महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,516

कुठे आहे छत्रपती शिवरायांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन?

By Discover Maharashtra Views: 13451 10 Min Read

कुठे आहे छत्रपती शिवरायांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन?

एक अभ्यासपूर्ण मागोवा !

६ जून १६७४ अर्थात शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ‘ या दिवसाचा सूर्योदय साधारण नव्हता, शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधःकार दूर सारून प्रत्येक हिंदुस्तानवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा क्षात्रभास्कर आसमंत दिपवणारा होता. याच दिवसापासून महाराष्ट्राला, या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा लाभला. तो सोहळा काय नेत्रदीपक असेल नाही!(कुठे आहे छत्रपती शिवरायांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन?)

या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही!

अशा शब्दांत सभासद या घटनेचे वर्णन करतो ; आणि करावे देखील कारण महाराज ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन औरंग्याच्या छाताडावर रोवले होते.

(स्त्रोत : गूगल)

ज्याठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडंबरी बसवण्यात आली आहे. ह्या मेघडंबरीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते. त्या फटीतून आत डोकावल्यास एक काळवंडलेला दगड दिसेल. हा तोच दगड आहे ज्यावर एके काळी शिवछत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त ताठ मानेने उभे होते. त्या सिंहासनाचे पुढे काय झाले, ह्याबद्दल आज आपल्याला काहीच माहीत नाही. हे एक गूढ बनून राहिले आहे. परंतु तत्कालीन संदर्भांचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक बत्तीस मणाचे सोनेरी सिंहासन होते, हे आपण ठाम पणे सांगू शकतो.

इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळून येतो. मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी “नारायण शेणवी” नावाचा दुभाषी वकील नेमला होता. शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो निरजीपंतना २४ मार्च, १६७४ रोजी पाचाड येथे भेटला. ४ एप्रिल, १६७४ रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती कळवतो.

” नव्या वर्षांरंभी जूनमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासनशिवाजी बनवत आहे. ह्या समारंभाकरिता असंख्य ब्राम्हणांना बोलवून मोठा दानधर्म करणार आहे. परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे ते माहीत नाही ”

२५ एप्रिल, १६७४ रोजी सुरत वखारीतून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहतात,

” शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवीत असून येत्या जून मध्ये राज्याभिषेक करणार आहे ”

मराठी बखरींमध्ये देखील सिंहासनाबद्दल वर्णने वाचायला मिळतात. कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बखरी मध्ये लिहतात,

” पुढें तक्तारुढ व्हावें. (म्हणून) तक्त सुवर्णाचें, बत्तीस मणांचें, सिध्द करविलें. नवरत्नें अमोलिक जितकी कोशांत होतीं त्यांमध्ये शोध करुन मोठी मोलाचीं रत्ने तक्तास जडाव केलीं. जडित सिंहासन सिध्द केलें. रायरीचें नावं ‘ रायगड ‘ म्हणोन ठेविलें. तक्तास गड स्थळ तोच गड नेमिला. गडावरि तक्तीं बसावावें ऐसें केलें. ”

गागाभट्ट आणि अनंतदेव यांनी सिंहासनाच्या रचने बद्दल शास्त्रातील उल्लेख दाखवत अशा प्रमाणेचे सिंहासन बनविण्याच्या सुचना केल्या. सिंहासन हे राज्याभिषेक विधीतील महत्वाची बाब आहे. हे सशास्त्र बनविण्यात आलेले सिंहासन कसे होते याबद्दल मल्हार रामराव चिटणीस देखील आपल्या बखरीत नमूद करतो पण,

चिटणीस बखर शिवरायांच्या समकालीन नसल्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हा वादाचा विषय राहील. पण मल्हार रामराव हा साताऱ्यात प्रतापसिंह छत्रपती महाराजांच्या दरबारात होता. व छत्रपतींच्या दरबारात सिंहासन कसे बनते हे त्याने पाहिलेले होते आणि बाळाजी आवजींचा वंशज असल्याने काही कागदपत्रे बघूनच त्याने सिंहासनासंबंधी वर्णन केले आहे.

या मध्ये चिटणीसाच्या उल्लेखाप्रमाणे हे सिंहासन वड आणि औदुंबरा सारख्या पवित्र वृक्षांच्या लाकडाने सिद्ध केलेले होते आणि वरून सोने आणि रत्ने यांनी मढवलेले होते. बखर वादात जरी असली तरी सिंहासनाचे वर्णन उल्लेखनीय आहे.

निश्चलपुरी गोसावी यांनी केलेल्या तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन गोविंद नारायण बर्वे लिखित ” शिवराज राज्याभिषेक कल्पतरू ” नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा ई. स. १६९९ मध्ये लिहलेला असून तो संस्कृत भाषेत होते. ह्या ग्रंथामधील सिंहासनाचे वर्णन चिटणीस बखर शी मिळते जुळते आहे. त्यामध्ये त्यांनी सिंहासन ज्या आठ सिंहाच्या पाठीवर स्थिर केले होते त्यांची नावे दिली आहेत.

पूर्व- सिंह

पश्चिम – मृगेंद्रा

दक्षिण – पंचास्या

उत्तर – गजेंद्र

वायव्य – शार्दुल

ईशान्य – हरि

अग्नेय – हर्यक्ष

नैऋत्य – केसरी

ह्या संदर्भांवरून रायगडावर बत्तीस मणांचे हिरेजडित सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की. परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले ह्याबद्दल कोठेही काहीच लिहून ठेवले नाहीये. इ. स. १६८९ साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. झुल्फिकार खान ने रायगड जिंकला. राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यात यशस्वी झाले. परंतु येसूबाईसाहेब आणि बाळ शिवाजीराजे (शाहू) यांना कैद झाली.

ज्या अर्थी मेघडंबरीच्या खाली असलेला सिंहासनाचा दगड काळवंडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे नक्की. परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही

शिवरायांचे सिंहासन झुल्फिकार खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले असेल तर इंग्रजांनी १८१८ मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञे वरून सिंहासन कोण्या अज्ञात स्थळी लपवले असावे. अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात.

परंतु पेशव्यांकडे रायगडची व्यवस्था ३०/०८/१७७२ पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे. उदा. पेशव्यांनी १६ मार्च १७७३ मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर १६०८ रुपये ८ आणे खर्च टाकले आहेत. १७९७ साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी केले ज्यासाठी २७३८रुपये ४ आणे खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे झुल्फिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च ही राहिला नसता. परंतु पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन झुल्फिकार खान नंतर ही गडावर असल्याचे दिसून येते.

रायगडवरील पेशव्यांच्या काळातील सिंहासनाची व्यवस्था

संदर्भ : रायगडाची जीवनकथा (शां. वि.आवळस्कर)

आता राहतो प्रश्न इंग्रजांचा. इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संबंधी कोठे तरी उल्लेख आढळून आला असता. कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीकसारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कोठे तरी हमखास केलाच असता. त्यामुळे येथे दोन शंका उपस्थित होतात. एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा १७९७ ते १८१८ ह्या २१ वर्षांच्या काळात सिंहासनाशी संबधित कागदपत्रं (अगदी सिंहासन सकट) गहाळ झाले असावेत.

पेशव्यांच्या काळात सिंहासनासाठी असलेली खर्चाची तरतूद आपण वरच बघितली पण १८१८ साली कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल यांच्या संयुक्तिक हल्ल्याने रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही.

उपलब्ध कागदपत्रांवरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे (मोगली) कागदपत्रं सांगत नाहीत.

निकोलाय मनुची हा १७१७ पर्यंत हयात होता त्याच्या (असे होते मोगल) या मुघलांशी संबंधित पुस्तकात त्याने बारीकसारीक घटनांचा उल्लेख केलेला होता कारण तो मुघल अधिकारी असल्याने मुघलांच्या दरबारात प्रत्यक्ष उपस्थित राहत असे.

त्यामुळे सिंहासन गडावरच कोठेतरी असण्याची शक्यता दृढ होते. आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे हा संशोधनाचा विषय असू शकतो. एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपविले. तलावात का? तर सिंहासनाच्या जागेवरून लपाविण्या जोगी जवळची जागा तळेच आहे व त्याकाळी तळे उपस्ता येणे अवघड होते.

( फोटो स्त्रोत : खा. संभाजीराजेंच्या फेसबुक वॉल वरून )

२०११ च्या मटा मध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख आला आहे. पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले की, तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली. ती बाजूला केल्यावर १.२० मी खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला. गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूस सुमारे ७.६०मी लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले. या मार्गाचे प्रवेशद्वार १मी उंच आणि १मी रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे. हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरला असल्याने तो पुढे कोठ्पर्यंत व कसा वळला असेल हे निश्चित पणे सांगता येणे कठीण आहे.

वाघ – जबड्याची आख्यायिका :

गडावर पिढीजात काम करत आलेल्या शेडगे कुटुंबामध्ये श्रीपती शेडगे पर्यंत (१९५६ पर्यंत ) एक आख्यायिका सांगितली जात असे. त्याप्रमाणे १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले. वाघजबडा ह्या उतरण्यास अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या नऊपैकी सात सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपविले. सिंहासन लपवून ते सात जण वर येत असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी ( खंडोजी आणि यशवंतराव) दोर कापून वर येणाऱ्या सात सरदारांना ठार मारले. त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंदफितुरी लक्षात घेता ह्या सात सरदरांपैकी कोणालाही मोह होऊन तो सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारले. असे ही आख्यायिका सांगते.

शेवटी काय तर, सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य केवळ कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे. इ. स. १६८९ नंतर तब्बल ४४ वर्षे रायगड परकियांच्या ताब्यात होता. याकाळात रायगडावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्याच बरोबर इ. स. १८१८ मध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते. त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असतील.

पण उपरोक्त पुरावे आणि पेशवेकालीन नोंदी यांनुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे पण काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेतल्या गेला पण सिंहासन मात्र सापडले नाही त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो ; रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागला नाही ; कदाचित सिंहासन हे रायगडावरच कुठेतरी अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे.

पण सिंहासन फोडले, वितळवले, लुटले हाच आतापर्यंत इतिहास माहीत होता, हे मला ससंदर्भ खोडायचे होते म्हणून हा लेखनप्रपंच.

धन्यवाद !

संदर्भ :

कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवचरित्र
इंग्रज पत्रव्यवहार
मटा २०११ दिवाळी अंक
रायगडाची जीवनकथा- शांताराम विष्णू आवळस्कर
शिव राज्याभिषेक कल्पतरू
चिटणीस बखर
इतिहासप्रेमी भूषण गर्जे सर

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

1 Comment