महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ५

By Discover Maharashtra Views: 1368 8 Min Read

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ५ –

तुकोजी होळकर, औपचारिक दत्तकविधान न होता सत्ता प्राप्ती.

मल्हारराव होळकरांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी झाला. त्यांच्या पित्याचे नाव खंडोजी असून ते फलटण परगण्यात नीरा नदीच्या कांठावर असलेल्या होळ गावी वास्तव्यास होते,म्हणून होळकर असे आडनाव पडले. मल्हारराव तीन वर्षांचे असताना खंडोजीनचे निधन झाले.ततपश्चात त्यांचा सांभाळ मामा भोजराज यांनी केला जे सुप्रसिद्ध सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या घोडदळात 25 घोडेस्वारांचे प्रमुख होते.यथावकाश मल्हारराव पण मामाच्या देखरेखीखाली युद्धकलेत निपुण झाले.मामांची मुलगी गौतमीबाई हिजबरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला.मल्हाररावांचे रण कौशल्य पाहून पेशव्यांनी त्यांना इ . स.1725 मध्ये सरंजाम देऊन इंदूर संस्थानचे अधिपति म्हणून नियुक्त केले.पुढील वीस वर्षांत त्यांच्या अखत्यारीत सुमारे 75 लाखांचा मुलुख आला होता.उत्तरेकडील मराठ्यांच्या प्राय: बहुतेक सर्व मोहिमांत मल्हाररावानी भाग घेऊन उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा दबदबा निर्माण केला होता.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ५)

मल्हाररावाना खंडेराव नावाचा मुलगा होता.त्याची पत्नी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर  ह्या होय.खंडेराव मराठ्यानी सुरजमल जाटच्या कुंभेरी किल्ल्यास घातलेल्या वेढ्याच्या दरम्यान तोफगोळा लागून 17 मार्च 1754 रोजी मृत्यू पावला.खंडेरावची आई गौतमीबाई 29 सप्टेंबर 1761 ला तर मल्हारराव 20 मे 1766 रोजी स्वर्गवासी झाले.वर्षभरातच खंडेरावचा मुलगा मालरावचे पण 27 मार्च 1767 ला वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले.यावरून दिसून येईल की मल्हाररावांच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्य मार्च 1767 पर्यन्त मृत्यू पावले होते.मालराव च्या मृत्यू नंतर होळकरशाहीचा कारभार मल्हाररावांच्या नात्यातील पराक्रमी गृहस्थ तुकोजी होळकर बघत होते. तुकोजी आणि अहिल्याराणी दोघांचा जन्म इ. स.1725 चा. तुकोजी मल्हाररावांच्या तालमीत तयार झाlele  असल्याने त्यांना युद्ध,राज्यकारभार आदींची चांगली ओळख होती. इ. स.1769 ते 1774 ते महादजी शिंद्यानबरोबर दिल्लीकडे होते.1774 मध्ये दक्षिणेत आले,1787 पर्यन्त पेशव्यांच्या मोहिमांत होते. त्यानंतर ते उत्तरेकडे परत गेले. इ. स.1794 मध्ये खरड्याच्या लढाईसाठी नानानी त्यांना इथे बोलावले होते. ते पुणे मुक्कामी 15 ऑगस्ट 1797 रोजी मरण पावले. तत्पूर्वी दोन वर्षे आधी म्हणजे  13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याराणीनचे निधन झाले होते. अहिल्याराणिन च्या निधनानंतर होळकरशाहीचा पूर्ण कारभार तुकोजीरावांकडे आला.

इ. स.1766 मध्ये मल्हाररावांच्या मृत्यू नंतर माधवराव पेशव्यानि  अहिल्याराणीन कडे दैनंदिन कारभार राहू दिला तर तुकोजीरावांकडे लष्करी मोहिमा सोपविल्या. परंतु ही व्यवस्था राबविताना अहिल्याराणी आणि तुकोजीराव यांच्यात नेहमीच मतभेद,मनमुटाव होऊन प्रकरण पेशव्यांकडे जायचे. तुकोजीरावांची इछा अशी होती की अहिल्याराणीनी निवृत्ती घेऊन संपूर्ण कारभार त्यांच्याकडे सोपवावा. यावर महादजी शिंदेनी नाना फडणीसणा कळविले की, ‘’कै. सुभेदार ( मल्हारराव )हयात असता,त्याची बायको गौतमाबाई कारभार करत होती. ती वारल्यावर पुढे अहल्याबाई कारभार करू लागली. ही चाल त्यांचे घरची पहिल्या पासोन आहे,नवी नाही. असे असतां तुकोजिबावानी  म्हटल्या प्रमाणे बाईनी तुकडा खाऊन पडले असावे हे भाव कसे सिद्ध होतील!

ज्या प्रमाणे पहिले पासून होळकरांचे घरची चाल आहे,त्या प्रमाणे बाईनी सारी वहिवाट करून चाकरी तुकोजोबावानि करावी,यात बाईचे महत्व,सरदारीचे स्वरूप व सरकार चाकरी,तीन ही गोष्टी सिद्धीस जातात. बाईचा अपमान झाल्यास पुढे सरकार चाकरी होणार नाही. होळकरांची सून,तिचा अपमान झाल्यास सरकारचा लौकिक राहणार नाही.इतके असून हीच गोष्ट करावी,असा आपला आग्रह असल्यास,आमच्याने बाईस सांगावणार नाही की,तुम्ही पोटास घेऊन स्वस्थ बसावे. बाई यांचे ऐकावयाजोगि नाही. त्यात होळकरांचा आमचा भाउपणा. आम्हास गैरातीची गोष्ट सांगणे उचित नाही.. ज्या गोष्टीत बाईचे महत्व राहून,सरदारीचे स्वरूप राहे व सरकार चाकरी घडे ते करावे.” यावरून असे दिसते की महादजी शिंदे अहिल्याराणीन कडेच कारभार राहावा आणि तुकोजीनी लष्करी मोहिमा राबवाव्यात अशा मताचे होते.

यावर नाना फडणीसानी महादजीना विचारले की, “घोडे एकाच्या हाती व लगाम दुसऱ्याच्या,अशाने सरकार चाकरी व सरदारीचे स्वरूप कसे होईल!.. दोहाती कारभारामुळे सरकारकाम नासते व दौलत पेचात येते.” त्यामुळे त्यांनी महादजीना बजावले की जर अहिल्याराणी ऐकत नसतील तर त्यांचा बंदोबस्त सरकारातुन करावा लागेल. यावर महादजी नी नानाना वस्तुस्थितिची कल्पना देताना लिहिले की,”नाना समजत असतील की,पांच हजार फौज महेश्वरी पाठवून बाईचा बंदोबस्त करू,त्यास तुम्ही सारे शहाणेच आहा,पण बाई साऱ्यांपेक्षा अधिक शहाणी आहे. अशा गोष्टी घडतील हे समजून तिनेही तयारी केली असेल.तिच्या हातात मातबर जागा आहेत.संशय तिला समजला तर मग ती कोणासच बधावायची नाही.पैका व बुद्धी दोन्ही तीजमध्ये मजबुद आहेत.बाईस पाटिलबावा ( महादजी )शिकवून खेळ करवितात हा नानांचा भ्रम आहे.

अशा व्यंगोक्तीने लिहिणे ठीक नाही.येणेकरून दौलतीचा नाश होईल.मग सर्वांचे डोळे उघडतील.बाई दुसऱ्याचे हाताने घास घेत नाही..” नाना फडणीसानी व्यक्त केलेली भीती खरी ठरू लागली.अहिल्याराणी व तुकोजी यांच्यातील मतभेदानी गंभीर स्वरूप धारण केले.तसेच राघोबा दादा आणि माधवराव पेशवे यांच्यातील कलह पण काही काळ अहिल्याराणी आणि तुकोजीराव यांचे संबंध बिघडण्यात कारण ठरला.परिणामी इ. स.1779 मध्ये अहिल्याराणिनी आपला कारभारी यशवंत गंगाधर चंद्रचूड मार्फत पुणेकर कारभाऱ्यांना पंचवीस लक्ष रुपयांचा नजराणा देऊन नातू ( मुलीचा मुलगा ) नथ्याबा फणसे यास दत्तक घेण्याची परवानगी मिळविली.अशी परवानगी मिळविताना अहिल्याराणिणी कळविले की, “ तुकोजीची वर्तणूक सुधी नाही,सबब त्याची सरदारी बरतर्फ करून त्यास कैद करावे,आणि फणशांचा मूल दत्तक घेऊन त्याचे नावे सरदारी करावी.यास नजर सरकारची पंचवीस लक्ष एक यशवंतराव विद्यमाने करार दिली असे.” परंतु हा प्रस्ताव नथ्याबा पुढे सुमारे 11 वर्षे हयात असूनही अमलात आला नाही.

प्रारंभी म्हटल्या प्रमाणे अहिल्याराणीनच्या मृत्यू(ऑगस्ट 1795) नंतर होळकरशाहीची सर्व सूत्रे तुकोजीरावांकडे गेली.हे सत्तान्तर जरी नात्यातल्याच व्यक्तीकडे.. तुकोजीरावांकडे .. झाले असले तरी ते दत्तक विधानाच्या माध्यमातून झाले नाही,त्यासाठी यथाविधि दत्तविधान झाले नाही.असाच प्रकार थोरले शाहू महाराज निवर्तलयानंतर दत्तक घेतल्या गेलेल्या रामराजांच्या बाबतीत घडला होता. तुकोजीराव पेशव्यांच्या वतीने होळकर संस्थानच्या फौजा घेऊन लष्करी मोहिमेत भाग घेत असत.पेशवे त्यांचा उल्लेख तुकोजी बीन मल्हारजी होळकर असा करत. तुकोजीराव पण सही करताना स्वतःस मल्हाररावांचा मुलगा म्हणवित असत.त्यांचा शिक्का,

‘ श्री म्हाळसाकांत चरणी तत्पर मल्हारजीसुत तुकोजी होळकर ‘असा होता जो अहिल्या राणीनच्या मंजुरीने तयार झाला होता.नाना,महादजी यांचा तुकोजीरावांनी होळकर रियासतीचा पूर्ण,एकहाती कारभार पाहण्यास विरोध नव्हता.मराठा मंडळाची पण होळकर रियासतीचे मालक तुकोजीरावच अशी धारणा होती. इतके सारे असूनही अहिल्याराणीनी त्यांना दत्तक वारस म्हणून प्रगटपणे मान्यता दिली नव्हती.तुकोजीरावांचे दत्तविधान झाले नाही व ते मल्हाररावांचे पुत्र नाहीत,असा अहिल्याराणीनचा दृढ समज होता असे गो.स.सरदेसायांनी काही उदाहरणे देऊन स्पष्ट केलं आहे.

* फेब्रुवारी 1789 मध्ये तुकोजीरावांच्या मल्हारराव ह्या पुत्राचे लग्न झाले.त्या प्रसंगी पिढ्यांचा उचार करताना अहिल्याराणिनी ब्राह्मणांकडून मालराव होळकर यांचे पुत्र मल्हारराव असा केला,तुकोजीरावांचे नाव साफ वगळले.

*अहिल्याराणीनी तुकोजीरावांस दत्तक घेतले नव्हते.अहिल्याराणीनचा पुत्र मालराव मल्हाररावांच्या  ( अहिल्याराणीनचे सासरे ) मृत्यू नंतर जवळपास एक वर्ष हयात होता.त्यामुळे दत्तक घेण्याचे काही कारण नव्हते.मल्हारराव यांची पत्नी गौतमाबाई पतीच्या आधी 29 सप्टेंबर 1761 रोजी मरण पावली. मल्हाररावांचे त्यानंतर पाच वर्षानी मे 1766 मध्ये निधन झाले.त्यांच्या अन्य दोन स्त्रिया द्वारकाबाई व बजाबाई सती गेल्याची नोंद आहे.एकूण मल्हाररावांचे पश्चात पुत्र ( तुकोजीराव )दत्तक घेण्यास मल्हाररावांची एकही पत्नी हयात नव्हती.यावरून सरदेसाई म्हणतात की मल्हाररावांच्या मृत्यूपूर्वी तुकोजीरावांचे दत्तविधान होण्याचे काही कारण नव्हते.( कारण नातू मालराव त्यावेळी हयात होता.)त्यानंतर हा संस्कार यथाविधि झाला असेल तर दत्तक घेणारे कुणी तरी जीवंत असावयास पाहिजे होते.तसं कोणी नव्हते.

अशा प्रकारे जरी तुकोजीरावांचे मल्हाररावांचे पुत्र म्हणून दत्तकविधान झाले नसले तरी त्याचा त्यांच्या  होळकर तसेच मराठेशाहितील स्थानावर काही विपरीत परिणाम झाला नाही. मराठामंडळात  मल्हाररावांचे दौलतीचे वारस तुकोजीरावच अशी भावना प्रबळ होती. अहिल्याराणीनच्या मृत्यू नंतर आधी सांगितल्या प्रमाणे तुकोजीराव व त्यांच्या नंतर त्यांच्या मुलांकडे होळकरशाहीचा कारभार गेला.

संदर्भ:मराठी रियासत-खंड 7 गो. स. सरदेसाई.

Leave a comment