धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३०

By Discover Maharashtra Views: 2426 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३०…

राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रा दासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेणमळल्या कुंकवाची दोन आडवी बोटे

रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या ब्िंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, “ही कुंकवाची दोन बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे!’ आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वत:च खुशदिल झाल्या.

“खाशी स्वारी येत आहे.” वर्दीवाल्या कुणबिणीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंदा दासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईचे दर्शन घेऊन, साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता.

भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणारा कसलातरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता.

राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशरदुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, “बाळीबाई कुठं गेल्या?” बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. “त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतील त्या!”

सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता-

जाता बोलले, “रमविलं की सारे रमतात!”

महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे दोन मोतद्दार, एका उंच उमद्या जनावरावर मांड घेतलेला महमद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौटाप दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले!!

राजे न राहवून उदरिले, “भले सैस.” सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. दोन-तीन वेळा महमद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पायउतार

होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, “अब ले लो सवारी छोटे राजासाब!”

बाळराजांनी आपल्या हातांतील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मांड जमविली. राजे आणि

सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्यापार झाले… पण-पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले!! राजे ते पाहताना शिवगंध आक्रशीत गंभीर झाले.

पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या!

दोन-तीन वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही! राजे हैराण झाले. अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, “छोटे मालिक, छलांग जम गयी. अब ऑँख जानवर पर मत रखना,

रखना निंबूपर! फेकिये जानवर.”

बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या

खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले!!

न राहवून एकदम टाळी देत राजे बोलून गेले. “बहोत खूब!” त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या.

बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण – पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्यासकट कोलमडून कोसळले!!

“र्‍या अल्ला!” म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, “जब घोडा

फिसलता है, तो पहले रिकीबका पैर खुला करने मत भुलना छोटे मालिक! नहीं तो डरा हुआ जानवर खडा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलचाहा दौडता हे!! भोत

खतरनाक!” “हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं!” सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या. “कोसळले तरी उठतात! जोत्यापार अचूक जनावर फेकतात! आम्ही येतो. बाळराजांचा निरोप घेणं आहे,” म्हणत राजे सोयराबाईच्या महालातून तरातरा चालत

बाहेर पडलेही!

नेताजी, तान्हाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खूरचलाख घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याला दीड महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेत बाणाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती!

सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीने “बसा मंडळी” म्हणत, आपण जाऊन बाळराजांच्यासह सदरबैठकीवर बसल्या. त्यांनी ‘बसा’ म्हटले तरी सदरेवरचे कुणीच खाली बसले नाही! रोजच्यासारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यांवर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या, कातरल्या सुरात बोलल्या, “मंडळी, खामोशी का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी -” जिजाबाईंना पुरते बोलवलेसुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशीतरी मान वर करून सांगितले, “न्हाई, राजं ब्येस हाईत, सुरत लुटून परतीच्या वाटंला लागल्यात. पर” सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलावे, तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले.

“मग काय असेल ते पेश करा.” जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार नि दार निळोपंत

खालमानेने कसेतरी म्हणाले, “मासाहेब, बंगळूरहून बिगरपगडीचा थेत आला आहे!”

“मतलब?” जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुमबोटे क्षणात आक्रसली!!

“थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले, सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला

आणि…” पंत घोटाळले. “आणि… आणि काय पंत?” जिजाबाई कळवळून कशातरीच बोलल्या. “आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला! रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज… थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले!!”

निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत,

दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालच्या कैक डोळ्यांतून टपटपणारे अश्चू ओघळले आणि उरावरच्या बाराबंद्यांत विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थर-थर-थर हलू लागली. त्यांची सगळी जाणच जशी काही सुन्न-सुत्न झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागली! “न भेटता, न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली?” असे तिडिकेने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात

झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकबावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशीक मनाचे देवटाके पुरते-पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत, पांढऱ्या नेसूच्या, फटफटीत कपाळाच्या जिजाऊ, थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत

आत निघून गेल्या.

सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानांत महमद सैसची घोडेपारखी जबान घुमून उठली, “जब घोडा फिसलता हे, तो रिकीबका पैर खोलने पर मत भुलना!

नहीं तो..’ आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले!!

क्रमशः

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment