भैरवनाथ मंदिर किकली

भैरवनाथ मंदिर किकली

भैरवनाथ मंदिर किकली ता.वाई जि.सातारा…

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या किकली गावात हेमाडपंती पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. भैरवनाथ मंदिर किकली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. तिथेच डावीकडे चंदनगड तर उजवीकडे वंदनगड किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते. १८-२० पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते .

संकुलातील एक मंदिर सुस्थितीत तर दोन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. मुख्य मंदिर भैरवनाथाचे असून मंदिरावरती नक्षीकामाची रेलचेल आढळते. या मंदिरात मुखमंडपातच नंदी आहे. वेदिकेवरील व्यालपट्टी, मुखमंडपावरील छतावर अनेक प्रकारची झुंबरे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गज शरभ, व्याल, दैवीशक्ती असून, उंबऱ्यावर कीर्तिमुख तसेच उंबऱ्यासमोर शंखावर्त अर्धचंद्र पहावयास मिळतो.

सभामंडपातील रंगशिळेवर चार भरजरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. असे रामायण कोरलेले हे मंदिर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर होत. काही ठिकाणी शिवतांडव, वामन वतार, सुरसुंदरी, क्षेञपाल अशी शिल्पेआहेत. मंदिराचा गाभारा त्रिदल पद्धतीचाआहे. भैरवनाथासमोरिल अंतराळगृह इतर दोन अंतराळगृहापेक्षा रेखीव आहे. या गृहात दोन देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि एक ऋषीमुनी (स्थानिक कथेनुसार बहुधा मच्छिंद्रनाथ) आहेत. गाभाऱ्यात उग्र अशी भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग आहे.

किकली हे पाचशे सहाशे उंबरा असलेले गाव असले तरी मंदिराप्रमाणेच या गावात शंभर दीडशे वीरगळी पहावयास मिळतात. त्यामुळे गावाला “वीरगळीचे गाव” हे विशेषण शोभून दिसेल. येथे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजांच्या वीरगळी आणि त्याही सुस्थितीत आहेत.

माहिती साभार – संकेत बाबर किकलीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here