महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

भवानी तलवार | काही महत्वाच्या  ऐतिहासिक नोंदी

By Discover Maharashtra Views: 1810 13 Min Read

भवानी तलवार | काही महत्वाच्या  ऐतिहासिक नोंदी –

आज खंडे नवमी . परंपरेनुसार  आजच्या दिवशी शस्त्रपूजा करायचा प्रघात आहे . मराठी माणसाला सर्वात आकर्षित करणारे आणि उच्चारा बरोबर स्फुरण चढवणारे एक ऐतिहासिक शस्त्र म्हणजे ‘ भवानी तलवार ! ‘ शिवछत्रपतींच्या या तलवारीचे नुसते नाव ऐकले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहते .

“मावळातल्या  मर्द मराठ्या घेई  सतीचे  वाण
तुला श्री शिवरायाची आण !
ऊठ , ऊठ  सांडले रक्त , हे देई  तुला आव्हान
तुला श्री तुळजाईची  आण !
भवानी तलवारीची  आण ! ”

राजा बढे  यांनी लिहिलेला  हा  पोवाडा शाहीर पिराजी नाईक  यांच्या आवाजात ऐकताना विलक्षण स्फुरण चढते ! याच भवानी तलवारीविषयीच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी आज आपण पाहणार आहोत . या साठी मी  मुख्यत्वेकरून य.न. केळकर यांनी लिहिलेल्या , ” भवानी तलवार : अस्सल ऐतिहासिक सत्य काय आहे ? ” या लेखाचा आधार घेणार  आहे . हा लेख  मुळातूनच वाचण्यासारखा आहे , तेव्हा तो जिज्ञासूंनी जरूर वाचावा . हा लेख य.न. केळकर यांच्या ‘मराठेशाहीतील वेचक वेधक’ या पुस्तकात छापला आहे .

** भवानी शिवरायांकडे आली ! **

भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांकडे कशी आली याचे स्पष्टीकरण देताना केळकर , चिटणीस बखरीतील उल्लेख देतात तो पुढील प्रमाणे :-

” नंतर सोंदवळकर व कोंदवळकर हे हबीशयाचे चाकर  मर्द मातबर  होते . त्यांचे राजकारण महाराजांकडे आले. आपली  स्वारी कोकणात यावी म्हणजे तळा घोसाळ घेऊन  देतो अशी त्यांनी खातरजमा केली . खेरीज जंजीरीयाचेही राजकारण आले. त्याचवरुन खासा स्वारी कोकणात जाऊन दोन्ही किल्ले तळा घोसाळा  व पेंचवा किल्ला असे घेतले. प्रांतात  अंमल बसविला . बिरवाडी सैदांची , ते मेट चांगले असे पाहून तेथे किल्ला केला. याप्रमाणे करून नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून तिकडून येता मार्गी गोवलेकर सावंत येऊन भेटले. त्यास नावाजून चाकर ठेवले. त्याचपाशी ३०० होनांची तरवार नामांकित होती  ती महाराजास कळलियावरी ३०० होन व पोषाख देऊन घेतली व तिचे नाव ‘भवानी’ असे ठेवले . ती प्राप्त जाहलियावरी बहुत यशस्वी झाले म्हणून तिची पूजा नित्यनेमे आदर करून करिते झाले ”

शिवदिग्विजय बखरीत देखील या सारखेच वर्णन आहे ते असे :-

“सावंतांना पराभूत केल्यावर त्याच्या जवळची २०० होनांची एक तलवार अतिनामांकित प्रसिद्ध होती ती शिवाजी महाराजांच्या मनात भरली म्हणून ती त्यांनी सक्तीच्या खुशीने त्याच्याकडून नजर म्हणून मिळविली ”

**भोसल्यांचा खाजगीकडील  जाबता **

केळकर यांच्या म्हणण्यानुसार सावंतांकडून ही तलवार मिळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी ती आपल्या देव्हाऱ्यात दैवताप्रमाणे जपून ठेवली असावी . या विधानाच्या पुष्ट्यर्थ य.न. केळकर यांनी रावबहाद्दूर पारसनीस यांच्या इतिहास संग्रहातील एका जाबत्याचा दाखला दिला आहे . छत्रपतींच्या खाजगी कडील हा जाबता म्हणजेच ‘खाजगी खात्याचे नियम’ असलेली ५०-७५ पानी वही आहे आणि या जाबत्याचे नाव , ‘ भोसल्यांचे कुलाचार’ असे आहे . या जाबत्यामध्ये पुढील प्रमाणे नोंद आढळते :-

” जिराईतखाने यांनी प्रात:काळी अंघोळ करून गंध अक्षता वस्त्र पात्र असेल  ते निर्मळपणे , गळाठान दिसतां . आपले कारखान्यात येऊन सरकारी हत्यारे , पट्टा , भाला , बर्ची , गुप्ती व सेती व गुर्दा व खांडा व तेगा व पेशकबज व फरसटाळ व तीरकमान , सांग सुरई कट्यार बुकभाला , पिस्तूल , बकमार व ढालांचे व बंदुकीचे व हुद्दे तरवारांचे व दुर्बीण  व घड्याळे  वगैरे सदरहूची  देखरेख  रोजचे रोज झाडून पुसून जंग लागला न लागला हे पाहून , वरचेवर शिकल करून बंदोबस्त राखीत जावा .

पूजा भवानीची व नैवेद्य पूर्वीपासून आम्हाकडे ( भोसल्यांकडे ) चालत आला आहे म्हणून  या लोकांची कलम लिहिले आहे तर त्याप्रमाणे सरकारातून त्यास पावत जाईल ”

केळकरांच्या म्हणण्यानुसार  जाबत्यात लिहिलेली  ही कलमे दसऱ्याच्या सणा संदर्भातली आहेत , त्यावरून त्या दिवशी भवानीची पूजा केली जात होती हे समजते , परंतु ही  भवानी म्हणजे भवानी देवी की भवानी तलवार ? हे मात्र यातून स्पष्ट होत नाही असे केळकर सांगतात.

** अफझलखान वधाच्या वर्णनात भवानी तलवारीचा उल्लेख **

चिटणीस बखरीमध्ये अफझलखान भेटीचे जे वर्णन आहे त्यात भवानी तलवारीचा उल्लेख आला आहे तो पुढील प्रमाणे :-

” महाराजांनी चोळणा काचा घालून उजवे हाती भवानी तलवार घेऊन व बिचवा डावे हाती वाघनखे पाठी ढाल या प्रमाणे ( खानाच्या भेटीस ) सिद्ध झाले .”

प्रत्यक्ष भेटीचे वर्णन चिटणीस बखरीत पुढील प्रमाणे आहे :-

“खानाने फिरंगीचा वार महाराजावरी चालविला . डोईस जिरे होती . ती किंचित तुटोन जखम गव्हाइतकी लागली . महाराजांनी सफाई करून , “तुम तो बडे और पठाण , हमारी भवानी शिवाजी कि देखो ” म्हणून तलवारीचा वार खांद्यावर केला त्याने पोटापर्यंत वार झाला.  खान पुरे होऊन मुर्दा पडिला ”

चित्रगुप्ताच्या बखरीत देखील याच्याशी मिळते-जुळते वर्णन आहे.

** छत्रपती संभाजी महाराज आणि भवानी तलवार **

श्री पी. के .गोडे  यांनी  १९४० साली , ” Hari Kavi’s contribution to the problem of the Bhavani sword of Shivaji the great” या नावाने एक शोध निबंध प्रसिद्ध केला , त्यामध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या हरी कवी नावाच्या एका कवीने रचलेल्या पद्यामध्ये  संभाजी महाराजांच्या हातात असलेल्या भवानी तलवारीचे वर्णन आले आहे . या काव्याचा काळ १६८५ चा म्हणजे संभाजी महाराजांचा समकालीन आहे . या वरून  शिवाजी महाराजांनंतर , संभाजी  महाराज देखील भवानी तलवार वापरत होते असे म्हणता येईल .

** ग्रॅन्ट डफ आणि भवानी तलवार **

केळकरांच्या म्हणण्यानुसार ग्रॅंट डफने भवानी तलवार पाहिली असावी . याला आधार म्हणून ते डफच्या मराठयांच्या इतिहासावरील पुस्तकातील एका  तळटीपेचा उल्लेख करतात , ती तळटीप पुढीलप्रमाणे आहे :-

“Shiwaji’s sword is an excellent genoa blade of the first water . It’s Whole history is recorded by the hereditary historian of the family”

डफ पुढे लिहितो :-

” He was a man of small stature and of an active rather than strong make. His countenance was handsome and intelligent. He had very long arms in proportion to his size, which is reckoned a beauty among marathas. The sword which he constantly used which he named after the Godess Bhavani is still preserved by the Raja of Satara with the utmost veneration and has all the honours of idol paid to it”

परंतु केळकरांच्या म्हणण्यानुसार आजच्या घडीला ही तलवार सातारा किंवा कोल्हापूर या छत्रपतींच्या संग्रहात नाही.

** वा.सी. बेंद्रे यांनी  इंग्लंडमध्ये पाहिलेली तलवार **

आपल्या लेखात केळकर , वा. सी.बेंद्रे यांच्या इंग्लंड दौऱ्याचा सविस्तर वृत्तांत देतात आणि त्यांना इंग्लंड मधील मार्लबोरो हाऊस येथील संग्रहात शिवाजी महाराजांची एक तलवार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे . Catalogue of the collection of Indian arms and objects of art presented by the princes and nobles of India to H.R.H. the Prince of Wales … on the occasion of his visit to India in 1875-1876 या पुस्तकात बेंद्रे यांना  पुढील नोंद मिळाली :-

“The Sabre (No 201) formerly the property of the great maratha chief has a one edged old european blade bearing the sacred initial letters I .H.S three times repeated” (J .H S किंवा I. H. S   हे लॅटिन भाषेतील Iesus / Jesus Hominis Salvatus किंवा “Jesus Savior of Mankind” याचे लघुरूप आहे. )

पुढे दिलेल्या या तलवारीच्या सविस्तर वर्णनात पुढील मजकूर छापला आहे :-

” 201. Sabre ;” Mahratta ;” straight, one-edged old European blade, with two grooves on each side, in one of which ” I. H. S.” is stamped three times ; the raised steel supports at the hilt are damascened with gold in floral designs ; the guarded hilt is of iron with a broad knuckle-guard and a circular pommel, terminating in a spike and encrusted with heavy open-work floral decoration of gold, thickly set with large diamonds and rubies. Presented by H. H. the Maharaja of Kolapore as a relic of the Mahratta chief Sivaji, to whom it formerly belonged.”

केळकर  म्हणतात की श्री. वा. सी. बेंद्रे यांनी १६ मे १९३८ रोजी अनेक वशिले लावून ही तलवार प्रत्यक्ष पाहिली आणि तिचा फोटोही घेतला परंतु आपल्या अहवालात शेवटी असे लिहिले :-

” आता  ही तरवार म्हणजे शिवाजी महाराजांची भवानी तलवार होय किंवा महाराज फक्त एकच तलवार वापरीत होते असे मानण्याचे कारण नाही !”

याचा अर्थ बेंद्रे यांनी सध्या इंग्लंड मध्ये असलेली तलवार म्हणजेच सुप्रसिद्ध भवानी तलवार आहे की नाही ? याबद्दल संशय व्यक्त केला आहे !

** पेशेवे दप्तरातील छत्रपती प्रतापसिंह यांच्या रोजनिशीतील नोंद **

केळकर आपल्या लेखात शेवटी म्हणतात की , निदान १८२० सालापर्यंत तरी भवानी तलवार सातारकर छत्रपतींच्या घरात मोठ्या भक्तिभावाने जतन करून ठेवलेली होती , असा पुरावा पेशवे दप्तरातील प्रतापसिंह छत्रपतींच्या स्वहस्ते लिहिलेल्या दिनचर्येत उपलब्ध  झाला आहे . तो असा :-

” वैशाख वद्य ११ रविवार शके १७४२ इंग्रजी शके १८२० कलकत्त्याहून साहेब आले. त्यास पाहावयास तलवार भवानी पाहून लावून दिली . साहेब व त्याची मडम किल्ला सातारा पाहावयास किल्ल्यावर गेले. भोईसरकारी २० दोन मेण्यांचे मागितले”

सारांश सन १८२० पर्यंत तरी भवानी तलवार साताऱ्यास होती ! पण पुढे तिचे काय झाले हे काही कळायला मार्ग नाही असे केळकर सांगतात !

टीप :- वर उल्लेख केलेला वा. सी. बेंद्रे यांना सापडलेला “Catalogue of the collection of Indian arms and objects of art presented by the princes and nobles of India to H.R.H. the Prince of Wales … on the occasion of his visit to India in 1875-1876” हा ग्रंथ या संकेतस्थळावर :- http://libmma.contentdm.oclc.org/…/p16028coll4/id/2542 वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध आहे . त्यात इंग्लंड  मध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या तथाकथित तलवारीचे चित्र ‘ CASE J ‘ या शीर्षकाखाली  छापले  आहे . ते या लेखा सोबत जोडत आहे. भारतातील इतर राजेरजवाड्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स ला भेट म्हणून दिलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती देखील या पुस्तकात आहे .

संदर्भ :-

१) मराठेशाहीतील वेचक वेधक :- य.न. केळकर
२) Catalogue of the collection of Indian arms and objects of art presented by the princes and nobles of India to H.R.H. the Prince of Wales … on the occasion of his visit to India in 1875-1876 ; now in the Indian Room at Marlborough House
३) Studies in Indian Cultural History, Vol 5. P.K.Gode
४) Book Of Bombay- James Douglas
५) शाहीर पिराजी सरनाईक  यांनी  गायलेला राजा बढे लिखित रोमहर्षक पोवाडा (ऑडिओ) – https://www.aathavanitli-gani.com/Song/Povada_1

चित्रे :-

१) इंग्लंडमधील मार्लबरो हाऊस येथील संग्रहात असलेल्या शिवाजी महाराजांच्या तथाकथित तलवारीचे छायाचित्र. ही तलवार CASE J  मध्ये ठेवलेली असून छायाचित्रात ती ढालीच्या मागे मध्यभागी आहे आणि २०१ क्रमांकाने दाखवलेली आहे
२) Book of Bombay या पुस्तकात James Douglas याने दिलेले शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचे चित्र

लेखक :-

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे.

ता.क. :- श्री Sanket Kulkarni , लंडन यांजकडून भवानी तलवारी विषयी प्राप्त झालेली ताजी माहिती:-

“The accounts published by P.M. Joshi, formerly Director of Archaeology in Maharashtra, entitled ‘The Bhavani Sword of Shivaji’, in ‘Shivaji and facets of Maratha Culture’, edited by Saryu Doshi and published in Bombay in 1982. Mr Joshi concludes that ‘the sacred sword of Shivaji is not in England and that all the available evidence indicates the Bhavani Talwar never left our [Indian] shores’. This has more recently been supported by Robert Elgood in Hindu Arms and Ritual, published in 2004.”

Leave a comment