अहकाम ए आलमगिरी :
औरंगजेबाच्या छत्रपती शाहू महाराजांविषयीच्या धोरणाची दोन महत्त्वाची पत्रे –
अहकाम ए आलमगिरी हा औरंगजेबाच्या पत्रांचा एक अप्रकाशित संग्रह आहे. या संग्रहाविषयी ज्येष्ठ इतिहासकार व फार्सीचे उत्तम जाणकार श्री सेतू माधवराव पगडी यांचा अभिप्राय पुढील प्रमाणे आहे :-
“इनायतुल्लाखान हा औरंगजेबाचा विश्वासू चिटणीस आणि पत्रलेखक. मराठ्यांचे किल्ले घेत औरंगजेब फिरत असताना (१६९८ ते१७०७) इनायतुल्लाखानाने औरंगजेबाच्या आज्ञेवरून अनेक पत्रांचे लेखन केले. आज्ञा व मजकूर ही औरंगजेबाचीच. त्यामुळे पत्रांच्या अधिकृततेबद्दल संशय नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इनायतुल्लाखान याने वरील पत्रांचा संग्रह अहकामे आलमगिरी म्हणजे “अलमगिराचे आदेश” या नावाने एकत्रीत केला. या ग्रंथाच्या हस्तलिखित लिखित प्रति ठीक ठिकाणी आढळतात. इनायतुल्लाखान हा मोहम्मद शाह बादशहाच्या कारकिर्दीत मोठ्या हुद्द्यावर चढला. दोन नोव्हेंबर १७२५ रोजी त्याचा दिल्लीत मृत्यू झाला . हा पत्रसंग्रह मुद्रितही नाही आणि पूर्णपणे अनुवादितही नाही. कोणत्याही पत्रावरून ते कधी लिहिले गेले व कुणाला लिहिले गेले हे समजेलच असे नाही, पण सामान्यपणे ही पत्रे १७०२ ते १७०७ या दरम्यान लिहिली गेली आहेत हे निश्चित.”
सेतू माधवराव पगडी यांनी या संग्रहातील काही निवडक पत्रांचा अनुवाद प्रकाशित केला आहे.
अहकामे आलमगिरी हा पूर्ण अप्रकाशित पत्र संग्रह माझ्याकडे आहे. पुढे कधीतरी हा पूर्ण पत्रसंग्रह अनुवादित करून तो प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे . परंतु तूर्तास या पत्रसंग्रहातील औरंगजेबाच्या छत्रपती शाहू महाराजांविषयीच्या धोरणासंबंधीचे एक महत्त्वाचे पत्रं अनुवादित करुन त्याचा फार्सी पाठ , छायाचित्रं व मराठी भाषांतर येथे देत आहे.
या पत्राचे मराठी भाषांतर श्री सेतू माधवराव पगडी यांनी केले आहे, ते जसेच्या तसे देत आहे. फार्सी पाठ मात्र मी मूळ पत्रावरून वाचला असून, तो माझ्या माहितीनुसार अद्याप कुठेही प्रकाशित झालेला नाही. या विषयासंबंधी औरंगजेबाचे आणखी एक पत्रं या संग्रहात आहे, परंतु ते नंतर केव्हातरी देईन.
छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या मातोश्री येसूबाई औरंगजेबाच्या तावडीत सापडल्या.
छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केल्यानंतरही औरंगजेबाने शाहू महाराजांसोबत तसे काही केले नाही यावरून तो सुधारला असावा असे काही जणांना वाटते. पण सरळ डोक्याने चालेल तो औरंगजेब कसला? शाहू महाराजांना सांभाळण्यामागे औरंगजेबाचे काय राजकारण होते हे तो व जुल्फीकारखान यांच्या मधल्या पत्रव्यवहारावरून समजते. औरंगजेबाचे शाहू महाराजांविषयीचे धोरण नक्की काय होते हे उलगडून दाखवणारे हे एक पत्र:-
*फार्सी*
निविश्ते आन वालाशान मुतज़मीन इनमानी की बहरजी बेहरा व जामीए अज आशकिया ब-अज मुहर्रीक मुकदमे राजा साहू शुदे बर सर इजहार मुल्तमसात आमदे अंद अगर चे मुतालबा दूर अज़कार दारंद , लेकीन दर रुजु आवरदन कुफ्रा ब-राजा मजकूर तरफे दर उफ्ताद की दरमियान जिलालत मनशान(?) मी शवद बा यक शक्के वर फर्द. मुतालबा अज़ नज़र मुबारक गुजश्त. निगारश याफ्ते की बाद रुजु (बहरजी) बी बोहरे अगर हुक्म शूद राजा मजकूर नज्द यक देरा रामसिंग हादा ब-कस्मी की खातरजमे शवद.फरोद आयद इन मानी मंजूर शूद नकल फर्द मुतालबा बा नकल खत-ए खास माली इरसाल याफ्त.
*मराठी*
तुमचे (जुल्फीकारखान) पत्र पोचले त्यात तुम्ही पुढील प्रमाणे लिहिले आहे: बहिर्जी ( हिंदुराव घोरपडे) बेव्हरा (मूर्ख. शत्रूची टिंगल उडवण्याची मोगली पद्धत) आणि इतर अशकिया (म्हणजे दुष्ट मराठे) यांनी राजे शाहू यांचे प्रकरण उपस्थित केले आहे.
त्यांच्या मागण्या अफाट आहेत हे खरे. पण त्यांना शाहू राजांकडे आणून त्या जमातीत फूट पाडता येईल.
आपण त्यांच्या मागण्यांची यादी पाठवून लिहिले आहे की बहिर्जी ( हिंदुराव घोरपडे) बेव्हरा रुजू झाल्यावर आपली आज्ञा असेल तर राजा शाहू यांना रामसिंग हाडा यांच्या तंबू जवळ आणण्यात येईल. त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात येईल.बादशहांनी ही विनंती मान्य केली त्याअर्थीचे पत्र पाठविण्यात आले. (इ.स. १७०६)
औरंगजेबाचे छत्रपती शाहू महाराजांविषयीचे धोरण- पत्रं क्रमांक २
शाहू महाराजांना सांभाळण्यामागे औरंगजेबाचे काय राजकारण होते याबाबत खुलासा करणारे एक पत्रं इनायतुल्ला खानाच्या अहकाम-ए आलमगिरी मधून वर सामायिक केले आहे. आता त्याच विषयीचा औरंगजेब आणि जुल्फिकार खान यांच्या मधला दुसरा पत्रव्यवहार सामाईक करत आहे. थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या पत्राचे मराठी भाषांतर केले आहे, परंतु मूळ पत्राचा फार्सी पाठ व पत्राचे छायाचित्रे अद्याप अप्रकाशित आहे. ते मी आता सादर करीत आहे.
*फार्सी*
मिरकम बूद की अगर वज राजा साहु मुशख्खस शवद अक्सर अज़ कुफरा बा ऊ मवाफीकत मी-कुनन्द व तरफ दर उफ्ताद की दरमियान मादा खिरस राह मियायद व तंबीह जमीए मीमानन्द. करार मीशवद. इल्तिमास ब-तशख्खुस वज राजा मजकूर मंजूर शूद व फर्मान-ए मआली रफ्त. साहू मनसब दारद जागीर आँनची तलब दारद. बायद व ऊ ब-दस्त आन्हा हरगीज बायद दारद. साहु हम राज़ी ब-बूदन बा आन्हा नीस्त.
*मराठी*
[ औरंगजेब लिहितो ] तुम्ही (जुल्फिकार खान) पत्रात लिहिले आहे की, “राजा शाहूचा दर्जा निश्चित करावा म्हणजे काफरांपैकी [ म्हणजे मराठ्यांपैकी ] अनेकजण त्याला येऊन मिळतील. म्हणजे अस्वलांचे पिंड (मादा खिरस) असलेल्या मराठ्यांत फूट पडेल आणि मग सर्वांचे मनासारखे पारिपत्य करता येईल.”
राजा शाहूचा दर्जा ठरवण्याची विनंती मान्य करण्यात आली. बादशहांचे (औरंगजेब) फर्मान निघाले की शाहूला मनसबदारी, जहागिरी जे काही हवे आहे ते द्यावे. पण शाहूला मराठ्यांच्या हाती मुळीच देऊ नये. शाहु देखील त्यांच्याबरोबर राहण्यास राजी नाही. (साहु हम राज़ी ब-बूदन बा आन्हा नीस्त.)
या पत्रात जुल्फिकारखानाने मराठ्यांना “मादा खिरस” म्हणजे अस्वलांच्या पिंडाचे असा शब्द वापरला आहे.
मुघल कागदपत्रांमध्ये अनेकदा महाराणी ताराबाईंचा उल्लेख “अस्वलीण” असा करण्यात येतो.
फार्सी वाचन:- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

