महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१

By Discover Maharashtra Views: 3607 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१

..शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली!
जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळविणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका-सवाल विचारायचे होते. पण राजे राजगडाकडे परतले नाहीत.

खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधीत जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, बाळवा, अष्टी, कऱ्हाड अशी ठाणी दास्तानी लावीत, नेर्ले, कामेरी, बत्तीस-शिराळा, पारगाव, कोडोलीमार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले.

पुरता राजगड आता आनंदसागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरांवर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर
असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणीबशातील राण्यांत चढीला लागले.
एके दिवशी खासेमहालात साऱ्या राण्यांच्या वेढ्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, “बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? ”
हो. कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही!” बाळराजे उत्तरले.
“ते का?” सोयराबाईंनी विचारले.
“थोरल्या आऊ म्हणतात, ‘आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ! गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की, मनास खोडा पडत नाही. पाय वाकडा जात नाही! ”

त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत
आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली!

चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता सहा महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक
दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, “जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. ”
जिजाबाई शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत
नव्हती. जबान कशी खुली करावी, हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, “नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला.
आमचा अंत पाहू नका. ”

आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरल्या भरड्या आवाजात कसेतरी बोलला, “घात जाला मासाब! हबशी जव्हरच्या वेढ्यात महाराज पन्हाळगडावर फसलं! गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय! ”
“नाईक!” जिजाबाई कशातरीच ओरडल्या. त्यांचे अंगन्‌अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी
बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घेऊ लागले.
काळजात कैक कढ दाटून आले. “किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजांनी दौडावं? सुखाचा माग धरून किती संकटं जिंदगीभर त्यांच्यामागं हात धुऊन लागावीत?
राजे! राजे! वेढ्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं “आऊपण ‘ फसलंय! तुमच्या या शंभूबाळांचं ‘फर्जदपण ‘ वेढ्यात फसलंय! उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीय! काय करावं? ”
काहीच न बोलता जिजाबाई सदरबैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या.
प्रसंगी त्या साऱ्यांना धीरदिलासा देत आल्या होत्या. पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबे शिवाय जाणतं दुसरं कोण होतं?

राजगडावरून जिजाऊंची तातडीची फर्माने बारा मावळात मुलूखभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा, हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते.
जौहरने वेढा भरून पुरते दोन महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळागडावरचा नाग-सोनचाफ्याचा दर्वळसुद्धा हूल भरून बाहेर निसटणार
नाही असा बळकट -बाका वेढा सिद्दी जौहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाईखान, सादतखान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजलखान,रुस्तुमेजमॉ, बडेखान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबतखान सिद्दी जौहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता!
नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या! पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढली.

जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊलोकांना कूचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या.
सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे, काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावलेय काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, “वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती
वेढा फोडायला!” ते बालबोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची
यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना “शंभूबाळांना जपा ‘ असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. ‘बाळराजांना जपा ‘ म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले! त्यांचा
हा अजाण पोर विचारतो आहे, “वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? ”

दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि, ‘ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला
पीळ पडतो, त्याला “वेढा ‘ म्हणतात बाळराजे! ‘ असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले, पण त्यांनी आपल्या नातवाला काही-काही सांगितले नाही. बाळराजांच्याकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिष्यांच्या भाकीत-बोलांची याद आली, “आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत!” आणि उगाच जिजाबाईंना वाटले. “आता आपण गड उतरलो की, तुम्हाला फसविणाऱ्या सर्वांत मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ! ‘ आता
जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ, घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. “भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही ‘, हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या!

एकाएकी गडाच्या पालीदरवाजावरची नौबत दुडदुडली. पाठोपाठ वर्दी आली “सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालासह गड चढून येताहेत! ”
बाराबंदीवरून, कंगणीदार पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती.
“र्‍या सरलष्कर, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत! त्यापूर्वी तुमचीच वाट
आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या! मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं, असं आम्ही ऐकून आहोत! आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल!” कढभरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलसे बोलल्या.
भिजल्या अंगाचे, भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, “मासाब, गडलोट करा पर असं तोडू नका! हत्यारं तुमच्या हाती द्याया आमी काय म्येल्या माऊलीच दूद न्हाई प्यालो. वेढा पडला म्हून इमान न्हाई पडत. राजं सोडवू मगच पायधूळ घ्याया येऊ. येतो आम्ही.” जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून
नेताजी वळले.
त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो, हे जाणवून जिजाऊ

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment