महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,047

हत्ती बारव, अहमदनगर…

By Discover Maharashtra Views: 1465 4 Min Read

हत्ती बारव, अहमदनगर…

एका भल्या सकाळी विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते जमलेले. त्यात काही महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनएसएसचे छात्र आणि इतिहासप्रेमी. निमित्त होतं अहमदनगर-जामखेड रस्त्यावरच्या हत्ती बारवेच्या स्वच्छतेचं. तेव्हाचे जिल्हाधिकारी अनिल कवडेही मोठ्या उत्साहानं या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. बारवेच्या तळापासून मानवी साखळी करून कचरा बाहेर काढायला सुरूवात झाली. पाण्यात विसर्जित केलेल्या मूर्ती, निर्माल्य, देवतांच्या प्रतिमा याबरोबरच घरात नको असलेल्या अनेक वस्तू या बारवेत आणून टाकलेल्या होत्या. त्यांची विटंबना पाहून वाईट वाटत होतं…

दरवर्षी वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते हत्ती बारव स्वच्छ करतात, पण पुन्हा लोक त्यात मूर्ती आणि निर्माल्य आणून टाकतातच. मध्यंतरी विसर्जनाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त नेमून, कार्यकर्त्यांनी तिथं थांबून अशा मंडळींना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण फारसा उपयोग झाला नाही. आता पुन्हा एकदा हत्ती बारवेची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. आर्किटेक्ट वेदिका शित्रे हिनं या बारेवची माहिती संकलित केली आहे. (आर्किटेक्ट सुचित मुथा आणि मंदार खेले यांनी या बारवेचं मॉडेल तयार करून ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात ठेवलं आहे.)

ही बारव सध्या बेवारस आहे. निंबोडी आणि दरेवाडी ग्रामपंचायतीसाठी वैभव ठरेल, अशी ही बारव आहे, पण त्यांचंही आतापर्यंत लक्ष नव्हतं. त्याचा फायदा घेत मद्यप्रेमींनी या बारवेजवळ आपला अड्डा तयार केला, जुगारी इथं डेरा टाकू लागले. अंधश्रद्धा वाढणारी लिंबं तिथं दिसू लागली. चोरलेल्या गाड्यांच्या चास्या या बारवेत फेकल्या जात…

खरंतर ही बारव म्हणजे महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास घडवणार्‍या सोळाव्या शतकातील अहमदनगरच्या जल व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. निजामशाहीतील कर्तबगार वजीर सलाबतखानानं ही बारव तयार केली. आजच्या पुढार्‍यांसारखं त्यानं आपलं नाव कुठं कोरून ठेवलं नाही, ही त्याची चूकच झाली!

फराहबख्क्ष महालातील कारंजांसाठी या बारवेतून पाणी पुरवलं जातं असे. तेव्हा याचा उल्लेख “भंडारा नळ” असा केला जात असे. त्याचा नकाशाही उपलब्ध आहे. कारंजी तयार करण्याचे प्रयोग तेव्हा नगरमध्येच झाले…

बारवा अनेक ठिकाणी आहे, त्यातील काही हत्ती बारवेपेक्षा मोठ्या आणि सुंदर आहेत, पण हत्ती बारवेचं वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. या बारवेत असलेलं, मोटेनं पाणी उपसण्यासाठीचं स्वतंत्र चेंबर, रॅम्पवर असलेलले खापरी नळ आणि मागच्या बाजूला असलेलं सायफन, डिस्ट्रीब्यूशन चेंबर अन्यत्र कुठं पहायला मिळत नाही. बारवेच्या मागच्या बाजूला खापरी नळाचे अवशेष आहेत. यातील काही भाग लष्कराच्या हद्दीत आहे.

हत्ती बारवेकडं भारतीय पुरातत्व विभागाचं लक्ष सातत्यानं वेधलं जात होतं. काही दिवसांपूर्वी त्यांचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून गेले. ग्रामस्थांनी सहकार्य केलं, तर ही वास्तू संरक्षित स्मारक म्हणून जाहीर होईल. निदान तोपर्यंत या बारवेच्या कडेनं तारेचं संरक्षक कुंपण करून मूर्ती विसर्जित करायला, दारूचे अड्डे जमवायला प्रतिबंध करायला हवा…पाण्याचं महत्त्व त्यांना सांगायला हवं…

अहमदनगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनाचं औचित्य साधून रविवारी या बारवेत स्वच्छता अभियान राबवून संध्याकाळी तिरंगी प्रकाशझोत टाकून ही ऐतिहासिक वास्तू उजळवण्यात आली. मॅकेनाईज्ड इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडिअर रसल डिसोझा आणि त्यांचे सहकारी, नगरवर मनापासून प्रेम करणारे सुवालालजी शिंगवी, गौतमजी मुनोत यांच्यासारखी मंडळी यावेळी उपस्थित होती.

…काही मंडळींना मात्र अहमदनगर शहराच्या इतिहासाला असा उजाळा मिळतोय, हे रूचत नाही. या शहराचं नाव बदललं पाहिजे, अशी आवई काही मंडळी अधूनमधून उठवत असतात. काही मंडळी इतरांचे पाय ओढण्यातच धन्यता मानतात… या शहराचा इतिहास शाळकरी, महाविद्यालयीन मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत राहू या…काहींना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही तरी हरकत नाही….त्यांनाही धन्यवाद!

भूषण देशमुख

Leave a comment