धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग – ११

▶धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या
महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईच्या पायांना हात लावून तीन वेळा
नमस्कार केला.

“धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपविण्याचा आमचा इरादा
आहे. तुझी कूस इमानाची. तुझी मुलं राजांच्या शिबंदीत. म्हणून ही बात आमच्या मनी आली. ”

“सांगा जी. आमी पायाची माती.” धाराऊ आदबीने म्हणाली.

👉“नाही! धाराऊ आता तू बाळराजांची “दूधआऊ ‘ होशील. आमच्या
शिवबाराजांच्या शंभूबाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो.
तुझा इरादा काय? ”

नुकत्याच दगावलेल्या आपल्या सहा महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सयीनं
धाराऊचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे, यावरच तिचा विश्वास बसेना.
बसावा तरी कसा?

“राजांच्या लेकाला माजं दूद? आमी कुनबी, गरिबांची थटा व्हतीया जी धाराऊ कळवळून बोलली.

“इमानी माणसांची थट्टा करण्याचं आम्हांस कधी साधत नाही. तुझा ‘हो ‘
ऐकायला आमचे कान आतुरलेत. ”

“जी!” धाराऊने मान डोलविली.

जिजाबाईनी आपल्या हातांनी धाराऊची खणा-नारळानं ओटी भरली. तिला
घेऊन त्या सईबाईच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या,

▶“सूनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही
व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील! ”

थरथरत्या कृश हातांनी सईबाईनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले.
धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहवून त्या म्हणाल्या, “आजपासून तुम्ही
यांच्या मांसाहेब. आम्ही नावाच्या उरलो.” सईबाईचे डोळे भरून आले.

“तसं का रानीसाब? पापनीला पानी आनू नगा. ज्येनं आबाळ हुबं क्येलंय त्येनं
पंखंबी दिल्याली असत्यात! राजांचा ह्यो दिवा माज्या जिवाच्या पदराखाली औक्षवंत
हाय! ह्येची आबदा न्हाई करू द्यायची म्या!” धाराऊचे कनवाळू कुणबी काळीज बोलले.

त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या! श्रींच्या कल्याणकारी
राज्याची आणभाक शंभूमहादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका
कुणबिणीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभूबाळांच्या दुधाच्या “धारेची ‘ ‘आऊ ‘
बनली होती!! जगदंबेनेच त्या दोन जिवांची सांगड जोडून दिली होती!

राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर
दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बालेकिल्ल्यातील जान्हवीच्या आणि
ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मुरून जात होते.

धाराऊचे दूध आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात
केली होती. राजांचा “ल्योक ‘ आपल्या पदराखाली पितो आहे, या जाणिवेने कधी- कधी
धाराऊचा पान्ह्याचा ऊरलोट एवढा उफाळून येत होता की, बाळराजांचे पोट भरले तरी
तो ऊर बंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकड दूध, एक थेंबही खाली न सांडता
फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने
खळाळून धुऊन टाकत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईनी तिला
विचारलेही, “धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? ”

“सरकार, अंगच्या दुधाला मुंगी डसू ने! मुंगी डसली तर दूध कमी व्हतं नव्हं!”
असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला.

तो ऐकताना सईबाई मात्र ख्रिन्नपणे स्वत:शीच हसल्या. “कसलीही मुंगी न
डसताही दूध कमी होतं धाराबाई! ‘ असे त्या वेळी त्यांना बोलावेसे वाटले… पण त्यांनी ते
आपल्या ओठांतच ठेवले.

या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी घुंची, हातात
त्याच घाटाच्या मनगट्या, बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढविले होते.
गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या
मनाला वाटत होतं की – “राजांच्या या अंकुराला कुन्या पाप्याच्या बदनजरंची काळी मुंगी कंदी बी डसू ने!

▶राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईनी सईबाईंना
गडपायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू
शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या.

मकरसंक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता
शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे. मुलूखगिरीत दस्त
झालेली घोडी महमद सैस ह्या नजरतैयार अरबी घोडेपारख्याच्या ताब्यात इथे रुजू
व्हायची. महमदचे धिप्पाड मोतदार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग
द्यायचे. या डागांनी उठविलेल्या निशाणीच्या खुणेमुळे “हे घोडं शिवाजीराजांचं ‘ असं
ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले, तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं.
चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विव्हळून खिंकाळत होती, कारण हे
आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते.

राजांनी महमद सैसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुल
जाबता कसा आहे, याचा करीणा त्यांनी महमदला विचारला. “बोलो सैस, घोडोंका हाल
क्या है?”

“जी हुजूर. करीबन सब कुळ ठीक है! लेकिन कुछ “ऐबी ‘ घोडे पागामें शरीक हुए
है! मेरी अर्जी है वे बेचे जाय!” महमदने जबाब दिला.

राजांच्या तुफान मुलूखगिरीत हाती लागलेल्या घोड्यांत खुराजवळ पांढऱ्या
रंगाचे चट्टे असलेले काही “ऐबी ‘ म्हणजे अपशकुनी घोडे होते, ते विकून टाकावेत, असा
सलाह सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले. मग एकदम प्रसन्न होऊन
बोलले, “नहीं सैस! हम घोडे नहीं बेच सकते! एक तो कोई भी जानकार समझकर ‘ऐबी’
घोडा नहीं खरीदेगा! ऐसे ‘ऐबी ‘ घोडे हमारे नये हशमोंको सवारीकी आदत डालनेकी
लिए रख देना!” राजांनी मार्ग सुचविला.

“जी हुजूर!” म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर
येताच राजे छातीवरच्या माळेतील कबड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, “और
देखो सैस, भगवानकी बनायी कोई वस्तू हम “ऐबी ‘ नहीं मानते! ”

सदरकारभार उरकून राजे सईबाईच्या महालात आले. महालात सखू, राणू, अंबा
ह्या तिघी बहिणी शंभूबाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे “ता, ता ‘ करीत त्या
तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज
ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बुट्टे
आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून न काढण्याची कोशिश करीत होते.
त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत-हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना
त्यांनी वर उचलले. छातीशी जवळ केले.

राजांच्याकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या
कानांत डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे
वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या. आणि मूठ इकडे-तिकडे दोन
वेळा नाचविली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळांतून एक अननुभूत
वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली! कितीतरी दिवसांपासून अशी
कळ आपणाला हवीहवीशी होती, असे त्यांना वाटले. ते शंभूबाळाकडे दर्पणात
पाहिल्यासारखे पाहू लागले! बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ
बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ‘ता, ता ‘ म्हणून खिदळले.
चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले.

“बहुत खूब, एकवार आमची पछान नाही धरली तरी चालेल, पण आईच्या
कवड्या कधीच विसरू नका!” राजे स्वत:शीच बोलल्यासारखे बोलले.

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here