धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २५

By Discover Maharashtra Views: 3656 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २५…

देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंबकबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र “घुई घुईऽऽ ‘ करीत घंगाळात डुबले आणि राजांनी “जय जगदंब ‘ म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची ‘उदं ग अंबे उदं’च्या

गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्यजोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता.

रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ-माणसांची खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते. पीळदार पगडी, घोळदार डौर आणि चुणीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता. कुणाच्या हातात चवंडकं, तुणतुणं. डोक्यावर करंजेल घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्याकोनाड्यांत फरफरत होते. राजे सदरदाखल होण्याची सारे उत्सुकतेने बाट बघत होते.

पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदरदाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या

उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेष आज अंगावर धारण केला होता! ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजेपण नव्हते; होते ते भाववेडे भक्तपण!

राजे बाळशंभूसह सदरबैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरेसामने आला. मुजरा घालून म्हणाला, “आईचा मानाचा पोत पेटता करून आपुन त्यो नाचवाय पायजे धनी. ”

“जशी जगदंबेची आज्ञा,” म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्‍्याने दिलेला, पाच पेडांत घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो

मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला! गोंधळ्याने आपल्या

हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला.

चवंडकं, तुणतुण्याने साथ धरली.

▶ “आई – राजा – उदंऽऽ उदंऽऽ!” म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्यातरी दिव्य तेजाने पेटून उठले!

डौराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजलखान दिसू लागला! राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले! पाठकण्यातून पांढरीधोट घोडी सुसाट धावताहेत, असे त्यांना क्षणभर वाटले. ‘हे असंऊ असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हांस वाटलं होतं! या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं – पेटतं आमच्या

नसानसांत दबा धरून आहे! ‘ क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यांतील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले!

“आई – राजा – उदं उदंड!” म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वत:भोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदरबैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताठ झाला! राजांच्या हातात थयथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते.

पोत नाचवून दमगीर जालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोतधरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या-पिवळ्या

प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुऊन काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदरबैठकीकडे नजर जोडून म्हणाले, “बाळ शंभू, असे चौकात या. ”शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूच्या हातात देत राजे त्यांचा छोटेखानी खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, “तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं!” सारी सदर डोळे टवकारून बघू लागली.

गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली! आणि राजे सदरपायऱ्या

चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले.

▶ शंभूने शेरनजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितलं. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गर्जला – “भवानी – राजा – उदंऽऽ

उदंऽऽ!” आणि त्या बालरुद्राच्या हातातील पाचपेडी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडेच जायचे बंधन उरले नाही!!

सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले! मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वत:भोवती

ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता-हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर

उतरली! केस मोकळे सुटलेले शंभो, चौफेर थयथय नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते, “भवानी – राजा – उदं उदं उदंड उदं!!”

फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या.

बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदरबैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलांकडे चढली आणि कटाकट मोडली गेली! थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत

किलकारी दिली, “हरऽऽ हरऽऽ हर म्हादेव!” भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोतधरला हात

थरथरू लागला! अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ

लगबगीनं सदरपायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्याच्यावर नजर जोडून तो गोंधळ्याच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदरबैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या

तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डौरावरून फिरू लागला!

गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू-हळदीचा गुंतवा केलेला लाल-पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात

माखून गेलेली चौसष्ट कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत बाकून हातातली परडी पुढे करीत म्हणाला, “ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भुत्येपन घेतलं की, ही परडी

कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पुजाय लागती. नवरात्रात आईची परडी पाच घरं मागाय लागती!! ”

▶“आम्ही आनंदानं जरूर मागू,” म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले! गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ, तुणतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले –

“गजवदना, गणराया गौरी –

मज तारी हो सुखसजना

समरण तुझे पायी पद्मागौरी,

भुत्या विनवी हेरंबा मज तारी

गजवदना, गणराया गौरी -”

🎪नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली.

“र्‍या गोंधळासी माये, लवकरी यावे!

🔔अंबे लवकरी यावे,

चौक भरिला कोसरी

लिंब, नारळ नानापरी

उदबत्या लावून चारी

महापूजा मांडिली साजरी –

या गोंधळासी माये, लवकरी यावे!

कुठवर आई पाहू वाट?

माझ्या नेत्रा भरला ताट

लवकर सोडा बालेघाट

माये, लवकर चाला वाट –

या गोंधळासी माये, लवकरी यावे!

संबळ, तुणतुण्याचा नाद

पोत पाजळला घालून साद

आपुन यावं देऊन दाद

अंबे, माये सोडून वाद

या गोंधळासी माये, लवकर यावे! ”🐚

गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवा उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि

सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले,

🚩🔔“आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले|

पंचभुतांचा देह-पोत हा, त्रिगुण गुणी वळला।

चैतन्याची ज्योत लावुनी, प्रज्वलित केला।

चित्तस्नेहे प्राण वाहुनी, ज्याला स्थिर केला|

आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले!

उदर परडी देऊन हाती, ब्रह्मांडी फिरवी।

लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा, मागविली बरवी।

ज्या-ज्या घरी मी भिक्षा केली, ते-ते घर रुचले।

आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले!

सकाम कर्मे कवड्या यांची, माला मम कंठी।

कर्मफळाचा कुंकुम मळवट, माझ्या लल्लाटी।

पीडा-बाधा शकुन सांगुनी, लोकां भुलविले।

आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले!!”

गडावर रात्र चढीला लागली. सदरचौकात भवानीकथा चढीला लागली! राजांच्याबरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले ‘भुत्येपण ‘ पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की, “आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस-रात्र गोंधळात त माजविणं पडतं!!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment