महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३२

By Discover Maharashtra Views: 3201 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३२…

बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की, “’शंभूबाळ तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखेच दिसता.’ पण त्या काहीच

बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यांत बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या!!

बजाजीमामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट-मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले, “आम्ही

फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल, तर संगती बाळराजांना घेऊ. त्यांना तेवढाच कुटुंबपालट होईल. कसं करता?”

बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईची आठवण झाली आणि जाणवून गेले की, “शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला – सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको!’ क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, “जरूर घेऊन चला, बाळराजांना बजाजी!

पण मासाहेब काय म्हणतात, ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी-रायजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं. तुमचा काळीजगुंतवा आम्ही जाणतो. पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा.”

“त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यांत तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू ” राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल

होईल, याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महालाबाहेर पडले.

जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभदिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा

आणि राणीवशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप, आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदरमहालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे दोन मुलगे

अंतोजी-रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले.

राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले.

“या. सांभाळून असा.” बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले.

शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाकेठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू

लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणेबांड रायाजी- अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे रुतती

धरून पालखीमागून चालले. आदिलशाही बाकदार किमॉश डोक्यावर असलेल्या बजाजीमामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना

“फिकीर नसावी’ असा भरोसा दिला आणि तेही पालखीमागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एकनजर बघतच राहिले. सईबाईची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील

सईबाईंना म्हणत होते, ‘आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं, तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी – फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेटी झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराजसाहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही. तरीही “एकला जीव पदरी घातला! म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलंत! जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत, करणार आहोत. पण – पण या दुनियेत आलेला हरएक जीव एकलाच असतो. स्वत:च्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो!

▶ किरणे कलतीला आली असताना फलटण नजरटप्प्यात आले. बजाजीराजांनी गाववेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठविली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा, ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला.

बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले.

कारभाऱ्यांनी एक पायबांधलं जितं कोंबडं शंभूराजांच्या वरून उतरून दूर फेकून दिले. शंभूराजांनी आपल्या चारी मामेभावांची ऊरभेट घेतली.

आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामेभाऊ यांच्यासमवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातुश्री-आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश, आपला घडीव दगडांचा, चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, “बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा!”

मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा नि कसा भिडला, ते बाळराजांना कळलेच नाही!!

समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद, थोर दरवाजात आले. सुवासिनींनी आरती-तबके फिरवून त्यांची

ओवाळण केली. सोनमोहरांचा सतका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे, त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती.

“चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू.” बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले.

हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बालराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरती बिछायफिरवू फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली. त्यांच्या डोळ्यांस डोळा लागला आहे, असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिराखदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती.

आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला; पण… पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते!

जागेपालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती! एकच एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता – लागणारी ओढ असह्य होत होती – “कशा… कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब?” त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या – “कशा – कशा दिसत होत्या आऊसाहेब? का – का आठवत नाही त्यांचा चेहरा?’ पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडपड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसलीतरी खडखड स्पष्ट ऐक्‌ येऊ लागली. त्या दालनाच्या

खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारेझोत सूंकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोख घुसला होता!!

तो सूंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यांसमोर एकामागोमाग एक स्त्रीमुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब, पण… पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वाणात उजळून निघालेल्या होत्या!! त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा-आसरा घ्यायला त्यांना “’सावळेपण’ पाहिजे होते! मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते, म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्याधमक प्रकाशाने भरून गेला होता!

बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सूंकार येतच होते. घायाळ झालेले

शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकुतली होती. ‘आऊसाहेब?’ अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी, असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे

पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वाससुद्धा घुसमटत होते! कोंडी, कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढेतरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती!!

मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती ‘सावळी’च दिसत होती!! तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले, “धाराऊ, आऊसाहेब!” त्यांच्या दाट कुरळ्या केसांतून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली,“भिऊ नगा, म्या हाय न्हवं!” आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले.

पलीकडच्या दालनातील दारांची थडथड आता निसूर झाली होती. वारेझोताचा सूंड्कार आल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निबाळकरांच्या वाड्यातील

“बाळंतिणीचे दालन’ होते! कैक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईचा जन्म झाला होता!!

धाराऊला, शंभूबाळांना ते काही-काही माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेल्या फलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संथपणे वाहत होती!!

▶ थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजीमामांच्यासह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंतसिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती.

राजगड सोडून खासे राजे अहमदनगर-औरंगाबादेपर्यंतचा मोगलाई मुलूख जेर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट, जसवंतसिंगाची माघार, मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा तापू लागली. आपल्या या हालचालींचा नतिजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याने पावले टाकील, याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंजवणीच्या वळणदार पात्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकांत पुन्हा पुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दीसुद्धा ते विसरून गेले होते!

राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, “आम्ही परतावं म्हणतो राजे.”

राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले, “एवढ्या जरोरीनं निघणं करताहात बजाजी?”

“जायला पाहिजे राजे. मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी दिली.”

“तसदी कसली? बोला.” राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले.

“थोरले महाराज गेले…” म्हणजे क्षणभर बजाजी शहाजींराजांच्या आठवणीने

गप्प झाले.“होणारं चुकत नाही राजे. माणसाच्या हयातीचं माणसाच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना आम्हाला कैकवेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत! घरात मर्तिक घडलं असता, एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणं तीन वर्ष काही शुभकार्याला हात नाही घालता यायचा!!”

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३२

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

 

Leave a comment