गोवळकोट | Govalkot Fort

गोवळकोट | Govalkot Fort

गोवळकोट | Govalkot Fort

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर कोकण रेल्वेने आणि मुंबई – गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. चिपळूण शहरातून वाशिष्टी नदी वाहाते. प्राचिन काळी या नदीतून परदेशी व्यापारी मालाची वाहतुक होत असे. त्यामुळे कोकण व घाटमाथा यांच्या मध्ये असलेले चिपळूण हे गाव प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोट (Govalkot Fort) किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती.

आजही चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीच्या काठावरील १६० फुट उंचीच्या एका टेकडीवर “गोवळकोट उर्फ गोविंदगड” हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदी वाहाते तिचे नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला मिळाले आहे., तर उरलेल्या चौथ्या बाजूला खंदक खोदून Govalkot Fort किल्ला बळकट केला आहे. आज हा खंदक बुजलेला आहे. चिपळूण शहरापासुन ५ कि.मी.अंतरावर असलेला हा किल्ला ३ तासात पाहून होतो.गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी ३५० पायऱ्या आहेत. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो.प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज अजूनही शाबूत आहेत. यातील उजव्या बुरुजावर चढून गेल्यावर दोन तोफा दिसतात तर उजव्या बुरुजावर एक तोफ आहे.. किल्ल्याच्या तटाची रुंदी साधारणपणे ८ फूट रुंद असून शाबूत आहे.गडाला एकूण १२ बुरूज असुन ६ बुरूज चांगल्या स्थितीत आहेत.

तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या आहेत. या तटावरुन चालत पुढे गेल्यावर डाव्या हाताला घरांचे चौथरे दिसतात. गोवळकोटाच्या तटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो.याची लांबी ४८ फुट,रुंदी ४४ फुट तर खोली २२ फुट आहे. हा तलाव पावसाळ्यानंतर वर्षभर कोरडा असतो. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या मागिल बाजूस मातीचा १५ फूटी उंचवटा आहे. याठिकाणी पूर्वी एखादा मोठा वाडा असावा. या उंचवट्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो. गडावर रेडजाई देवीचे छोटे मंदिर असुन त्यापाठी साचपाण्याचे लहान तले आहे. Govalkot Fort गडाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार देखील उध्वस्त झालेले आहे. प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरुन खाली गोवळकोट जेटीवर जाता येते.

जेटीवर ५ तोफा उलट्या गाडलेल्या असुन काही तोफगोळे पाहायला मिळतात. गड पूर्ण पाहून झाल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर पडून पायऱ्यानी खाली न उतरता, समोर दिसणाऱ्या चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे चालत जातांना डाव्या हाताला तटबंदीचे काही अवशेष दिसतात. तर जलशुध्दीकरण केंद्रा पलिकडे एक सुस्थितीतील बुरुज दिसतो. संपुर्ण किल्ला २ एकरमध्ये पसरलेला आहे. उजव्या बाजूस खाली वाशिष्ठी नदीचे पात्र, त्यातील होड्या, त्यामागिल शेते, त्यातून जाणारी कोकण रेल्वे व मागे पसरलेला परशुराम डोंगर असे सुरेख दृश्य दिसते. या सगळ्यासाठी एकदा तरी किल्ल्यावर जावे. गडाच्या इतिहासात डोकावल्यास इ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी गोवळकोट किल्ला आदिलशाहकडून जिंकला व त्यांचे नाव “गोविंदगड” ठेवले. संभाजी महाराजांच्या नंतरच्या इ.स.१६८९ मध्ये गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी आप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाई झाली. यात सिद्दी सात मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here