महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,443

निजामशाही गढी, दौला वडगाव

By Discover Maharashtra Views: 4769 3 Min Read

निजामशाही गढी, दौला वडगाव…

इतिहासप्रसिद्ध भातवडी (भातोडी जि. नगर) गावानजीक दौला वडगाव आहे. तेथे एक निजामशाही गढी पाहावयास मिळते. या गावास दौला-वडगाव नाव पडले कदाचित  निजामशाहीतील येथील सरदाराचे नाव दौलाखान अथवा दौलतखान असावे.

गावाच्या उत्तरेस ही गढी अजून आपले महाकाय बुरुज व भक्कम तटबंदी घेऊन खंबीरपणे उभी आहे. खालील दगडी व वरील विटांनी केलेले बांधकाम सुबक, रेखीव आणि देखणे आहे. दरवाजातून आत येताच सज्जावर चढण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जिना आपल्यास वर घेऊन जातो.

आतील बाजूस इमारतीच्या कमानी व दालनांचा भाग आढळतो. सध्या एक मुस्लीम कुटुंब तेथे वास्तव्य करीत आहे. प्रत्येक दालन शाही वैभवाच्या खुणा दाखवते. चुन्याचे प्लास्टर भिंतींना घट्ट चिटकून आहे. भिंतीवर उत्तम प्रकारच्या कमानी वास्तुशास्त्राचे दर्शन घडवितात. संपूर्ण गढीभोवती पूर्वी ३० फूट खोल खंदक होता. यावरुन सरदाराची संरक्षणव्यवस्था मजबूत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तेथे एखाद्या मोठ्या सरदाराचे ठाणे असल्याचे सिद्ध होऊ शकेल.

भातवडी येथून जवळच असून या गावी १६२४ मध्ये जे युद्ध झाले त्या युद्धाने भातवडी नाव शहाजीराजांच्या पराक्रमाशी जोडले गेले. पण भातवडी येथे गढी सध्या अस्तित्वात नाही.

#_भातवडीची_लढाई –

इ.स. १६१७ ते १६२१ या दरम्यान शहाजहानच्या दक्षिणेमध्ये स्वाऱ्या झाल्या. दक्षिणेतील निजामशाही व आदीलशाही राजवटींबरोबर शहाजहानचे सैन्य लढत होते. निजामशाहीचा सरदार हा आपल्या मुत्सद्देगिरीवर कुतुबशहा, आदिलशहा आणि ठिकठिकाणचे मराठे यांना एकत्र करुन मोगल सैन्याशी टक्कर देत होता.

मालोजीराजे व शहाजीराजे हे निजामशाहीच्या बाजूने लढत होते. त्याच वेळी शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधवराव हे मोगलांच्या बाजूने लढत होते. व त्या सुमारास खंडागळे हत्ती प्रकरण झाले. त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले. शहाजीराजांनाही जखमा झाल्या.  शहाजहानचे जहांगीर व नूरजहान यांच्याशी संबंध बिघडले. शहाजहानला पकडण्याचा घाट घातला. शहाजहानने बापाची क्षमा मागून  आपली मूले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवून मलिकअंबरचा आश्रय घेतला.

या गृहकलहाचा फायदा मलिकअंबरने उचलला. शहाजहानच्या पाठलागावर आलेल्या सैन्याने आदिलशाही व मलिकअंबर यांकडे मदत मागितली. आदिलशाहाने मदत कबूल केली. कारण मलिकअंबर आपणास डोईजड होईल असे त्यास वाटले. आदिलशहाने आपले सरदार जमविले. मलिकअंबरनेही गोवळकोंडा. विजापूर पैसा जमवून मोंगलांना तोंड देण्याची पूर्ण तयारी केली. तो स्वतः भातवडी येथील गढीत जाऊन राहिला. हा भाग थोडा डोंगराळ असल्याने मेहकर नदीचा तलाव फोडून मोगली सैन्याच्या वाटेवर चिखल केला. ऐन पावसाळा चालू होता. रसद बंद झाल्याने सैन्याची उपासमार होऊ लागली. अनेक मोगल सैन्य येऊन मिळाले. अशा सरदारांना त्याने बक्षिसे दिली. मोगलांकडील सैन्यास गनिमी काव्याने हैराण केले. सगळीकडे भिती निर्माण झाली. अशा वेळी मलिकअंबरने मोगली सैन्यावर झडप घालून कत्तल केली. अनेक सरदार मारले गेले व काही पळून गेले. भातवडीच्या या लढाईत शहाजीराजांचा फार मोठा सहभाग होता.

भातवडीच्या लढाईत मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. शहाजीराजांची प्रतिष्ठा व पराक्रम, मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे, हे भातवडीने सिद्ध केले. गनिमी काव्याचा हा मराठेशाहीचा श्रीगणेशा ठरला. यामुळे मलिकअंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला आणि शहाजीराजांनी निजामशाही सोडून आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी जो शहाजहानशी चार वर्षे सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून असे म्हटले जाते., “इत शहाजी उत शहाजहान.”

निजामशाही गढी – दौला-वडगाव जि. अहमदनगर…

Credit – Vikas Chaudhari

Leave a comment