झाकोबा मंदिर, कोथरुड

झाकोबा मंदिर, कोथरुड

झाकोबा मंदिर, कोथरुड –

पुण्यातील काही जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे कोथरुडमध्ये असलेले श्री झाकोबा मंदिर. डीपीरोड वरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सरळ एकलव्य कॉलेजकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक पुरातन देऊळ दिसते. तेच हे श्री झाकोबा मंदिर.

रोकडोबा, म्हसोबा, झाकोबा या वेशीवरच्या क्षेत्रपाल देवता. यातीलच एक अपरिचित क्षेत्रपाल देवता म्हणजे झाकोबा. झाकोबा हा शिवगणांपैकी भैरवाच एक रूप आहे. या क्षेत्रपाल देवतांच मंदिर गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असायचे. आपल्या घरादाराचे, शेताचे रक्षण व्हावे, बाहेरच्या वाईट शक्तींपासून बचाव व्हावा म्हणून पूर्वीच्या काळी या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी मानपान दिला जाई.

सदर मंदिर हे दगडी बांधकामाचे आहे. मंदिर कधी बांधले याचा तपशील सध्या उपलब्ध नाही. तरी हे मंदिर अंदाजे २५० / ३०० वर्ष जुने असावे. मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला अंदाजे ४ ते ५ फुट उंचीच्या वीरगळ ठेवलेल्या आहेत. मंदिरात समोर दोन उभे खांब आणि त्यावर घुमटीसारखा पडझड झालेला कळस आहे. कळसावर आतल्या बाजूला फुलाची नक्षी कोरलेली आहे. परिसरात आजूबाजूला मंदिराचे ढासळलेले दगडी चिरे पडलेले दिसतात. या मंदिराच्या भिंतीमधून एक पिंपळाचे झाड उगवलेले आहे. त्या झाडाची मुळे या मंदिरांच्या दगडी चिऱ्यांच्या सांदीकोपऱ्यात पसरलेली आहेत. मंदिरामध्ये घोड्यावर बसून शस्त्र धारण केलेला झोकोबा आणि शेजारी हनुमान यांच्या मूर्ती आहे. तसेच लोकांनी आणून ठेवलेल्या विविध देवांच्या तसबिरीसुद्धा  आहेत.

पत्ता : https://goo.gl/maps/p8c8Rxj3zDesVwUF7

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here