महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८

By Discover Maharashtra Views: 3645 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८

राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्रान आटोपून शिवलिंगपूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले. राणीवशाच्या महालात
त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपीआड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंचा खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्याच्यासमोर क्षणभर घोटाळले. एकवार त्यांनी त्या रित्या महालावर
नजर लावली – आणि भरल्या मनाने झपाझप ते सदरचौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी कावजी, सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले.

शंभूबाळ बाळ कुठं आहेत बघा.” राजांनी आज्ञा केली.

भ ‘जी, ” म्हणत सिदोजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले.

धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाईमाणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून
शंभूबाळांचा हात सोडून ती थांबली, पण ते कसले हट्टी! त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकणभरला, गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, “या धाराबाई, बालराजे ऐकणार नाहीत!”

“जी,” म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायांवर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहाना जिरेटोप घट्ट बसला होता.
त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळुवार वर उठविले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून बाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, “बाळशंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात?”

“जी. आबा, तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार!” शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले.

“ते कशाला? ”

“आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला! थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात! ”

शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला.

“धाराऊ, शंभूबाळांना घ्या.” निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले.

“चला मंडळी,” म्हणत राजे सदरचौकाबाहेर पडू लागले. निम्मीशिम्मी फरसबंदी ते चालून गेले असतील, नसतील तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थबथबलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. “शिवबा! आमची गाठभेटी न घेता चाललात! आम्हांस पाठमोरे झालात? ”

पाठीवर थाप भरणाऱ्या, चंदी-खरारा करणाऱ्या घोडेपारख्याने मागून इशारतीची साद घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे
राजे गर्रकन वळले! तरातरा चालत त्यांनी सदरपायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतीलग लडालड हिंदकळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेला हबके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडविण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले.

त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, “उठा, कोण म्हणतं, आम्ही तुम्हांस रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच कर्चादिल नव्हता. असणार नाही! सुखे जा! आमच्या शंभूबाळांचे – तुमच्या दादामहाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खातमा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत.” “घ्या,” म्हणत जिजाबाईनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी
तळहातावर ठेवल्या. त्या ओठांआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यांत पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे!

“या. औक्षवंत व्हा! आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे!” जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्यातरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे, असे राजांना वाटले.

“येतो आम्ही!” म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले.

“मासाहेब, शंभूबाळांना जपा. गोमाजीबाबा, फिरंगोजीबाबा, सिदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी! ”

शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदरचौकाबाहेर पडले. राजगडाच्या
बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. चार तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कूम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेले दोन मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात
भिडवीत राजे उतरले. मशालींच्या प्रकाशात ते पद्यावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते – “आमच्या भोवती असंच भुयार आहे… खानाच्या
बळजोर फौजेचं! असाच अंधार दबा धरून आहे… दगाबाज फितवेखोरांचा! एकच आधार आहे, मशालीचा. आई भवानीच्या आशीर्वादाचा!!’

भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीकसारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक
असामींसह ते माची सोडून पाली दरवाजाने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली

राजांची घोडे-तुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली.

बालेकिल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते.

रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तक्तपोशीकडे एकनजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांनी ओढ असह्य झाली की, त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता.
निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, “भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही.” पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की, “भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण… पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप? लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली. आता
त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेताहेत.

“हे विचारतात खान म्हणजे काय? कोण आणि कशी यांची समजूत घालणार? आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात! कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्याचा थोपा करणार? धाराऊनं यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार? आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले. हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाच पणास लागले. अफजलच्या मनचा हेतू घातकी आहे. शिवबांचं काही बरं…. ‘

त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या जिजाबाई सर्रकन थरारल्या. जिजाऊंना काही- काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या
पाठीवरून फिरत होता. नुसताच फिरत होता.

राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. सत्रानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच
शिवगंध रेखीत असत. शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध-अष्टयंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल, असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजसगोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूंच्या शिवगंधरेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूं च्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला – ‘गंध रेखले की ४ ची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते! पण… पण
शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावर क्षणभरसुद्धा ढळवू नकोस. तार, आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार!

क्रमशः………..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a comment