संगमेश्वर येथील मजेदार प्रसंग | तुमच्याकडची दारू काढा, आम्ही कोंबडं आणतो , आपण पार्टी करू

शिवछत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल !

संगमेश्वर येथील मजेदार प्रसंग | तुमच्याकडची दारू काढा, आम्ही कोंबडं आणतो , आपण पार्टी करू –

परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतांमधून बऱ्याचदा काही मजेदार प्रसंग वाचायला मिळतात . असाच एक प्रसंग १७ व्या शतकात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी आबे कारे याने लिहून ठेवला आहे. ‘सरकारी अधिकाऱ्यांची कोंबडं आणि दारूची पार्टी’ अशा बातम्या आपण अनेकदा वाचतो . पूर्वीच्या काळी देखील काही सरकारी अधिकारी अशा पार्ट्या करण्याची संधी शोधत असत हे  वाचून हसूही येते आणि मौजही  वाटते .संगमेश्वर येथील मजेदार प्रसंग  चला, आता आबे कारे  याला कोणते  अधिकारी भेटले आणि त्यांनी त्याच्या कडे काय मागणी केली हे  त्याच्याच शब्दात ऐकू ,

” त्या रात्री आम्ही संगमेश्वर (रत्नागिरी  जवळचे ) येथे मुक्काम केला. या  गावातले बरेचसे लोक  त्यावेळी पळून गेले होते आणि गाव जवळजवळ ओस पडले होते. गावामध्ये काही स्थानिक लोक आणि सिद्दीच्या हल्ल्यापासून गावाचे सरंक्षण करण्यासाठी तेथे आलेले काही सैनिक एवढीच माणसं होती. मी गावातीलच एका रिकाम्या घरात मुक्काम केला. पण मी या घरात गेल्यानंतर थोड्याच वेळात  काही घोडेस्वार सैनिक आणि त्यांच्याबरोबर काही सरकारी अधिकारी तेथे आले  व मी या घरात उतरल्याबद्दल त्यांनी मला अपमानास्पद शब्दात सुनावले. त्यांची अरेरावी आणि उर्मटपणा पाहून मी देखील ठाम भूमिका घेतली आणि घर सोडण्यास  नकार  दिला  व  माझा दस्तक (प्रवास करण्याचा परवाना) दाखवून त्यांना म्हणालो ,  “तुम्ही जर मला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर  तुमच्या शिवाजी महाराजांकडे मी तुमची तक्रार करेन आणि न्याय मिळवेन !” गावात अनेक घरं ओस पडली आहेत, त्यातले हवे ते घर तुम्ही (मराठी सैनिकांनी) घ्या असे देखील मी त्यांना (मराठी सैनिकांना) सांगितले.

एवढे बोलून मी माझ्याकडची पिस्तुलं काढली आणि माझ्या नोकरांच्या हातातही शस्त्रे दिली . मी त्यांच्या अरेरावीला बधत नाही आणि रागाने शस्त्र ही उचलले आहे हे पाहून त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि मला म्हणाले . “माफ करा, आमचा थोडा गैरसमज झाला ! राजापूर येथील आम्हाला प्रिय  असलेल्या फ्रेंच लोकांपैकी तुम्ही आहात हे आम्हाला माहिती नव्हते ! तुमच्याशी दोस्ती करायची आणि सेवा करण्याची एक संधी आम्हाला द्या” एवढे बोलून माझ्याकडे मद्य आहे का ? याची चौकशी त्यांनी केली आणि मला म्हणाले की, “आम्ही कोंबडं, भात आणि इतर खाद्य पदार्थ गावातून आणण्याची व्यवस्था करतो, आपण मेजवानी करूया !” त्यांना तिथून घालवून देण्याच्या उद्देशाने मी त्यांनी मला दिलेल्या मेजवानीच्या आमंत्रणा साठी त्यांचे आभार मानले व त्यांना सांगितलेले , “माफ करा, पण माझे जेवण आधीच झाले आहे आणि कालपासून माझ्या जवळचा दारूचा साठा देखील संपला आहे . दिवसभर  डोंगराळ प्रदेशातून प्रवास केल्यामुळे मी आता थकलो आहे आणि आता मला विश्रांतीची गरज आहे “. एवढे  बोलून मला भविष्यात ज्यांच्याशी ओळख ठेवण्याची  कोणतीही गरज नव्हती, अशा या लोकांना मी घालवून दिले ! ”

संदर्भ :- The Travels Of The Abbe Carre In India And The Near East (1672-1674)

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here