किल्ले खर्डा उर्फ शिवपट्टण –
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावी भुईकोट किल्ले खर्डा उर्फ शिवपट्टण किल्ला आहे. जामखेड या तालुक्याच्या गावापासून २५ कि.मी आणि नगरपासून १०० कि.मी व भिगवणपासून ११० कि.मी अंतरावर आहे. मजबूत असा भुईकोट किल्ला आहे. भुईकोटाचे भव्य प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी आजही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे. आतमध्ये पाण्याची बांधीव विहीर आहे. एक वास्तू आहे ती मशीद होती असे सांगितले जाते. किल्ल्याचे किल्लेदार सरदार आप्पासाहेब निंबाळकर यांनी जवळ बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली होती.
खर्डा हे प्रसिध्द आहे ते मराठे आणि निझामाच्या लढाईसाठी. ही लढाई शेवटची लढाई म्हणून ओळखली जाते. इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. मराठ्यांचा या लढाईतील विजयानंतर अवघ्या सात महिन्यांतच होतकरू व या लढाईचे नेतृत्व करणारे सवाई माधवरावांचा हृदयद्रावक अंत होऊन मराठा साम्राज्याचा विनाशकाल सुरू झाल्याने तर खर्ड्याच्या विजयाला जास्तच महत्त्व प्राप्त झाले.मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नाना फडणवीसांनी ठरवल्यानंतर पेशवा दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामावर आक्रमक केले व हीच लढाई खर्डा येथे झाली. मराठ्यांशी उघड्या रामटेकडी मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाच्या फौजांनी खर्डा किल्लाचा आश्रय घेतला.
१२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी किल्ल्यात चालू होत्या. त्या अवधीत निजामाचे हाल चालले होते. शेवटी अन्न व पाण्यावाचून सैन्यांचे भयंकर हाल होत आहेत. हे पाहून २७ मार्चला निजामाच्या सरदार मुशीरुल्मुलक आपण होऊन मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे निजाम-मराठ्यांत तह होऊन त्यात नवे साडेचौतीस लक्षच मुलूख मराठ्यांना देण्यात आला. त्यामुळे दौलताबादचा किल्ला व त्या भोवतालचा प्रदेश पेशव्यांना, तर व-हाडचा प्रदेश महसुलासहीत नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला. पाच कोटी रुपये थकलेल्या चौथाई व युद्ध खंडणीपोटी देण्याचे मान्य केले.गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग-२ या पुस्तकात खर्डा येथील संग्रमाबद्दल लिहिताना ते म्हणतात, पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंत:करणात जितका ताजा आहे, तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहुला आजही स्फुरण चढवितो.
टीम – पुढची मोहीम