धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २३

By Discover Maharashtra Views: 3614 6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २३…

राजगडाच्या पालीदरवाजावरची नौबत लयीत दुडदुडु लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या अकरा महिन्यांनंतर! पद्मावती माचीचे तटसरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदरचौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदरचौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिललगाव साद घातली,

“आबासाहेब! ”

राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, “जौहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सिताब फोडला पण… या दोन हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव!” हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कबड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले.

समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या! राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्त्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यांत भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणारा नव्हता!

हे असले “राजेपण ‘ जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले “आऊपण ‘ जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले “बालपण ‘ शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते!!

शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले चौपन्न दिवस खानाशी भांडला. पंचावन्नाव्या दिवशी चाकणचे किल्लेदार

फिरंगोजी हातांतील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी “राजांचे दुखणे ‘ आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा

आदिलशहाच जबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला! पुन्हा आक्रमण! पुन्हा घोडेधाड! टापांखाली पुन्हा मुलूखतोड!

पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली

बोलावून घेतले. सईबाईची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले,

“बाळ शंभू, “वेढा ‘ म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलंत! ते आम्ही सांगतो. जे- जे सामने असलं की तोडता येत नाही, आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही त्याला – त्याला ‘वेढा ‘ म्हणतात बाळराजे!!!”

राजांचा आवाज सईबाईच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यांतील काळ्याशार बाहुल्यांत आपणाला हवे असलेले “सावळेपण ‘ धुंडीत होते.

बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एकनजर बघत निर्धाराने म्हणाले, “नाही आबासाहेब! आम्हास ‘वेढा  म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता! किल्ल्याबाहेर

पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात त्याला – त्यालाच ‘वेढा ‘ म्हणतात आबासाहेब! ”

हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की,

“बाळराजे, वेढ्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत !!

रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती, तशी त्यांची “भोसलाई नजर ‘ आपोआपच तयार होत होती. नस्लबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगराला वारेझोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकारायला शिकवावे लागत

नाही. जिजाऊंचा महाल सोडला, तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी- रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना – गडावरच्या अठरा कारखान्यांचा कानुजाबता राजांनी कसा बसविला आहे, हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दरजी महाल, चौबीना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या बारा महालांतील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे तै ऐकत होते. “धाकलं राजे ‘ म्हणून लहान-थोरांनी घातलेले अदबमुजरे रुजू करून घेत होते.

धाकुटपण पंतोजी-गुरुजींपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजाणपणी हटले जाते, त्यांना परिस्थितीच उदंड शिकवीत असते. आणि

ज्यांच्या पदरी मरण जीनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बल्चा होण्याचे फर्जदपण येते, त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते!!

दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहारतलबखान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला.

या वेळीच राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोडसैन्याने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजापुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपूरच्या रोखाने

परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव – बाळाजी आवजी!

संगमेश्वर-पालीमार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन थडकले. गावातील सुर्व्यांच्या गढीतील अन्यायाला गड्डा असलेले सिंहासन वगळले, तर गाव मोठे राजस – देखणे होते! झाडांचा अंगहिरवा गर्दावा आणि आंबरायांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की, सूर्यराव सुर्वे डायाडौल होऊन गढी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्द्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलबारबाज असून तो गढी लढविण्याच्या तयारीत आहे! माणूस इमानाचा आहे.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २३ !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment