महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,138

शिवरायांचे आठवावे रूप, कसे दिसायचे शिवाजी महाराज?

By Discover Maharashtra Views: 1712 6 Min Read

शिवरायांचे आठवावे रूप, कसे दिसायचे शिवाजी महाराज?

शिवरायांचे आठवावे रूप।

शिवरायांचा आठवावा प्रताप।।

शिवरायांचा आठवावा साक्षेप।

भूमंडळी।।

खरंच छत्रपती शिवाजी महाराज असं नुसतं नाव जरी घेतलं तरी लगेच महाराजांचं अप्रतिम आणि निर्दोष नियोजन, त्यांचं धाडस, माणसांची पारख, मुत्सद्दी वृत्ती, न्यायी वृत्ती हे आणि असे बरेच गुण डोळ्यासमोर येतात. त्याच हे गन आणि कर्तृत्व ऐकून ज्यांच्या चेहेऱ्यावर सदैव विलसत असलेलं स्मित आहे, ज्यांचे भेदक पण बोलके डोळे आहेत, ज्यांचं गरुडासारखं सरळ नाक आहे आणि ज्यांची आत्मविश्वासाने शोभणारी देहबोली आहे, असं महाराजांचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आत्ता स्क्रीनवर दिसत असलेल्या चित्रात आधी सांगितलेले सगळे गुण आणि बारकावे सहज दिसून येतात त्यामुळे अगदी लहानपणापासून मला हे महाराजांचं खरं चित्र आहे अस वाटायचं. पण संदर्भसाहित इतिहासाची गोडी लागल्यावर हे चित्र कोणा चित्रकाराने केवळ महाराजांच्या गुणांची कल्पना करून काढलेलं आहे हे कळलं. आणि मग विचार आला की खरंच शिवाजी महाराजांचं चित्र कुठे उपलब्ध असेल का? महाराज कसे दिसत होते, कसे बोलत होते याच वर्णन कुठे केलेलं असेल का? मला माहितेय असेच प्रश्न तुमच्याही मनात असतील. महाराजांच्या चित्राविषयी आणि त्यांच्या दिसण्याविषयी इतिहासात काय उल्लेख आहेत ते आपण आज आपल्या व्हिडिओत पाहुयात.(कसे दिसायचे शिवाजी महाराज?)

छत्रपती संभाजी महाराजांचा निष्कलंक इतिहास जगासमोर आणण्याचे श्रेय इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांना जातं. आता शिवाजी महाराजांच्या चित्राबद्दल बोलत असताना मधूनच वा सी बेंद्रे कुठून आले असं तुम्हाला वाटलं असेल तर ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं निष्कलंक चरित्र शोधून जगासमोर आणण्याचं श्रेय बेंद्रेंना जातं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चित्र शोधून काढायचं श्रेयसुद्धा वा सी. बेंद्रेंनाच जातं. त्याच झालं असं की भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या पुढाकाराने ‘Modern Indian History Congress’ चे पहिल अधिवेशन १९३५ मध्ये भरल होतं. या अधिवेशनाला त्याकाळच्या बॉम्बे स्टेट चे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न उपस्थित होते. बेंद्रेंची इतिहास संशोधनातील रुची, त्यांचा अभ्यास आणि त्यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहून या लॉर्ड ब्रेबॉर्ननी इतिहासशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांना युरोपात पाठवण्यासाठी त्यावेळचे बॉम्बे स्टेट चे मुख्यमंत्री श्री बाळासाहेब खेर यांच्याकडे शिफारस केली. १९३९ साली हिस्टोरिकल रिसर्च स्कॉलरशीप मिळवून बेंद्रे इंग्लंडला गेले. इथल्या दोन वर्षांच्या अभ्यासादरम्यान, मॅकेन्झीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग चाळताना व्हॅलेंटाईन या डच गव्हर्नरने लिहिलेलं एक पत्र बेंद्रेंच्या हाती लागलं. हा व्हॅलेंटाईन १६६३-६४ मध्ये सुरतेच्या डच वखारीत गव्हर्नर म्हणून कामाला होता. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतेच्या स्वारीवर गेले होते तेव्हा हा व्हॅलेंटाईन सुरतमध्ये महाराजांना भेटला होता. या भेटीदरम्यान त्याने महाराजांच एक चित्र काढून घेतलं होत. या चित्राच्या प्रतीची बेंद्रेंनी इंग्लंडला खात्री करून घेतली. हे चित्र मिळेपर्यंत शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्रातील इतिहास विषयक पुस्तकात ‘इब्राहिमखान’ या एका परकीय मुसलमान व्यक्तीचं चित्र होतं. बेंद्रेंना हे चित्र मिळाल्यामुळे महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या पुस्तकांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. आता स्क्रीनवर दिसतंय हेच ते चित्र. यात महाराजांचं गरुडासारखं सरळ नाक, भेदक पण बोलके डोळे, सतत चेहेऱ्यावर विलसत असणारं स्मित, गळ्यातली कवड्यांची माळ हे सगळे बारीक तपशील या चित्रात दिसून येतायत.

बरं मग याशिवाय शिवरायांच्या दिसण्याचं वर्णन करणारे आणखी काही उल्लेख इतिहासात आहेत का? तर हो ज्यावेळी शिवाजी महाराज १६६६ मध्ये आग्र्याला गेले होते त्यावेळच्या राजस्थानी रेकॉर्डस् मध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. हे रेकॉर्ड म्हणतं

“अर सेवाजी तो हकिर छोटी सोही देखता दिस जी, अर सुरती बहुत आजइब गौरो रंग अपूछो राजवी दिसो जी….” म्हणजेच “पहिल्यांदा पाहणाऱ्यांना महाराज काहीसे कमी उंचीचे आणि सडपातळ वाटतात. त्यांचा रंग गोरा आहे आणि चौकशी केल्याविनाच ते राजे आहेत हे समजून येतं”

पुढे या रेकॉर्ड्समध्ये लिहिलं आहे की,

“…हीम्मती मरदानगीने देखता ही असौ दिसो जो बहुत जो बहुत मरदानो

हिम्मत बुलंद आदमी छो. सेवाजी ने दाडी छे”

अर्थात बघताक्षणीच ते हिम्मती आणि मर्दानी म्हणजेच शूर आहेत हे दिसून येतं. शिवाजी महाराजांना दाढी आहे.”

१६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी इंग्रज चर्चच्या एका सदस्याने जॉन एस्कॅलिऑटने महाराजांचं वर्णन केलं आहे. हे वर्णन जुन्या इंग्रजीत आहे. तो म्हणतो

“His person is described by them whoe have seen him to bee of meane stature, lower somewhat then I am, erect, and of an excellent proportion….”

अर्थात ” प्रथमदर्शनी राजे उंचीला थोडे कमी वाटतात, त्याच्याहून राजांची उंची थोडी कमी असेल, पण त्याचं शरीर बांधेसूद आहे. ”

active in exercise and whenever hee speaks seems to smile; a quick and peercing eye, and whitter than any of his people.”

म्हणजेच ” ते कोणत्याही कामात चपळ किंवा कार्यक्षम आहेत आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांच्या चेहेऱ्यावर स्मित असतं. त्यांची नजर भेदक आहे आणि महाराज त्यांच्या इतर लोकांहून गोरे किंवा उजळ आहेत. ”

ही दोन्ही वर्णनं जर कोण्या मराठी माणसाने केली असती तर ते पक्षपाती वाटलं असतं, वाटलं असतं की मराठी माणसांना महाराजांबद्दल आदर असल्यामुळे असं लिहिलंय, पण हे वर्णन हजारो मैल दूर असलेल्या राजस्थानी माणसांने आणि हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या एका इंग्रजाने केलं आहे यावरून राजांचे गुणच नाही तर त्यांचं दिसणंसुद्धा किती प्रभावी होतं हे अगदी सहज कळून येतं. शेवटी माणसाचं कर्तृत्वच तो किती श्रेष्ठ आहे हे दाखवून जातं, पण तरीही आजच्या काळात कित्येक जणांना छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तृत्व ऐकल्यानंतर ते दिसायला कसे होते, त्यांचं चित्र उपलब्ध आहे का अश्या गोष्टींमध्ये उत्सुकता असते. ते म्हणतात ना ‘When you put a face to the name’ एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. याच साठी शिवाजी महाराज कसे दिसायचे हे ऐतिहासिक संदर्भांसहित सांगण्यासाठी हा आमचा प्रयत्न होता. अशा करते आमचा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. धन्यवाद.

संदर्भ:

१. छत्रपती संभाजी महाराज: लेखक: व सी बेंद्रे
२. राजस्थानी रेकॉर्ड्स
३. English Factory Records on Shivaji

Suyog Shembekar

विडिओ:

Leave a comment