धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २६…

By Discover Maharashtra Views: 3615 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २६…

सगळ्या मराठमनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना या वेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनौबत माणकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला.

स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी “माणिक ‘ हरपले.

राजांनी आपल्या कारभारव्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकेनविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळीबांगडीचा मानकरी आला!

सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडेनवमीला पूजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळांनी खासेमहालाच्या हमामखान्यात पहाट-स्रान आटोपले.

अंगावर जगदंबेच्या भुत्येपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी

जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, “आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या पाच उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत! आशीर्वाद द्यावा. कुणा-कुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं, त्याचा सल्ला सांगावा. ”

“राजे, जे पोख्त, कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भुत्येपणाचे हात पसरा. थोरांचे पहाटदर्शन कार्यी लावणारं असतं!” जिजाबाई म्हणाल्या.

जिजाबाईचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या

भोसल्याला घेऊन चालला! एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली! जगदंबेची परडी मागण्यासाठी! दोघांच्या हातातील परड्यात हळदी- कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या.

राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते! लाखो होनांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती, तो “शिवराज ‘ आज “योगिराज’ झाला होता! उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गढचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर

राज्य करणारा तो भोसलेकुळीचा “यादवराज ‘ जगदंबेचे भुत्येपण मिरवत पायी चालला होता! त्याच्याबरोबर त्याच्या अग्रनिवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला

होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते, तसे ते दृश्य होते.

हरएक “भोसला ‘ जगदंबेचा जन्मानेच नामजाद “भुत्या ‘ असतो! हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी चौऱ्याऐंशी लक्ष दारादारांत फिरवते! एका हातात परडी

आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते! ही परडी मागितली की, अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशीग भरून देते! मरण गाठीशी बांधणारे,

आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीज देते! भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शरमिंदेपण?

राजगडावर झाडापेडांवरच्या पक्षीलोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाटवाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली.

बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर सडासंमार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आणभाक बांधील “श्रीमंतयोगी ‘ आपल्या बज्ष्यासह उभा ठाकला! परडी सावरून राजांनी उदेकार केला – “आईचाऽऽ उदेऽऽ!”🚩

शंभूबाळांनी तो उचलून धरला, “भवानीचाऽऽ! ”

डबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांच्यासह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदबमुजरा घालून ते खालगर्दनीने कसेतरी म्हणाले, “आज्ञा झाली असती, तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. ”

“नाही पंत,आम्ही आज – या क्षणी राजे नाही. आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भुत्ये आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच! शिधा वाढा.” राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून

राजांच्यावर जोडली. समोरचे थोर “शिवपण ‘ आणि धाकुटे ‘शंभूपण ‘ बघताना त्यांच्या उतार डोळ्यांत पाणकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे, आणि

राजांच्या अनवाणी पायाची सडक, रक्तजागती, सतेज बोटे त्यांवर मस्तक ठेवून डोळ्यांतील पाणकळ्याने साफ-साफ धुऊन काढावीत.

पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळभरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार

नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने

सोनकिरणांचे वाण मावळमुलखाच्या परडीत घालू लागले लागले होते!

पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओं भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, “भवानी आईचा उदं! ”

राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की, त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता, तो फक्त गड उजळणारा प्रकाश!

नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी चार जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेषात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला, राजगडाला ऐटदार फेर भरलेली ‘गडमाची स्वतःलाच म्हणत होती – “आदिशक्तीचे हे

कवतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या! ”

उन्हतापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. मासाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वत:संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची

मांड तयार करून घेत होते. महमद सैस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पहचान करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत, याची जानकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले.

घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्याच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झकमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा, गड- उतार होताना सावध चालीने जपून एक-एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी चघळत ध्यान धरणारा घोडा अशी घोड्यांची कितीतरी रूपे, शंभूबाळांच्या राजमनावर टांकसाळीतल्या सोनेरी होनावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली.

गोमाजीबाबा पानसंबळ “धाकल्या राजां’ना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्टयाचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगीतच पुन्हा मागे कसे घ्यावे, यांची जुजबी टिगळ देऊ लागले.

जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण-महाभारतातील भुजबळ, निधड्या असामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना मायाभरले जाब देऊन त्याचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बळजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणार हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन,

धरतीने फितवा करून फसविलेले रथचक्र उठविण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्रांकडून परतलेला भरत, कैकयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या असामी बाळशंभूच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या!

क्रमशः- संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment