गड गणपती

गड गणपती

गड गणपती –

संपूर्ण भारतामध्ये पूजनीय मानल्या जाणाऱ्या गणपती या देवतेची उपासना प्राचीन काळापासून केली जात आहे. परंतु गणपती ही देवता आपल्याला मूर्ती स्वरूपात अनेक गड किल्ल्यांवर, प्रवेशद्वार किंवा धान्यकोठारांच्या मुख्य द्वाराजवळ पहायला मिळते. यामध्ये इसवी सन चौथ्या किंवा पाचव्या शतकामध्ये बांधलेल्या गड किल्यांवर गड गणपती च्या प्रतिमा आपल्याला पहायला मिळतात.

गुप्त काळापासून दगडांमध्ये अश्या मूर्त्यांची शिल्पे पाडण्याची सुरुवात झाली असावी. असे विविध कालखंडात गणपती या बुद्धीच्या देवतेचे पुरावे आपल्याला मिळतात. सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर बाप्पाचं अस्तित्व आहेच. दुर्गम गडकोटांसह लेणी तसंच गडद-गुहांमध्येही बाप्पा विसावलेला आहे.

पुण्याच्या परिसरातल्या गडकोटांबाबत बोलायचं झालं, तर सिंहगडाच्या घाटातला गणेश, राजगडाच्या सुवेळा माचीवरचा प्राचीन गणेश, पर्वतगडावरच्या शिवमंदिरातील देखणा गणेश, प्रसन्नगडाच्या महाद्वारपट्टीवरचा कोरीव बाप्पा, कोराईगडाच्या वाटेवरचे शेंदूरचर्चित गणराय, रोहिड्यावरील गणरायांचं प्राचीन रूप, राजमाचीवरचा कोनाड्यातला बाप्पा त्याशिवाय रायगडाच्या गंगासागरात मिळालेली गणरायाची मूर्ती, प्रतापगडावरील श्रीभवानीमातेच्या मंदिरातील गणेश, हरिश्चंद्रगडावरच्या गणेश गुहेतलं बाप्पाचं भव्य रूप अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

कोकणातल्या अनेक गडांवर बाप्पाची स्वतंत्र मंदिरं आढळून येतात. जयगड, मंडणगड येथील मंदिरांमध्ये गणरायाची वेगवेगळी रूपं दिसून येतात. श्रीबागजवळच्या कुलाबा या जलदुर्गातलं गणेश पंचायतनही सुंदर आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरील पारगडावरही गणरायाची वेगळी मूर्ती आहे. मुखवटा स्वरूपातील या मूर्तीच्या चेहेऱ्याचा भाग इतर मूर्तीपेक्षा मोठा आहे.

सह्याद्रीतल्या गडांनुसार बाप्पाच्या रूपातही वैविध्य आढळतं. काही ठिकाणी तो महाद्वारांच्या द्वारपट्टीवर दर्शन देतो, तर काही ठिकाणी गडावरील प्रत्येक मंदिरात त्याची प्राचीन मूर्ती दिसते. काही ठिकाणी तटबंदीतल्या कोनाड्यात गणराय विराजमान झालेले दिसतात, तर अनेक गडांवर बाप्पाचं स्वतंत्र मंदिरही असतं.

विजयश भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here