महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कलेची प्रचिती असलेलं प्रतिक!

By Discover Maharashtra Views: 2619 3 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कलेची प्रचिती असलेलं प्रतिक!

सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात एक पूल छत्रपती शिवरायाच्या स्थापत्य कलेतील जाण आणि अफलातून तंत्रज्ञान याची साक्ष देत गेल्या साडे तीनशे वर्षापेक्षा अधिकच्या  इतिहासाची साक्ष देत  ऊन, वारा अफाट पाऊस फक्त झेलतोच नव्हे तर अफाट वेगाने येणाऱ्या कोयनेचं पाणी अगदी सहज पणे पास करत आजही रोज शेकडो गाड्या पेलतो आहे.  हे बांधकाम म्हणजे  नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध देणारं आहे.(छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कलेची प्रचिती असलेलं प्रतिक!)

भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागापैकी एक असलेलं जावळीचं खोरं…याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर आजही येतो…  त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची. या भागातून प्रवास करणं जिवाला धोका देणारं आणि जिकीरीचं  असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला.  52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला.

ज्यांनी ज्यांनी सिंधुदुर्ग किल्याच्या बांधकामातील बारकावे पाहिले आहेत.त्यात समुद्राच्या पाण्याच्या  प्रपाताचा परिणाम होऊ नये म्हणून मुख्य द्वाराची रचना जशी केली त्याचा छोटा प्रयोग म्हणजे हा पुल आहे. या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला.

या पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे, प्रत्येक दगड सारख्या मापात आहेत. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. माझ्या पाहण्यात आज पर्यंत असा पुल मिळाला नाही. एक उदाहरण पेशवे काळात रास्त्यांनी कृष्णा नदीच्या पात्राच्या जवळ बांधलेलं वाईचं गणपती मंदिर आहे. त्याच्या शंभर वर्षे अगोदरचा हा पुल आहे. समजा या पुला खालून प्रचंड पुराचं पाणी आलं आणि वरच्या जंगलातली झाडं यात वाहून आली तर त्याच लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही पुलाच्या मागची एक कल्पना आहे आणि दुसरं पाण्याचा कोणताच दबाव त्रिकोणी असल्यामुळे या पुलावर पडत नाही.

पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखी आहे. कोरीव काम केलेल्या या पुलाला साडेतीनशे वर्षापेक्षाही अधिक काळ झाला आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा अभ्यास व्हायला हवा… ब्रिटिशही त्यांनी बांधलेल्या पुलाचे  शंभर वर्षे आयुष्य सांगतात… हा पुल मात्र अगदी मागच्या चाळीस पन्नास वर्षात बांधलेला आहे कि काय असे वाटते…  महाबळेश्वर कडून प्रतापगडाकडे ( पोलादपूर कडे जाण्याचा रस्ता ) जाताना 18 किलोमीटर अंतरावर पार कडे जाण्याचा फाटा लागतो. त्या फाट्यावरून तीन किलोमीटर आत हा पुल आहे… महाबळेश्वरला आणि पुढे प्रतापगडाला लाखो लोक जातात मात्र हा पुल फारसे लोकं बघत नाहीत पण तुम्ही तिकडे गेलात तर हा पुल आवश्य बघा आणि महाराजांच्या बांधकाम कलेला कुर्नीसाद करून… महाराजांच्या कार्याचं एक जिवंत प्रतिक बघितल्याचा आनंद घ्या…!!

@युवराज पाटील

Leave a comment