सरदार बंडगर घराण्याचा इतिहास भाग २

सरदार बंडगर घराण्याचा इतिहास

सरदार बंडगर घराण्याचा इतिहास भाग २

सरदार पदाजीराव बंडगर(अमीर-उल-उमराव) भाग २ – मराठेशाहीच्या अत्यंत संघर्षाच्या काळात बंडगर बंधू अत्यंत निष्ठेनं व पराकाष्ठेनं मराठी दौलतीची सेवाचाकरी करत होते. अमीर उल उमराव व नुसरतजंगबहाद्दर यांचा अर्थ अनुक्रमे सरदारांतील श्रेष्ठ अथवा सरदारांचा सरदार व लढाईच्या प्रसंगी मदत करणारा पराक्रमी वीर पुरूष असे सांगता येतील. पहिल्या शाहूच्या काळात पदाजी हा शाहूच्या अत्यंत विश्वासू व निष्ठावंत सरदारांपैकी मानला जाई. सरदेशमुखी व नाडगौडकी ही राजाच्या खास अधिकारातील वतने शाहूने काही निवडक सरदार व सेवकांना दिलेली होती.त्यात पदाजी बंडगरचाही समावेश होता.विजापूर प्रांतातील सगर परगण्याची सरदेशमुखी तर आवसे,नळदुर्ग,प्रतापपूर,उदगीर,हवेली मेहकर,काळबरगे इ दक्षिणेकडील प्रांतातील एकंदरित २३ महालांची नाडगौडकी शाहूने त्यास वंशपरंपरेने करार करून दिली.नाडगौड हा कन्नड शब्द असून नाड अथवा नाडू म्हणजे प्रांत व गौड म्हणजे पाटील या अर्थी आपण त्यास प्रांतपाटील ही म्हणू शकतो.

महाराष्ट्रीय ज्ञानकोशमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे.. नाडगांवडा/नाडगौडा- नाडू म्हणजे प्रांत अथवा जिल्हा आणि गांवडा (गौडा) म्हणजे त्यावरील एक अधिकारी. हा कानडी शब्द आहे. चोलसाम्राज्यांत हे नाडू पुष्कळ होते. सांप्रत कुर्ग प्रांतांत नाडू हा शब्द जिल्ह्यांनां लावलेला आढळतो. नाडगौडा हा अधिकारी महाराष्ट्रांतील देशमुखदेशपांड्यांच्या दर्जाचा असतो. मोकासबाब जी चौथाईंत दाखल केलेली असे, त्या मोकाशांतून एकंदर चौथाईच्या शेंकडा तीन टक्के इतकी रक्कम हक्काबाबत या नाडगौडास सरकारांतून मिळे. तिलाच नाडगौडी म्हणत. नाडगौडाचा अधिकार खुद्द छत्रपति देत व तो वाटेल त्याला मिळे व वाटेल तेव्हां काढून घेतां येई; हा हक्क वंशपरंपरेचा नसे.

पदाजीस शाहूने श्री क्षेञ तुळजापूर व मौजे माहुली कर्यात निंबसोड मायणी प्रांत खटाव ही गावे इनाम दिली होती. तुळजापूर येथील श्री भवानी मातेच्या विशेष पूजेचा बहुमानही पदाजीस देण्यात आला होता. पदाजीला विजापूर,परांडे,बालाघाट,सोलापूर या प्रांतातील एकंदरित २३ महाल सरंजामी खर्चासाठी जागीर देण्यात आले. या प्रांतांचे नाडगौड हे वतन ही त्यास वंशपरंपरेने करार करून देण्यात आले. त्याशिवाय परगणे आवसे मधील १५८ गावांची जागीर म्हणून पदाजी,मालोजी बिन मुधोजी,व खानाजी बिन जावजी या बंडगरांचे नावे सनद करून देण्यात आली.

इ.स.वी सन १७२० च्या सुमाराला पदाजी पुञ माणकोजीस स्वतंञ सरंजाम देण्यात आला. पदाजीचा मृत्यू इ.स.वी सन १७२७ ला झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुञ माणकोजी यांस “अमीर-उल-उमराव” तर द्वितीय पुञ खंडेराव यांस “वजारतमाब” हे किताब देऊन सरंजाम वाटून दिला. तर कनिष्ठ पुञ गोपाळराव यांसही सरदारीची वस्ञे व सरंजाम देण्यात आला. पदाजीचे हे पुञ बापाप्रमाणेच कर्तबगार असावेत असे त्यांच्या एकंदरित कारकीर्दीवरून वाटते.

संदर्भ: शाहू दफ्तर पुराभिलेखागार पुणे.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here