धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३३

संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३३…

बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईच्यावरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती.

राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले, “शंभूबाळांचा विवाह!’ ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील ‘“आबासाहेब’ मोहरून उठले

होते. क्षणभर राजे औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरूनच गेले! त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावळ्या बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली!

शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, “बरी बात काढलीत बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दु:ख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला.”

ते ऐकताना बजाजीमामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या, निमुळत्या डोळ्यांसमोर आंबराईचा रसवंत घेर

असलेले शृंगारपूर उभे ठाकले! त्यांचा दोनच मूर्ती दिसू लागल्या – शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता – भावेश्वरी आणि – आणि – पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी भावांची राजस कन्या राजाऊ – जिऊ!!

👉राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटक येण्यासाठी बलावू धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजगडावर आले.

राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदेरच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिलाजीवर शिर्क्यांना शब्द टाकला, “आमचे महाराज साहेब गेले… त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं

शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सूनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदरसाक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला.”

👉राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरोरीने राजांनी कशासाठी बलावू धाडले, याचा त्यांना आता उलगडा झाला! पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले, “राजं, ही वळचनीची गंगा पार आड्याला न्यायची गोस्ट काडलीसा. तुमच्या पायाजवळ हुबं ऱ्हायाची लायकी न्हाई आमची! बाळराजांच्या साठनं लग्नाला पोर पायजे असा कवाबी हुकूम क्‍्येला असतासा, तर आनून पायावर घातली असती. या परास काय सोनं व्हनार हाय तिच्या जल्माचं?” पिलाजी, राजांचे थोरपण नजरेआड न करता, कळवळून मनचे बोलले होते.

“नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय; पण कुणाच्याच घरची मुलगी हे ‘घरधन’ आहे. ते त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे,

तर आमच्या सूनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव. ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे! म्हणूनच आमच्या

कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या, असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत! बोला. हा साटेलोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो?” राजांनी हसून पिलाजींना सवाल केला.

जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता ‘जी’ म्हणून पगडी डोलाविली.

वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ, नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा, नमस्कार रुजू केले.

सदरबैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊजवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यांत समोरचे राजे मावत नव्हते! सदरेकडे बघत राजे म्हणाले, “शृुंगारपूरकर पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजाऊ आमचे फर्जद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदरसाक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत.” राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तबकातील कुंकू घेऊन त्याची

आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले.

पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबुज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे, यासाठी नजरेनेच जाबसाल झाले. सदर खोळंबली होती. चिकाचा आडपडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला ‘ओक्षवंत व्हा! असा तोंडभर आशीर्वाद दिला!

पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले-शिर्के रक्तसंबंध पक्का झाला.

दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदरबैठकीला अदबीने बसले.

लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत, असे सर्वांच्या सल्ल्याने ठरविण्यात आले. सदरभर खारीक-खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले-शिर्क्याच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली.

पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पाणथेंबाच्या अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली! मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या

दर्शनासाठी दौडू लागल्या! आता चार-पाच महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभूबाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करवून घेऊ लागले.

पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत

होत्या.

जरीशेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक

बोटांना हात लावून, तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडावळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाने राजांचे उभे

अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सूनबाईच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले, “औक्षवंत व्हा! यशवंत व्हा!”

झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उठते केले. लग्नसाज घेतलेल्या, टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात

बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले, ‘आमचे शंभूबाळ…

एकला जीव – पदरी आणि राजे स्वत:ला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन

गेला, ‘सई, एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या की, एकट्या जिवाचा पायमाग घेत आणखी क्रणानुबंध

असलेले जीव यायचे असतात!! आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या.’ जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले! !

रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजतगाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेझमांचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधू-वरांवर सोनमोहरांचा सतका उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले.

मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट, हात पसरते करून सखूबाईनी रोखून धरली! आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला, “बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल?”

शंभूराजे गोंधळले! नेताजींनी त्यांच्या कानांशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली.

री शंभूराजे हसत सखूबाईना म्हणाले, “आली आमच्या घरी, तर देऊ तुमच्या दारी!”

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here