महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बाजीराव पेशवे आणि त्रिंबकराव दाभाडे

By Discover Maharashtra Views: 3784 2 Min Read

बाजीराव पेशवे आणि त्रिंबकराव दाभाडे

खंडेराव दाभाडे यांची मुदत संपल्यावर पुढील वर्षाच्या मे महिन्यांत त्यांचा मुलगा त्रिंबकराव यांस शाहू महाराजांनकडून सेनापतीच पदाची वस्त्रें मिळाली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी गुजराथच्या मोहिमेवर त्यांची रवानगी झाली. इकडे बाजीराव पेशवे यांस शाहूंनी माळव्यांत मुलुखगिरीकरितां पाठविलें.

इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा दाभाड्यास देण्यांत आला, व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामहि त्यांच्याकडेच सोंपविलें. परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यांस मुळीच न रूचून या दोन मराठा सरदारांत कायमचें वैमनस्य आलें.

पुढें दोघांनीहि ही गोष्ट शाहूच्या कानांवर घालून त्यांची आज्ञा विचारली. शाहूंनी आज्ञा केली की, बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव यानें जिंकलेल्या गुजराथेंत ढवळाढवळ करूं नये. यामुळें बाजीराव निरूत्तर झाला.

त्र्यंबकराव गुजरातेत असताना सुद्धा बाजीरावाने स्वतः ससैन्य गुजरातेत स्वाऱ्या केल्या आणि काही प्रदेश सुद्धा आपल्या आधिपत्याखाली आणला…. हा प्रदेश स्वतःला मिळावा हि त्याची इच्छा होती आणि इथूनच भांडणाला सुरवात झाली.

सैन्याची जमवाजमव करून राज्याचें रक्षण करण्याकरितां आपण जातो असा उद्देश जाहीर करून त्र्यंबकराव दक्षिणेंत निघाले. कंठाजी व रघूजी कदम बांडे, उदाजी व आनंदराव पवार, चिमणाजी मोघें, वगैरे सरदार असे एक एक करीत येऊन जमाव जमतच होता परंतु आधीच बाजीरावाने मोठमोठ्या मजला करून त्यानें दाभाड्याच्या सैन्यास गुजराथेंतच डभई व बडोदें यांच्या दरम्यान गांठलें ( १ एप्रिल १७३१), पहिल्याच हल्ल्याबरोबर त्रिंबकरावाच्या सैन्यांतील नवशिक्या सैनिकांनी पळ काढला तरी, त्रिंबकराव मोठ्या शौर्यानें लढत होते.

परंतु त्यांना अकस्मात् एक गोळी लागून ते ठार झाले. तेव्हां त्याची सर्व फौज पळून गेली. दाभाड्यांकडील मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा एक पुत्र वगैरे मंडळी ठार होऊन उदाजी पवार व चिमणाजी मोघे हे कैद झाले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड हे जखमी झाले, परंतु ते पळून गेले.

दाभाडे आणि निजाम यांचे सुत जुळत असल्याचे शाहू छत्रपतींना दाखवत बाजीरावाने त्र्यंबकराव यांच्यावर हा हल्ला घडवून आणला आणि यात अशा रीतीनें बाजीरावाचा जय झाला.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment