महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी

By Discover Maharashtra Views: 1632 7 Min Read

निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी –

मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मिती झाली. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीलाही मोठा रोमांचकारी इतिहास लाभलेला आहे. अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे.(निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी)

देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी या राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू घराण्यातील असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू असून बहिरंभटाचा मुलगा तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गवाणमुळे साम्राज्यविस्तार झाला परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले.

त्यानुसार मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाने स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणा-या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले.

मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली. त्यानुसार अंडाकृती किल्ल्याचा परिघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात किल्लेवजा एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे, अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले. पैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे या

सत्तेने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणा-या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९० चे अहमदनगरचे निजामशाही आणि दुसरे १७२४ चे हैदराबादचे निजामशाही. त्यामुळे या दोन सत्तांचा परस्पर कोठेही संबंध नाही.

अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. ज्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पाश्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवरायांचे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राण अर्पण केले.

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत. मलिक अंबरनंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परंडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाहीविरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनातून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले.

सोलापूर, परंडा, औसा, उदगीर, धारूर, देवगिरी, यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्गात मरण पावला. तरी परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या

बु-हाणशहा (१५०८ ते १५५३) ला इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात

सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला.

निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ तयार केली. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली पूर्ण निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजा जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवरायांविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केलेले आहे. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.

मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला. त्यामुळे त्याच्या कैदेत असणा-या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार

घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेबु्रवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला.

पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणीसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. तर या ठिकाणी तुरुंगात असताना मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला.

अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दिन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही.

निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वरांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की,  मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन.

प्रा. डॉ.  सतीश कदम तुळजापूर

Leave a comment