थोरले संभाजी महाराज यांचे वंशज

By Discover Maharashtra Views: 2743 5 Min Read

थोरले संभाजी महाराज यांचे वंशज –

मराठ्यांच्या इतिहासात सगळ्यात जास्त अन्याय झाला असेल तर तो छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू म्हणजेच शहाजीराजे आणि जिजाऊपुत्र संभाजीराजे यांच्यावरच. इतिहासात त्यांचा उल्लेख युवराज संभाजीराजे असा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाट्यालातर अमानुष छळ आणि मृत्यू आला पण कमीतकमी त्यांचा राज्याभिषेक तरी झाला होता आणि वा. सी. बेंद्रे यांसारख्या इतिहासकारांनी त्यांचे शुद्ध चरित्र जगासमोर आणले. पण कुठल्याही इतिहासकाराने या शहाजीराजे पुत्र संभाजीराजे यांना पुरेसा न्याय दिलेला नाही.(थोरले संभाजी महाराज यांचे वंशज)

गोष्ट आहे शिवकालीन, जेव्हा स्वराज्यावर फत्तेखानासारखे सरदार विजापूरहून महाराजांचे पारिपत्य करण्यास पाठवले होते. आणि शहाजीराजे यांना अटक झाली होती तेव्हा शिवरायांनी आदिलशाही फौजेचा कसा धुव्वा उडवला होता हे सगळ्यांना माहीत आहे पण तिकडे कर्नाटकात संभाजीराजेंनी सुद्धा आलेल्या प्रत्येक आदिलशाही सरदारांना कापून काढले होते. कर्नाटकात शहाजीराजे हे एखाद्या राजाप्रमाणे राहत होते. महाराष्ट्र देशाचे स्वराज्य हे शिवराय आणि कर्नाटकातील दक्खनचे राज्य संभाजीराजेंना अशी शहाजीराजे यांची इच्छा होती. याच संभाजीराजे यांचा अल्पसा उल्लेख इतिहासात दिसून येतो त्याचबरोबर उत्तरकालीन बखरकारांनीही त्यांच्याबाबतीत गैरसमज करून घेतल्याचे दिसून येते.

राधामाधवविलासचम्पू, आणि ९१ कलमी बखरीत त्यांचा उल्लेख आहे. संभाजीराजे यांचा जन्म १६२३ साली झाला आणि विवाह विजयराव विश्वासराव यांच्या मुलीशी म्हणजेच जयंतीबाई यांच्याशी झाला. जिथे संभाजीराजे थोरले यांचा उल्लेख इतिहासात पुसटसा आहे तिथे त्यांच्या पिढीची इतिहासाला दखल घेण्याची काय आवश्यकता ?

जेधे शकावली मध्ये संभाजीराजे यांचे पुत्र उमाजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ मध्ये झाला, अशी नोंद मिळते. उमाजीशिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी २ पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनांत मिळतात मात्र मराठी साधनांत त्याचे उल्लेख नाहीत.

उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी. सदरील हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. उमाजींना विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ. स. १६८३ च्या एका महजरावरून मिळतो. पण त्यांना १६७७ पूर्वी पुण्याच्या परिसरात एका मोठ्या युद्धात वीरमरण आले होते. नंतर इतिहासकारांनी मकाऊ आणि जयंतीबाई ह्या एकच होत्या हा गैरसमज करुन घेतलेला दिसतो.

पण या दोघी सासू सुना होत्या. मकाऊ ह्या उमाजींच्या पत्नी होत्या. थोरल्या संभाजीराजेनंतर कोलार तालुक्यात त्यांच्या पत्नी जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा सन १६९३ सालचा आहे. म्हणजेच जयंतीबाई १६९३ पर्यंत हयात होत्या आणि कर्नाटकात वास्तव्य करत होत्या हे ठामपणे सांगता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ. स. १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसून येतात म्हणून या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते.

उमाजीपुत्र बहादूरजी यांना पुढे पुत्र नसल्याने मकाऊंनी शहाजीराजे यांचे चुलत भाऊ असलेले भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी भोसले यांचे पणतू परसोजी भोसले यांना दत्तक घेतले आणि पुढे यांच्यापासून जिंतिकर भोसले घराण्याचा वंश पुढे वाढला. भोसले घराण्यातील जी पाटीलकीची गावे वंशपरंपरागत चालत आलेली होती त्यापैकीच एक जिंती. या थोरल्या संभाजीराजे यांच्या वंशातील जिंतिकर भोसले घराण्यात मकाऊ ह्या मोठ्या नावाजलेल्या स्त्री होत्या. बादशाही कागदपत्रांत त्यांचा उल्लेख मकुबाई पाटलिन जिंतिकर असा येतो.

छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी मकाऊस धनाजी जाधवांकडून एक गाव दिल्याची नोंद त्यांच्या कागदपत्रांत सापडते. एवढेच नाही तर पुढे शाहू महाराजांच्या काळातही त्यांना आदर होता. मकाऊ ह्या शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या आणि त्यांना त्यांच्याबद्दल आदर , स्नेह तर होताच पण शाहू छत्रपतींनीही त्यांच्या चुलतीकडून अनेकदा परामर्ष घेतल्याचे शाहू दप्तरातील कागदपत्रांतून दिसून येते.

इ.स. १७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊंचे उल्लेख सापडतात. आपल्या आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचल्या होत्या. आजही जिंती गावात त्यांना देवीचा मान असून त्यांचा उल्लेख मकाई देवी असा केला जातो. ग्रामस्थ त्यांना देवी मानतात आणि दरवर्षी त्यांची जत्रा भरते.

पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जिंती गावात मकाउंचा चार बुरुजी, चिरेबंदी वाडा मोठ्या दिमाखात उभा असून त्यात थोरल्या संभाजीराजांच्या शाखेचे विद्यमान वंशज राहतात आणि गावशेजारीच मकाऊंची समाधी आहे. संभाजीराजे थोरले हे जर अजून काही काळ हयात असते तर मराठ्यांच्या इतिहासाला नक्कीच अजून एक सुवर्णपान लाभले असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिग्विजय केला असता पण दुर्दैव हेच इतिहासाला जर तर ची मर्यादा असते.

आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सातारा आणि करवीर गादी माहीत आहे त्याचबरोबर भोसले घराण्याच्या नागपूर, तंजावर आणि अक्कलकोट येथील घराणे माहीत आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू असलेले संभाजीराजे यांचे वंशज हे अज्ञातच होते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांची माहिती सर्व शिवभक्त आणि इतिहासप्रेमींपर्यंत पोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

इमेज : मकाऊ समाधी आणि त्यांचा वाडा

इतिहास वेड या ब्लाॅगवरून

आमचं ईमान रायगडाच्या मातीशी. आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची ||

Leave a comment