अजंठा कोट

By Discover Maharashtra Views: 3601 5 Min Read

अजंठा कोट…

अजंठा कोट – अजंठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ती जगप्रसिद्ध अजंठा लेणी. या अजंठा लेण्यांचा प्रभाव पर्यटकावर इतका आहे की या लेण्यापुढे या भागातील इतर ऐतिहासिक वास्तु पुर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत. यापैकी एक वास्तू म्हणजे खुद्द अजंठा गावाचा नगरदुर्ग अजंठा कोट. औरंगाबाद –जळगाव तसेच औरंगाबाद – बुलढाणा या महत्वाच्या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे अजंठा.

मध्ययुगीन काळात भरभराटीला आलेल्या या संपुर्ण शहराभोवती कोट बांधण्यात आला. आजही हा कोट खूप मोठया प्रमाणात आपले अस्तित्व टिकवून आहे. अंदाजे १२८ एकरवर पसरलेल्या या कोटाच्या तटबंदीत ३६ बुरुज, चार मुख्य दरवाजे, ५ ते ८ उपदरवाजे, तटबंदीवरील चर्या व इतर वास्तु आजही मोठया प्रमाणावर शिल्लक आहेत. भुईकोट पाहण्यासाठी अजंठा हा एक परीपुर्ण कोट असुन मुघल काळात बांधल्या गेलेल्या या कोटावर पुर्णपणे मोगल वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. कधीकाळी भरभराटीला असलेले हे शहर आज केवळ अजंठा लेण्यामुळे आपली ओळख टिकवून आहे. औरंगाबाद पासून साधारण ९५ कि.मी. वर अजिंठा गाव आहे तर जळगावहून येताना सोयगाव फाट्यावरून साधारण १५ कि.मी. वर अजिंठा घाट आणि घाट ओलांडताच महामार्गावर अजिंठा गाव आहे.

अजंठा कोटाचे साधारणपणे दोन भाग पडतात. एक म्हणजे अजंठा गावाभोवती असणारा नगरदुर्ग (भुईकोट) व दुसरा म्हणजे खाशा लोकांसाठी म्हणजे राजपरीवारासाठी व सैनिकासाठी या भुईकोटाच्या आतच एका टोकाला पण या भुइकोटापासुन अलिप्त असणारी गढी (सराई). त्रिकोणी आकाराचा अजंठा कोट वाघुर नदीकाठी वसलेला असुन कोटाच्या दोन बाजुना वाघुर नदीचे खोल पात्र व जमिनीच्या बाजूने खंदक होता. आजमितीला कोटाची दक्षिणेची बाजु सोडल्यास इतर बाजुचा खंदक पुर्णपणे बुजलेला आहे. औरंगाबादहून जाताना अजिंठा गावाच्या साधारण एक कि.मी. अलीकडे डावीकडे अजिंठा भुईकोट किल्ल्याचा दक्षिण दिशेला असणारा उत्तराभिमुख दरवाजा व तटबंदीचा काही भाग नजरेस पडतो. तटबंदीच्या बाहेर खोल खंदक असुन डाव्या बाजुस वाघुर नदीचे खोल दरीत कोसळणारे पात्र दिसते. या वाटेवर पुरातन दगडी पुल असुन येथुन कोटात प्रवेश करता येतो.

कोटात जाण्यापुर्वी डाव्या बाजुस खाली उतरुन वाघुर नदीवर बांधलेला पुरातन बंधारा पाहुन घ्यावा. येथुन कोटाच्या दरवाजाचे, तटबंदीचे व दगडी पुलाचे सुंदर दृश्य दिसते. अजंठा भुईकोटाच्या चारही दरवाजाची कमान व आतील लाकडी दरवाजे व दिंडी दरवाजे आजही शिल्लक आहेत. कोटाचा दरवाजा २०-२५ फुट उंच असुन दरवाजावर दोन्ही बाजूस दोन स्तंभ दिसुन येतात.दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीत कोठारे बांधलेली आहेत. दरवाजातून या तटबंदीवर चढून जाता येते. इथून संपुर्ण गावाभोवताली तट बांधल्याचे दिसुन येते. तटबंदी बऱ्याच ठिकाणी ढासळलेली असुन तटावरून फेरी मारणे शक्य नाही. अजिंठा गाव किल्ल्यात वसलेले असल्याने बराच भाग हा वस्तीने व्यापलेला आहे. कोटाच्या या दरवाजातून संपुर्ण कोट गाडीने फिरता येतो. या वाटेने आत शिरून काही अंतर पार केल्यावर डाव्या हाताला समोरच कोटाचा आणखी एक महादरवाजा नजरेस पडतो. गडाच्या आत बऱ्याच ठिकाणी आतील वाड्यांना बांधलेली अंतर्गत तटबंदी दिसुन येते. हा भाग खाजगी असल्याने आंत प्रवेश करता येत नाही. तटबंदीत बऱ्याच ठिकाणी वर चढण्यास जिने व कमानी असून त्यावर अतिक्रमण झाल्याने तटावर चढता येत नाही. इथून डाव्या बाजुने पुढे गेल्यास भरवस्तीमध्ये चौक आहे. या चौकातुन सरळ जाणारी वाट गावाबाहेर कड्यावर असणाऱ्या बुरुजाकडे जाते. या कड्यावर एक मोठा बुरुज असुन समोर टोकाला अजून एक बुरुज व तटबंदीचे तुरळक अवशेष दिसुन येतात.

येथे किल्ल्यातील काही जुन्या इमारती नदीकाठच्या बाजुने पहावयास मिळतात. चौकातुन डावीकडे गेल्यास किल्ल्याची अंतर्गत तटबंदी व एक जुनी इमारत दिसुन येते तर उजवीकडे लांबवर अजंठा गढीचे (सराई) दोन महादरवाजे दिसतात. या वाटेवर डावीकडे एक साडेतीनशे वर्ष जुनी मशीद असुन उजवीकडे एक जुनी इमारत दिसुन येते. या वाटेने सरळ पुढे आल्यास आपला अजंठा गढीत प्रवेश होतो व समोरील वाटेने अजंठा कोटाबाहेर जाता येते. (अजंठा गढी हि वेगळी वास्तु असल्याने तिच्याबद्दल अजंठा गढी (सराई) या पानावर सविस्तर माहिती दिली आहे.) कोटाच्या या दरवाजाबाहेर एक पुष्कर्णी असुन तिच्या काठावर बरेचसे हिंदूधर्मीय अवशेष दिसुन येतात. या कोटाचा इतिहास अज्ञात असून याची निर्मिती औरंगजेबाच्या काळात झाल्याचे स्थानिक सांगतात पण अजंठा गढीच्या बाहेर असणारी पुष्कर्णी व जवळच असणारी अजंठा लेणी पहाता येथे त्याआधी पासुन वस्ती असावी असे वाटते. गाडीत बसुन अजिंठा भुईकोट सहजपणे पहाता येतो. अजंठा लेणी पहायला आल्यावर हा किल्ला चुकवुन चालण्यासारखे नाही. मध्ययुगीन अवशेषांनी नटलेला हा किल्ला पुढील दुर्गती होण्यापुर्वी एकदा तरी भेट द्यायला हवा. संपुर्ण अजंठा किल्ला व बरोबर अजंठा गढी पाहण्यास दोन तास तरी हाताशी हवेत.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बाजींद कांदबरी

खांदेरीचा रणसंग्राम वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील गडकिल्ले पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment