सेनासाहेबसुभ्याचे पद –
सेनासाहेबसुभा हे पद १८ व्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासामुळे विशेष प्रसिद्धीस आले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात औरंगजेब बादशाह दक्षिणेत उतरला त्यावेळी मराठा राज्यात अंधाधुंदी माजली होती. अनेक सरदारांच्या निष्ठा या काळी डाळमळीत झाल्या. अनेकांचे मुजरे छत्रपतीं समोर न झडता बादशाह समोर झडू लागले. अश्यावेळी नवी मनगटे राजकुळाच्या सेवेस तत्पर झाली. यातील अनेक घराणी पुरातन होती, शिवछत्रपतीं पासून कार्यरत होती. परंतु नवी घराणी पराक्रमाच्या योग्य संधीची वाट पाहत आपल्या समशेरीला पाणी पाजून अधिक धारदार करीत होती. अनेक नव्या घराण्यांचे पराक्रम विशेषकरुन छत्रपती राजाराम काळात उत्स्फूर्तपणे दिसू लागले. यातील हिंगणीकर भोसल्यांची शाखा विशेषरूपाने पुढे आली अन आपल्या पराक्रमाने मराठ्यांचे डळमळीत झालेले सिंहासन स्थिरावण्यास मदत करती झाली.
हिंगणीकर भोसले हे वेरूळकर भोसले म्हणजेच शिवछत्रपतींचे पिढीजात सेवक होते. परसोजीराजांनी संताजी-धनाजी यांच्यासोबत महाराष्ट्रात अनेक पराक्रम गाजवले. राजाराम छत्रपती जिंजीहून महाराष्ट्रात आले असता त्यांनी परसोजीराजे यांस इ. स.१६९९ साली ‘सेनासाहेबसुभा’ हे पद दिले. ह्या पदास सन्मान + सेनापतीप्रमाणे वस्त्रे, अलंकार, जरीपटका चौघडा देऊन गोंडवन, देवगड, चांदे, वऱ्हाड वगैरे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अंमल बसवला तो सुभा त्यांना दिला. परसोजीराजे प्रथम सेनासाहेबसुभा झाले.
शाहु छत्रपतींनी आपल्या मुख्य सरदारांस निरनिराळे प्रांत वाटून देऊन त्यातील चौथ त्यांनी घ्यावी, ठराविक लष्कर ठेवावे, काम पडल्यास ते लष्कर नोकरीस द्यावे, असे करार केले होते याप्रमाणे पेशव्यांकडे खानदेश व बालाघाट, सेनापती (दाभाडे) कडे गुजरात व बागलाण, सरलष्कर(निंबाळकर ) याजकडे गंगथडी व औरंगाबाद, फत्तेसिंग भोसल्यांकडे कर्नाटक, प्रतिनिधी, चिटणीस व आंग्रे याजकडे इतर स्वराज्यातील व स्वराज्याबाहेरचे प्रांत व भोसल्यांकडे वऱ्हाड व गोंडवन असे प्रांत वाटून दिले होते. यात अनेक पदे जी नव्याने निर्मिल्यागेली त्याचे कारण हे राज्यवृद्धी होणे हे तर होतेच पण जुने-नवे सरदार आपल्याशी बांधील राहावे हेही एक महत्वाचे कारण होते. सेनासाहेबसुभा हे असेच पद होते जे पराक्रम व राजनीष्ठा यामुळे हिंगणीकर भोसल्यांच्या शाखेत कायम राहिले.
‘सेनासाहेबसुभा’ या पदाचे महत्व काय होते. या पदाशी कोणाशी तुलना करता येईल. या पदाची राज्यव्यवस्थेत काय जागा होती इत्यादीबद्दल डॉ. प्रभाकर गद्रे यांनी योग्य विश्लेषण केले आहे. “नागपूरच्या राज्याचा सर्वोच्च अधिकारी ‘सेनासाहेबसुभा’ या पदाची ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरलच्या पदाशी तुलना करता येण्यासारखी आहे. दोघेही राजकृपेने नियुक्त व निवृत्तमान होते, दोघांनाही प्रादेशिक सुभेदारावर देखरेख ठेवावी लागे, दोघेही स्थानिक अधिकारी या नात्याने युद्ध किंवा शांतता करार करू शकत. आवश्यकता पडल्यास दोघेही न्यायालयात हस्तक्षेप करीत. राजकीय, लष्करी आणि न्याय विभागासंबधी राजाज्ञेचे त्याला पालन करावे लागे छत्रपतींच्या दरबारात फारसे हजर रहावे लागत नसल्यामुळे त्याला बरेच कृतीस्वातंत्र्य होते”.
बंगाल मोहिमेत रघुजीराजांवळ सर्वात जास्त म्हणजे २० हजार घोडेस्वार, २५ हजार पायदळ आणि ३०० तोफा होत्या. सेनासाहेबसुभा या पदाला शोभेल अशीच ही सैन्यशक्ती होती. खुद्द रघुजी महाराजांचा सरंजाम ९ लाखांचा होता. आणि हिंगणीकर भोसल्यांचा एकूण सरंजाम ७४ लाखांचा होता. छत्रपतींचे आपण सेवक आहोत हे प्रथम रघुजीराजे उत्तम जाणून होते. शाहु छत्रपतीं विषयी त्यांच्या मनात आदर आणि नम्रपणा कायम होता. एका विस्तीर्ण राज्याचा व्यावहारिक स्वामी आणि प्रबळ सैन्याचा सेनासाहेबसुभा जवळ जवळ दरवर्षी साताऱ्यास जाऊन छत्रपतींना मुजरा करण्यास जात असे …. अर्थात ते त्यांचे कर्तव्यच होते म्हणा आणि आपले कर्तव्य ते कधी विसरले नाही…!!
संदर्भ :-
1)नागपूरकर भोसल्यांचा इतिहास :- या. मा. काळे
2) नागपूर राज्याचा उदय आणि आस्थापना:- डॉ. प्रभाकर गद्रे
3) नागपूर राज्य संस्थापक सेनासाहेबसुभा पहिले रघुजीराजे भोसले यांचे चरित्र :- गोपाळ दाजीबा दळवी
©पृथ्वीराज धवड