आधुनिक मावळा

वतन की स्वराज्य

आधुनिक मावळा…

मरहट्टो के पास दुश्मनो जितनी दौलत भलेही हो ना हो, लेकीन युद्ध में बहाने के लिये खून कई ज्यादा है.

अगदी बरोबर..

 “स्वराज्याचे देखणे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी, ज्या शूरवीर मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती त्या धगधगत्या अग्निकुंडात दिली अश्या त्या समस्त शिवपाईक मावळ्यांच्या चरणी माझा त्रिवार मानाचा मुजरा”

                  आता समशेरी म्यान आहेत.वेळ बदलली,काळ बदलला आणि काळानुरूप माणसं सुद्धा बदलली. परंतु गेल्या ४०० वर्षापूर्वी ज्या व्यक्तीच्या कार्याची कीर्ती इतिहासात अजरामर झाली अश्या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि त्या नावाचे महत्व कोणती वेळ आणि कोणत्या काळाने बदलण्याची हिंमत केली नाही.आजही छत्रपती शिवाजी महाराज की, हा जयघोष कानावर पडला तर इथे जन्मलेल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारा निर्माण होतो आणि मुखातून “जय” हा एकच शब्द बाहेर पडतो.हे त्रिकालवादी सत्य आहे ज्याला कोणी नाकारू शकत नाही. हेच शब्दअलंकार त्या काळात रयतेच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी कामी आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला लागू पडतात.

आधुनिक मावळा

                   वाचकांनो आज मी आपल्या समोर एका महत्वाच्या विषयावर लेख घेऊन आलो आहे. त्याचे शिर्षक आधुनिक मावळा हे आहे. मी लिखाणासाठी हा विषय निवडला यामागचे कारण म्हणजे आजच्या काळाची ती गरज आहे. आपले मूळ काय ? आणि आपण आपल्या पूर्वजांचा कसा उद्धार करत आहे हे आजच्या तरुण पिढीला कळायला हव हाच या लिखाणा मागचा प्रामाणिक हेतू. १६ व्या शतकातील जीवनशैली आणि आता २१ व्या शतकातील जीवनशैली यावर जर प्रकाश टाकला तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे त्या काळात सामान्य रयतेवर झालेले अन्याय अत्याचार हे या आताच्या वर्तमान काळात माणसांप्रमाणे मॉर्डन झालेले आहे.परंतु त्याकाळात त्या अत्याचारांच्या विरोधात मॉसाहेब जिजामाता यांच्या पोटी साक्षात महादेवाचा अंश छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. आणि त्यांनी आयुष्याच्या ५० वर्षाच्या कारकिर्दी रयतेच्या सेवेत व मातुभूमिच्या रक्षणात घालवून शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इतिहासात अजरामर झालेत.

            वाचकांनो महत्वाच्या विषयावर बोलायचे झाले तर…आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाही काळाला ४०० वर्ष झाली परंतु आजही त्यांची जयंती हि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या प्रत्येक शहरात इतकंच नाही तर प्रत्येक शहरांच्या गावा-गावात,चौकाचौकात माझ्या राजांची जयंती साजरी केली जाते.परंतु हा उत्साह फक्त वर्षात एकदा येतो आणि आलाच तर दोनदा तेहि तारीख का तिथी या वादातून…त्या दिवशी प्रत्येक युवक हा स्मशान वैराग्य धारण करतो.त्या एका दिवशी तो महाराजांचा मावळा बनायचा प्रयत्न करत असतो.माझ्या भाषेत सांगायचं झाल तर काजवा कितीही प्रकाशमान झाला तरी तो सूर्य नाही आणि बेडूक कितीही फुगला तरी तो नंदी नाही. अहो शिवरायांचा मावळा बनने इतक सोप तर मुळीचं नाही.चार माणस अंगावर आली तर बायकांना पुढे करून त्यांच्या पदरा मागे लपणारी माणस त्यांना शूर तानाजी कळणार नाही.जिवलग लोकांना अडचणीत आणणारी हि माणसं शिवरायांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वतः अडचणीला सामोरे जाऊन लाखांच्या पोशिंदाला वाचवणारे बाजी त्यांना कळणार नाही.रस्त्याने येणाऱ्या स्त्रियांच्या कमरा आणि छाताड बघणारी हे नपुंसक माणसांना शिवरायांची स्त्रीरक्षणाची ब्रीद वाक्य उमजणार नाही.

आधुनिक मावळा

            सर्रासपणे धुम्रपान मद्यपान करणारी हि आताची तरुण पिढी किहिती वेळा राजे पुन्हा जन्माला या अशी ओरडली तरी प्रश्न असा निर्माण होतो की राजेंनी जन्माला यायचं तरी का? आणि कश्यासाठी ? याचा विचार आपण करायला हवा.अहो आईस्क्रीम च्या गाडीवर जितकी गर्दी होत नाही त्यापेक्षा अधिक गर्दी आता पान टपरी आणि बियर शॉप वर होतांना दिसत आहे. आणि तुम्ही पैज लावून बघा त्या ठिकाणी पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या ९० टक्के गाड्यांवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा लावलेली असेल. आणि जर हे खरंच असं असेल तर विचार करा, स्वतःला प्रश्न करा की,आपण कोणाचा आदर्श पाळत आहोत.

             आता तर अजून काही भर पडली आहे ती म्हणजे “WHATSAPP” स्टेट्स ची, देवा! महाराजांवरील त्यांचे असले भारी भारी स्टेट्स असतात की असं वाटतं, तुचं रे भावा महाराजांचा सच्चा भक्त. परंतु ते फक्त वर वर असत जे त्याला आणि त्याच्या मोबाईला चांगल माहिती असत की याने शोरूम ला काय आणि त्याच्या गोडाऊन मध्ये काय काय भरून ठेवल आहे. ९० टक्के ग्रुप हे शिवरायांच्या ऐतिहासिक शब्दांचा वापर करून त्यांची नाव ठेवलेली असतात परंतु ग्रुप मध्ये शिवविचारांची नाही तर कोणत्या चर्चा आणि काय काय शेअर होत असत ते पहावे आपणासी आपण तुम्ही जाणते आहात भावांनो सर्व कळत तुम्हाला. यात दोष किंवा दोषित असा सर्व तरुण वर्ग आहे अस मला मुळीच सांगायचं नाही. परंतु जास्तीत जास्त प्रमाणात दोषित तरुण असल्याने ते चांगल्या तरुण वर्गाला बदनाम करत आहे हे मात्र खर. कारण चांगल कार्य करणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या तरुणांपेक्षा वाईट कार्य करणाऱ्यांची संख्या खूप आहे. अजून नवीन काही शब्द वापरात आलेली आहे.

आधुनिक मावळा

            शिवकन्या,शिवपुत्र,शिवपाईक,शिवभक्त,शिवकार्य अजून इतर सम काही असेल या शब्दांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी काही एक देण घेण नाही. परंतु यांचा वापर हा, मी सर्वश्रेष्ठ शिवरायांचा मावळा हे दर्शवण्यासाठी केला जातो. आणि जर तुम्ही खरच त्या नावाला साजेस काम करत असाल तर तुम्ही तो नक्की लावा परंतु ते नाव तुमच्या सोशल मिडिया वर अधोरेखित करून तुम्ही विपरीत पोष्ट किंवा माहिती शेअर करत असाल तर यावर आपली प्रतिक्रिया काय? हे योग्य की अयोग्य ते स्वतः तुम्ही ठरवा. शिवरायांचा खरा मावळा बनायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला युद्ध हे बाहेरील वाईट शक्तींशी नाही तर तुमच्या आंतरिक वाईट शक्तींच्या विरोधात लढावी लागेल.अस म्हटलं जात जो मनुष्य स्वतःच्या मनावर राज्य करतो तो जगावर राज्य करू शकतो. छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्वात आधी मनावर राज्य गाजवलं त्याला नियंत्रित केलं तेव्हा ते निस्वार्थपणे या स्वराज्यासाठी लढले आणि स्वराज्य स्थापन करू शकले.

              छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीत राहायचं असेल तर सर्वात आधी परस्त्री आईबहिणीचा दर्जा द्यावा, धुम्रपान/मद्यपान करू नका,आईवडिलांची सेवा करा,अन्याय करू नका आणि कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहून प्रतिकार करा,देव देश आणि धर्म सेवा सदैव निस्वार्थ मनाने करा, मानसन्मान च्या रांगेत तुम्ही सर्वात शेवट असलात तरी चालेल परंतु शिवरायांच्या नजरेत तुम्ही सदैव प्रथम क्रमांकावर असा असे कार्य अखंडितपणे करत रहा. माणूस म्हणून जगा आणि आयुष्यात स्वतःचे शुद्ध अंतर मन तुम्हाला जे योग्य करायला सांगेल त्याचे तुम्ही ऐका कारण तो आवाज साक्षात छत्रपती शिवरायांचा असेल असे तुमचे चरित्र व व्यक्तिमत घडावा !

जय शिवराय !

जगदंब

लेखन- श्री  सागर यशवंतराव महाडिक (जळगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here