स्वराज्याचे चौथे छत्रपती थोरले शाहू महाराज !

स्वराज्याचे चौथे छत्रपती थोरले शाहू महाराज ! | छत्रपती थोरले शाहू महाराजांचा खंड्या कुत्रा

स्वराज्याचे चौथे छत्रपती थोरले शाहू महाराज !

छत्रपती शंभु महाराजांच्या मृत्यूनंतर नंतर किल्ले रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज यांना महाराणी येसूबाईंच्या मुत्सद्दीपणामुळे किल्ले रायगडावरून निघून जिंजी ला जाणे भाग पाडले गेले.नाहीतर संपूर्ण छत्रपती कुटुंबीय मुघलांच्या ताब्यात सापडू शकले असते.मात्र त्याच वेळेस शंभुराजांच्या पत्नी येसूबाई आणि मुलगा शाहू हे मुघलांच्या कैदेत सापडले. त्या वेळेस शाहूंचे वय अवघे ७ वर्षे होते. त्यांना किल्ले रायगड वरून दिल्लीला नेण्यात आले. तब्बल २७ वर्षे हे माय लेक मुघलांच्या ताब्यात होते. औरंगजेब दक्खन मध्ये मरण पावल्यावर दिल्ली ला गादीचा वारस अधिकारावरून भांडणे चालू झाली. याच वेळेस  मराठा सरदारांनी मुत्सद्दीपणा करून  मुघलांच्या ताब्यातील शाहू राजांची सुटका करून घेतली.म्हणजे तब्बल २० वर्षे शाहू महाराज हे मुघलांच्या पर्यायाने औरंगझेब च्या ताब्यात होते.त्यानंतर स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सरदारांची जमवाजमव करून मुघलांच्या विरुद्ध लढा पुकारला .शाहूराजांनी औरंगजेबाच्या सहवासात तब्बल २० वर्ष काढली.औरंगजेब आणि मुघलांची एकूण वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती.

मात्र याच वेळेस तहामुळे सातारा आणि कोल्हापूर अश्या स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या.

१२ जानेवारी १७०८ मध्ये सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक करून शाहू महाराज सिंहासनारूढ झाले. त्यांनी अष्ट प्रधान मंडळ नियुक्त केले .

शाहू महाराजांचा शिक्का खालीलप्रमाणे होता.

। श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

त्यांनी पंतप्रधान आणि अनेक सरदारांना अधिकार देऊन स्वराज्याची सीमा नर्मदेपार दिल्ली पर्यंत नेली.याकामी त्यांनी थोरले बाजीराव, सरदार मल्हारराव होळकर, महादजी शिंदे,आंग्रे,गायकवाड,दाभाडे यांच्या सारखे शूरवीर निर्माण केले आणि मराठा राज्याचे “मराठा साम्राज्यात” रूपांतर केले. पहिले बाजीराव पेशवे यांनी तर आयुष्यभर छत्रपती गादीशी सेवक म्हणून इमान राखून छत्रपतींचे स्वप्न पूर्ण केले.रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना पुन्हा हस्तगत झाला.

स्वतः शाहू महाराज हे लढाई लढल्याचा उल्लेख मिळत नाही. पण राजकारणातील त्यांच्या अनुभव आणि मुत्सद्देपणामुळे त्यांनी आपल्या सेवकांवर विश्वास ठेवून स्वराज्य वृद्धी केली.

शाहू महाराजांचा कालखंड १७०८ ते १७४९ असा ४१ वर्षाचा आहे. आपल्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत चिमुकल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडवून आणले ही शाहूंची महान कामगिरी म्हणावीच लागेल. उदात्तता हा शाहू महाराजांचा एक मोठा गुण होता असेच म्हणावे लागेल.

तसेच त्यांचे चरित्र हे खूपच गुंतागुंतीचे घटनांनी भरलेले दिसते.पण इतके असूनही शाहू महाराजांनी कोल्हापूर गादीशी नेहमीच आपुलकी बाळगली . त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते.ते अजातशत्रू होते.

उत्तर कोकणात रायगडाखाली माणगाव जवळ “गांगवली” येथे छत्रपती संभाजी राजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी १८ मे १६८२ रोजी शाहूंचा जन्म झाला. त्यांचे मूळ जन्मनाव शिवाजी. पण या नावाची चीड असल्याने की काय पण औरंगझेबने त्यांना “साव” असे नावाने हाक मारावयास सुरुवात केली.त्याचेच पुढे “शावू” आणि “शाहू” असे नामकरण झाले.सध्या गांगवली इथे जन्म ठिकाण अशी काहीच जागा बघायला मिळत नाही.पण गावातील लोक ते नदीच्या बाजूचे मंदिरावजळ जन्म स्थान म्हणून आजही दाखवितात.

अशा धीरोदात्त, कुशल प्रशासक व उत्कृष्ट सेनानीचे निधन १५ डिसेंबर १७४९ रोजी झाले.

तर अश्या या स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींच्या वर सध्या खूपच कमी चरित्रे उपलब्ध आहेत. पण त्यातूनही मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेले “थोरले शाहू महाराज” हे आद्य चरित्र मानले जाते.त्यानंतर उपलब्ध चरित्रामध्ये श्री आसाराम सैंदाणे यांनी लिहिलेले “छत्रपती थोरले शाहूमहाराज” हे ही प्रचंड अभ्यासपूर्ण चरित्र आहे.

आपणही अश्याच अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करून इतिहास जागवता ठेवला पाहिजे आणि हा वारसा पुढील पिढीला दिला पाहिजेच. त्यातूनच पुढच्या पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास उमजेल.हाच हा लेखमागील प्रपंच.

बहुत काय लिहिणे? अगत्य असू द्यावे.

– किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here