कलामहर्षी बाबुराव पेंटर –
भारतीय कला विश्वामध्ये अनेक दिग्गज कलावंत होऊन गेले, त्यांच्या अद्भूत कलाकृतींनी ते आजही आपल्यात अजरामर आहेत. अशा कलावंतांच्या कलाकॄती पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळते, आणि त्यांच्या नावाचा ही उल्लेख झाला की मन प्रफुल्लीत होऊन जाते. अशा अनेक कलावंतांमध्ये मला आवडणारे चित्रकार राजा रवी वर्मा, कलातपस्वी अबालाल रहमान, ए. एक्स. त्रिनिदाद, एस.एम. पंडित, जी.डी.पॉलराज, एम. व्ही. धुरंधर, शिल्पकार गणपतराव म्हात्रे, विनायक पांडुरंग करमरकर हे आहेत. या सर्व नावांसोबत एक नाव आदराने घ्याव्यासे वाटते ते म्हणजे चित्रकार, शिल्पकार, तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ” कलामहर्षी बाबुराव पेंटर “.
माझी खऱ्या अर्थाने बाबुराव पेंटर यांच्या नावाशी प्रथम ओळख कोल्हापूर येथील माझे चित्रकार मित्र व मार्गदर्शक संजय शेलार यांच्या स्टुडिओमध्ये झाली. श्री. संजय शेलार हे बाबुराव पेंटर यांच्या स्टुडिओमध्ये काही वर्षे आपली चित्र निर्मिती करत होते. तेव्हा तेथे माझे नेहमीच जाणे होत असे. बाबुराव पेंटर यांनी हा स्टुडिओ खास ब्रिटिश चित्रकारांच्या स्टुडिओ सारखा बनवून घेतला होता, ते स्वतः उत्तम सुतार काम करत त्या सोबत ते उत्तम तंत्रज्ञ ही होते. त्यांच्या संपूर्ण स्टुडिओचे फ्लोरिंग लाकडी फळ्यानी केले होते. स्टुडिओत भरपूर प्रकाश यावा यासाठी खिडक्यांचा आकार मोठा ठेवला होता, तसेच इझल च्या वर सिलींगला एक विशिष्ट पद्धतीने झरोका ठेवला होता जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाश (day light) कॅनव्हास वर मिळत रहावा, तसेच चित्र रंगवताना कॅनव्हास सोई नुसार सहज वर खाली करता यावा म्हणून इझल त्यांनी स्वतः मॅकेनिझम करून बनवला होता. स्टुडिओत मोठ मोठी चित्र रंगवता यावी म्हणून स्टुडिओच्या फ्लोरिंग मधून कॅनव्हास खालच्या फ्लोअर पर्यंत वर खाली करता येईल असा पद्धतीने सोय करून ठेवली होती. स्टुडिओतील चित्र व शिल्प मी प्रथमच प्रत्यक्ष पाहिली आणि मला कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या अलौकिक कार्याची अनुभूती आली.
आजच्या पिढीला कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या विषयी फारशी माहिती नाही याचे मला दुखः वाटते. आजच्या पिढीला त्यांच्या कार्या विषयी माहिती व्हावी म्हणून मी या लेखातून त्यांच्या कार्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबुराव पेंटर यांच्या विषयी सांगायचे तर ते उत्तम चित्रकार, शिल्पकार, तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांचे संपूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री (मिस्त्री). त्यांचे वडील सुतारकाम, लोहारकाम करीत. बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला, तरी त्यांना खरीखुरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपटक्षेत्रातील कामगिरीमुळे. आपले आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी ‘डेक्कन सिनेमा’ सुरू केला, त्यानंतर १९१३ मध्ये त्या दोघांनी बाबूराव रूईकर यांच्यासह ‘महाराष्ट्र सिनेमा’ ह्या चित्रपट निर्मिति संस्थेची स्थापना केली; पुढे १ डिसेंबर १९१७ रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली आणि १९१९ मध्ये सैरंध्री या आपल्या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली. कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका आणि पौराणिक काळातील राजवैभवाचे दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सैरंध्री प्रदर्शित झाला व लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पहिला ८ फेब्रुवारी १९२० रोजी त्यांनी बाबूरांवाना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारा बाबूरावांनी १९२०-३० या दशकात एकूण १७ चित्रपटांची निर्मिती केली.
भारतीय सिनेमा जेव्हा मूळ धरू पाहत होता, तेव्हा देशी बनावटीच्या कॅमेऱ्याने बाबुराव पेंटरांनी तानाजी मालुसरे यांच्या भीमपराक्रमावर सिनेमा बनवला. त्या काळी कॅमेरा बाहेर देशात मिळायचा, त्यात तो प्रचंड महाग. म्हणून बाबुरावांनी प्रोजेक्टरचं रिव्हर्स मेकॅनिजम समजून घेऊन स्वतः कॅमेरा बनवला. आजच्या घडीला इंटरनेटची ताकद हाताशी आहे, कॅमेराचे सगळे पार्टस ऑनलाईन विकत मिळू शकतात, असं असतानाही कोणाच्या मनात अशा पद्धतीने कॅमेरा बनवण्याची कल्पना देखील येणार नाही. यावरूनच बाबुरावांनी स्वातंत्रपूर्व काळात कॅमेरा कसा बनवला असेल या दिव्याचा अंदाज आपल्याला येईल.
त्यांच्या सिनेमांच्या कामगिरी बद्दल सांगायचे तर त्यांनी दिग्दर्शीत केलेला सुभेदार तानाजी मालुसरेंवरचा “सिंहगड” हा सिनेमा मुंबईत जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हा एवढी तुफान गर्दी सिनेमाला व्हायला लागली की देखरेखीसाठी ब्रिटिशांना पोलिसी बंदोबस्त ठेवावा लागला. त्या सिनेमाने तिकीटबारीवर एवढा जबरदस्त गल्ला जमवला की पहिल्यांदाच ब्रिटिशांची नजर सिनेमांच्या उत्पन्नावर गेली. आणि त्या सिनेमापासून सिनेमांवर करमणूक कर लादला गेला.
कलामहर्षी दिग्दर्शित “किचकवध” सिनेमात किचकाचं मुंडकं धडावेगळं होतं, हा सिन बाबुरावांनी कसलेही स्पेशल इफेक्ट नसताना असा काही जिवंत केलेला की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तुम्ही सिनेमासाठी एक माणूस मारला तुम्हाला अटक का होऊ नये अशी कारणेबजाव नोटीस इशू केली.
तो सिन एवढा जबरदस्त झालेला की थियेटरमध्ये माणसं भोवळ येऊन पडायची. बाबुरावांना दस्तुरखुद्ध “किचक” ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर नेऊन उभा करावा लागला. तेव्हढ्यावरही समाधान होईना म्हणल्यावर तो सिन कसा बनवला याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागलं बाबुरावांना. आणि अश्या तऱ्हेने किचकवध सिनेमानंतर सिनेमावर पहिल्यांदा सेन्सॉर बोर्ड बसलं.
बाबुराव पेंटर हे उत्तम शिल्पकार असल्याने किचकाची भूमिका ज्यांनी केली त्यांच्या डोक्याचं माप घेऊन हुबेहूब चेहरा कास्ट केला. धडापासून मान वेगळी झाल्यावर रक्त आणि तुटलेल्या नसा दाखवण्यासाठी त्यांनी बकऱ्याचं रक्त आणि आतडी वापरली. आणि भीम- किचक युद्धाच्या वेळी एका स्पेसिफिक फ्रेमला शूट थांबवून पुढच्या फ्रेमला कीचकाचा डोक्यावर काळा पडदा टाकून धड लटपटत एका बाजूला खाली पडतं तर ते नकली बकऱ्याच्या रक्तात आणि आतड्यात माखलेलं मुंडकं दुसरीकडे गडगडत पडतं असं दाखवलेलं. त्या काळात एवढे हरहुन्नरी बाबुरावच असू शकत होते.
कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेले काही गाजलेले चित्रपट सिंहगड, सैरंध्री, सावकारी पाश, उषा, प्रतिभा, सिता स्वयंवर, दामाजी, कृष्ण अवतार, कल्याण खजिना, सती पद्मिनी, राणा हमिर, गज गौरी हे आहेत. या सोबत बाबुराव पेंटर व त्यांचे आतेभाऊ आनंदराव मिस्त्री यांनी बालगंधर्व नाटक कंपनी साठी बॅकग्राऊंडचे पडदे ही रंगवले आहेत. बालगंधर्वां सारख्या मोठ्या कलावंतांनीही त्यांच्या कार्याची झलक बघितली होती गंधर्वांच्या गाण्याला आधी पडद्याला टाळ्या घेणारे बाबुराव त्यांच्याच रंगमंचानी बघतले आहेत. बाबुरावांच्या हयातीतच त्यांच्या स्टुडिओला आग लागली आणि त्यांच्या अनेक सिनेमाच्या निगेटिव्हस जळून खाक झाल्या. पण त्यांनी खचून न जाता आपली कलानिर्मीती पुढे सुरूच ठेवली.
बाबुरावांच्या तालमीत मराठी सिनेमांची एक अख्खी पिढी तयार झाली. विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम ही त्यांच्या काही शिष्यांची नावं. सिनेमा दिग्दर्शक भालजी पेंढारकर, प्रसिद्ध सिनेमा नट चंद्रकांत मांढरे यांच्या करियरची सुरवातही बाबुरावांच्या पदरीच झालेली.
खर म्हणजे बाबुराव पेंटर यांच्या विषयी लिहावे तेवढे कमीच आहे. लोकमान्य टिळकांनी ‘सिनेमा केसरी’ ही पदवी बहाल केली आणि सर्व सामान्य रसिकांनी त्याना ‘कलामहर्षी’ पद बहाल केले.. अशा या थोर भारतीय कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या नावातच सर्व काही सामावून घेतले आहे.
दि 3 जुन रोजी कलामहर्षी यांची जयंती आहे. या निमित्ताने मी या लेखाने त्याच्या अलौकिक कार्याच्या आठवणीना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
© दिपक पाटील.