निर्मितीसाठी वापरली जाणारी भांडी पाहायला मिळतात. या भांड्यांमध्ये २ वेगळे भाग असतात. खालच्या भांड्याला सर्वात वर तोंडाशी एक नळी बसविलेली असते. त्याच्यावर ठेवायच्या दुसऱ्या भांड्याला खालच्या बाजूला एक नळी बसविलेली असते. खालच्या भांड्यामध्ये ज्याच्यापासून मद्यनिर्मिती करायची ते आंबवलेले ( fermented ) मिश्रण भरून हे भांडे मंद अग्नीवर ठेवण्यात येते. वरच्या भांड्यामध्ये ( त्याच्या नळीमध्ये खुंटी घालून ती बंद करण्यात येते ) थंड पाणी भरण्यात येते. खालच्या भांड्यातील मिश्रण उकळू लागल्यावर त्याची वाफ या भांड्याच्या तोंडावर ठेवलेल्या दुसऱ्या भांड्याच्या तळापर्यंत पोचते. या वरच्या भांड्यात थंड पाणी असल्याने या वाफेचे द्रवपदार्थात रूपांतर होऊन ते तोंडाशी असलेल्या नळीतून बाहेरच्या ( जमा करण्यासाठी ठेवलेल्या ) आणखी एका भांड्यात जमा होते. हीच ती ‘ पहिल्या धारेची ‘ ! या क्रियेमध्ये वरच्या भांड्यात ठेवलेले थंड पाणी हळू हळू गरम झाले की त्याच्या नळीतील खुंटी काढून ते सोडून दिले जाते आणि पुन्हा नव्याने थंड पाणी भरले जाते. या मद्याची चव आणि परिणाम हा त्या त्या घरातील जाणकार मंडळींनी, पिढ्यानपिढ्या मिळविलेल्या कसबावर अवलंबून असतो.

भारतीय आहाराच्या एका वेगळ्याच दालनाचा इतिहास सांगणारी ही भांडी आता खरोखरच इतिहासजमा झाली आहेत. घरगुती आणि स्वयंपाकाच्या भांड्यांचे जगामधील एकमेव संग्रहालय अहमदाबादमध्ये आहे. येथे सुमारे ४५०० भांड्यांचा प्रचंड संग्रह आहे. हे अत्यंत उत्तम असे ‘ विचार वासण संग्रहालय ‘, विशाला सर्कल, वासण टोलनाका, एपीएमसी मार्केट समोर, येथे आहे. खालील भांडी याच संग्रहालयात पाहायला मिळतात. याची आवड असलेल्यांनी हे संग्रहालय जरूर पाहावे असे आहे.

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here