Durgbharari Teamधबधबेप्रवासमहाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभव

ठोसेघर धबधबा

ठोसेघर धबधबा

सातारा परिसरात कास पठार, ठोसेघरचा धबधबा अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. कास पठार आणि तेथील दुर्मिळ वनस्पतीमुळे सातारा जिल्हा जागतिक स्तरावर गेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या “धबाबा आदळे तोय’ या ओळींचे सार्थ दर्शन घडविणारा ठोसेघर धबधबा हे सज्जनगडा जवळ असणारे या परिसरातील आणखी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सातारा शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील असलेल्या ठोसेघर परिसरातील हा धबधबा गेल्या काही वर्षांपासून पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.

ठोसेघर व चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ तारळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा असून दीड हजार फूट उंचीवरून तो कोसळतो. प्रचंड वेगाने दरीत झेप घेणारा ठोसेघरचा धबधबाही सर्वांच्या आवडीचा झाला आहे. पाऊस अंगावर घेत, थंड झोंबऱ्या वाऱ्यात निसर्गाचे रौद्ररूप काही पावलांवरून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असुन ते पाहण्यासाठी वनखात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. पर्यटकांना धबधबा व्यवस्थित पाहता यावा यासाठी वन विभागाने निरीक्षण मनोरा उभारल्याने आता सुरक्षितताही वाढली आहे. एका वेगळ्या रस्त्याने धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येते मात्र पावसाळ्यात या रस्त्याने पायथ्याशी जाण्यास मनाई आहे कारण या मार्गावरून खाली जाताना अनेक अपघात घडले आहेत.

ठोसेघरचा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठीही प्रती व्यक्ती पाच रुपये मोजावे लागतात. मात्र हा कर वन विभाग नव्हे तर स्थानिक वन व्यवस्थापन समिती आकारत आहे. दुर्घटना रोखण्यासाठी या समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.आपल्या सुरक्षेसाठी हे गरजेचेच आहे. सातारा शहरापर्यंत जाण्यासाठी एसटी बस रेल्वे व खासगी वाहन असे अनेक पर्याय असून सातारा येथील राजवाडा स्थानकावरून ठोसेघर येथे जाण्यासाठी एस.टी.ची सोय आहे. ठोसेघर धबधब्याजवळ सज्जनगड, चाळकेवाडीचा पवनऊर्जा प्रकल्प ही ठिकाणेही आवर्जून पाहण्यासारखी असल्याने खासगी वाहनाने एक दिवसाची मस्त सहल आयोजित करता येऊ शकते.

@सुरेश निंबाळकर

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close