पळसदरी-कर्जत येथील अल्पपरिचित वर्णे लेणी –
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ पळसदरी हे ठिकाण असून या पळसदरी लोहमार्ग स्थानकापासून २.९ किमी अंतरावर वर्णे हे कर्जत- खोपोली मार्गावरील गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या टेकडीवजा डोंगराच्या मध्यावर (अक्षांश १७.२९०३३२, रेखांश ७६.२८९०६३) एक लेणी आहे. या लेण्यांच्या वरून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो, त्यामुळे लेण्यांची झीज व पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या लेण्यांच्या पायथ्याला एक वैशिष्ट्येपूर्ण पाण्याचे टाके असून त्याची रचना वर्तुळाकार आहे. वर्णे येथे क्र.१,२,३ व ५ हे पाहताक्षणी भिक्खूनिवास असलेले दिसून येतात. क्र. ३ व ५ मधील जागा विहार की पाण्याचे टाके ? यामध्ये संभ्रम आहे.
वर्णे लेणी ही प्राचीन बोरघाट उतारावर असून कर्जतजवळील सोपारा, कल्याण,चौल तसेच उरण या बंदरांशी जोडणाऱ्या मार्गावर स्थित आहे. या समूहातील प्रथम लेणं हे भिक्खूनिवास स्वरूपातील दुहेरी रचना असलेले विहार असून यामध्ये ६ x ६ फूट रुंदीचे बाहेरील दालन व आतमध्ये सुमारे २ ते ३ फूट लांबीची आतील भिक्खूनिवास आहे. यामध्ये दगडी बाकाचे भग्न अवशेष असलेले दिसून येतात. हा दगडी बाक २.५ फूट रुंद २ फूट उंचीचा आहे. आतील दालनाच्या दरवाजा बसवण्याची जागा ही २.३ फूट इतकी रुंद आहे. या विहाराची उंची सध्या गाळ साचलेला असल्यामुळे गाळाच्या थरापासून छतापर्यंत ६.५ फूट इतकी आहे. समूहात असलेल्या इतर लेण्यांपेक्षा सदर विहार हे त्यामानाने चांगल्या स्थितीत असलेले व आकारमानाने मोठे (अंदाजे ९ फूट लांब ) आहे. दुसरे लेणं हे विहार असून त्याचे आकारमान ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहाराला दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे अवशेष असलेले दिसून येतात परंतु; आता केवळ त्याच्या खुणा शिल्लक आहेत. दगडी आसन संपूर्णतः नष्ट झाले आहे.
तिसरे लेणे हे सुद्धा दुसऱ्या विहाराशी साधर्म्य असलेले असून त्याचे आकारमान सुद्धा ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहारालासुद्धा दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे केवळ खुणा शिल्लक आहेत. दगडी आसन संपूर्णतः नष्ट झाले आहे. क्रमांक ३ च्या विहार लेण्यांच्या शेजारी असलेले अपूर्ण अवस्थेतील विहार ? की पाण्याचे टाके ? आहे. यामध्ये संभ्रम असलेला दिसून येतो. कारण येथील रचना आधीच्या तिनही विहारांपेशा रुंदीने मोठी असलेली दिसून येते. तसेच छताकढील भाग हा कोरीव नाही. परंतु; येथील तळाकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर गाळ व दगडधोंड्यांचा थर साचला आहे. यामुळे; ही रचना अपूर्ण विहार असलेली आहे की पाण्याचे टाके; ते यातील गाळ काढल्यानंतरच निश्चित होईल. वरील सर्व विहारांपासून थोडेसे विलग असलेले व प्रथमदर्शनी ओळखता न येणारे, संपूर्ण गाळाने भरलेले पाचवी रचना ही एक विहार असलेले दिसून येते. हे विहार ७ x ७ फूट लांबी रूंद असून यामध्ये संपूर्ण गाळ साचला असल्याकारणाने याची उंची मोजता येणे शक्य नाही. आतमध्ये तीनही दिशेला कोरलेल्या सपाट भिंती दृष्टीस पडतात. याच्या बाहेरील बाजूस प्रवेशद्वार रचना असून त्याची रुंदी ही २.४ फूट इतकी आहे.
लेण्यांच्या पायथ्याला एक वैशिष्ट्येपूर्ण पाण्याचे टाके (अक्षांश २०.५४१५०७, रेखांश ७८.१३४७६६) आहे.
टाक्यांची रचना इतर टाक्यांप्रमाणे चौकोनी नसून वर्तुळाकार स्वरूपाची दिसून येते. उन्हामुळे पाण्याची वाफ होऊ नये म्हणून ते भूमिगत असे खोदलेले असून त्याचा वरील भाग मूळ दगडानेच आच्छादित आहे. हे मूळ दगडी आच्छादन कोणत्याही खांबांविना असून अधांतरी आहे. पाणी काढण्यासाठी सहा ठिकाणी लहानमोठे चौकोनी आकाराची जागा केली असून स्थानिक लोक त्यास सहा तोंडी पाण्याचे टाके म्हणतात. अंदाजे ५ मीटर व्यासाचे हे टाके ७ फूट खोल आहे. येथील प्राचीन घाटवाटांच्या साहाय्याने प्रवास करणारे व्यापारी तांडे, वाटसरू, पांथस्थ, भिक्खू यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे पाण्याचे टाके व विश्रांतीसाठी लेणीचा उपयोग होत असणार हे नक्की.
ही लेणी काळाच्या ओघात नष्ट होत चालली असून तिचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक गावकरी व काही सह्यभटके सोडले तर कर्जतजवळील हा प्राचीन वारसा पर्यटक अभ्यासकांच्या नजरेपासून दुर्लक्षित आहे.
संदर्भ :- https://www.academia.edu/resource/work/97756863
✍️ Rohit R. Bhosale
