Durgbharari Teamमहाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभवलेण्या गुहे

वाडा विमलेश्वर

वाडा विमलेश्वर

देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगडपासून १४ कि.मी. अंतरावर आणि विजयदुर्ग पासून १८ कि.मी. अंतरावर वाडा हे गांव आहे. या गावापासून १ कि.मी.अंतरावरील विमलेश्वर मंदिर थांबा येथून अर्धा कि.मी. वर फणसे -पडवणे जाणा-या रस्त्याला लागूनच श्री देव विमलेश्वर मंदिर आहे. रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. मात्र प्रत्यक्षात पाय-या उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि मानवी बुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटन दृष्टया अतिशय उत्तम स्थळ आहे. विमलेश्वराच्या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे.

श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे ५० ते ६० फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. गुहेच्या दोन्ही बाजूला माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव गुहा आहे. मंदिराच्या दिशेने उतरत असताना मुख्य वाटेच्या डाव्या बाजूला काळ्या दगडात कोरलेली देखणे वीरगळ शिल्पे रांगेत उभी करुन ठेवलेली आढळतात. अंगणातून देवळात प्रवेश केल्यावर प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली आहे.

त्याच्यापुढे कातळावर ३५ फूट रूंद व १५ फूट उंच असे सभागृह आणि त्याच्या बाजूने नक्षीकाम केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या चढल्यानंतर साडेसहा फूट उंच १६ फूट रूंद, १६ फूट लांब असा गाभारा लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या चित्काराने दचकायला होते. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून गेते. अशा प्रकारचे उंचावर शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. या शिवलिंगावर कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते. परंतु त्यातील पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही ही बाब आश्चर्यकारक आहे.

मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेसाठी चि-यांनी घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे. मंदिराच्या समोरच धर्मशाळा व गावात पूर्वी होऊन गेलेल्या नेने नामक सत्पुरुषाचे समाधिस्थळ आहे.महाशिवरात्री त्रिपुरा पौर्णिमा हे उत्सव येथे होतात तर मंदिराची व्यवस्था गुरव मंडळी पाहतात. घनदाट वनराईमुळे येथील पाणी उन्हाळयाच्या थंडगार तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उबदार असते. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बारमाही वाहणारे पाणी इथली २१ घरे वापरतात हा सांगण्यासारखा भाग आहे. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गढूळ होत असले, तरी झ-याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते.

लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो. नयनरम्य परिसर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर कायमचे कोरले जाते. अलिकडच्या काळात या परिसरात गोजिरी या मराठी चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे. इथून पुढे १५ कि. मी. अंतरावर मराठ्यांचा ऐतिहासिक विजयदुर्ग हा जलदुर्ग व श्री रामेश्वर मंदिर असून काही अंतरावर सुंदर पडवणे सागरकिनारा आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
www.durgbharari.com
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close