महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 93,07,771

भारताचे पुरातन नाव मेलुहा

Views: 12
7 Min Read

भारताचे पुरातन नाव मेलुहा | The ancient name of India is Meluha –

जेंव्हा या देशाला भारत हे नाव पडले नव्हते, हिंदुस्तान आणि इंडिया ही नावेही आली नव्हती तेंव्हा भारताला ‘मेलुहा’ हे नाव होते असे पुरावे सुमेरियन दस्तावेजांनी आपल्याला लाभलेले आहेत. सुदैवाने आपल्या प्राकृत भाषांनीही हा पुरातन पुरावा जपून ठेवला आहे. पण मेलुहा (मेलुक्खा अथवा मिलिच्छ) या शब्दाचा अपभ्रष “म्लेंच्छ” असा करत वैदिक आर्यांनी त्या शब्दाचा अर्थच बदलवन्याचा प्रयत्न केल्याने हे मुळचे राष्ट्रनाम मागे पडले. त्यानंतर ऋषभनाथपुत्र चक्रवर्ती भरतावरून भारत हे नाव प्रचलित झाल्यानंतर तर ते विस्मरणातच गेले. चिकटून राहिले ते हिणार्थाने भारतातील मूळ रहिवाशांना. नंतर म्लेंच्छ ही सद्न्या विदेशी परधर्मीय/परभाषिक लोकांना बहाल केली गेली. अर्थात ही सांस्कृतिक उलथापालथ कशी झाली हेही आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे. (भारताचे पुरातन नाव मेलुहा)

सुमेरियन दस्तावेजांनुसार मागन, दिल्मून या देशांप्रमाणेच मेलुहा हा त्यांचा मोठा व्यापारी भागीदार होता. मागन म्हणजे आताचा अरब अमिरात आणि ओमान हे देश होत. दिल्मून म्हणजे इराणचा काही भाग. मेलुहा येथून सागवानी लाकूड, मौल्यवान खनिजे, तांब्याच्या लगडी, शोभिवंत दगड, गोमेद, नीलमणी व त्यापासून केलेले अलंकार, हस्तिदंत, सोने, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंबरोबरच मोर, कोंबड्या, कुत्रे आदी प्राणी-पक्षीही मेलुहातून तेथे निर्यात केले जात असत. सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्राही तेथे सापडलेल्या आहेत. हा व्यापार समुद्रमार्गे तसेच खुश्कीच्या मार्गानेही होत असे.

दक्षिण सुमेरमध्ये मेलुहाच्या व्यापा-यांनी अनेक वसाहती वसवलेल्या असल्याचेही उल्लेख उपलब्ध आहेत. दक्षिण सुमेरमधील गिर्सू या नगराराज्यातील गुआब्बा शहर हेच या वसाहतीचे एक स्थान होते असे मानले जाते. अक्काडीयन साम्राज्याच्या काळात सम्राट रीमुश याने इलम विभागात मेलुहाच्या सैन्याशी युद्ध केल्याची नोंदही उपलब्ध आहे. अक्काडचा एक सम्राट सार्गोनचा नातू नारम-सीन (इसपू २३३४-२२१८) यानेही आपले मेलुहाच्या सैन्याशी युद्ध झाल्याचे नोंदवून ठेवले आहे. एन्की आणि निन्हुर्स्ग या पुराकथेतही मेलुहा देशाचा उल्लेख आला आहे.
मेलुहा हे भारताचेच नाव होते हे बहुसंख्य विद्वानांनी मेलुहाहून सुमेरला आयात केल्या जाणा-या वस्तूंवरून निश्चित केले आहे. हे नाव फक्त सिंधू संस्कृतीच्या परीसरापुरते मर्यादित होते कि संपूर्ण देशाचे यावरही विस्तृत चर्चा झालेली असून त्याबद्दल मात्र काही विभिन्न मते आहेत. पण हे नाव संपूर्ण उपखंडाचे असावे हे दाखवणारे पुरावे प्राकृत भाषांनी व नंतर अपभ्रषित संस्कृतने राखून ठेवलेले आहेत. मायकेल विट्झेल यांनी स्पष्ट केले आहे कि संस्कृत म्लेंच्छ हा शब्द प्राकृत मिलीच्च्छ (पाली-मेलुखा) या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये (इसपू १००० किंवा ८००) म्लेंच्छ हा शब्द पहिल्यांदाच येतो. हा तोच काळ आहे जेंव्हा वैदिक भारतात प्रवेशले. म्लेंच्छ या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. किंबहुना हा इंडो-युरोपियन भाषेतीलही शब्द नाही. मग हा शब्द येथील लोकांना वैदिकांनी का वापरला हा प्रश्न जेंव्हा निर्माण झाला आणि मेलुहा हे नाव सुदूर सुमेरमध्ये वापरले गेल्याचे आढळले तेंव्हा म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (सुमेरियन) किंवा मिलीच्छ (मेलुखा) या प्राकृत-पाली शब्दांशीच निगडीत असून हे भारतीय उपखंडाचे मुळचे नाव होते हे लक्षात आले.

वैदिक लोकांनी म्लेंच्छ हे नाव विदेशात राहणा-या भिन्नभाषी लोकांना दिलेले नाव नाही तर तेच नाव मुळचे येथील प्रदेशाचेही होते. भारतीय लोकांची भाषा मूळच्या वैदिक भाषेपेक्षा वेगळी असल्याने वैदिक आर्यांच्या दृष्टीने येथील लोकभाषा परक्या व आधी अनाकलनीय असल्याने फ्रेंचांची फ्रेंच तशीच मिलीच्ह लोकांची भाषा म्लेंच्छ असा बदल करत तो भाषावाचकही केला. वैदिक येथेच रुळल्यावर आणि येथील भाषा आपलीशी केल्यानंतर त्यांनी सरसकट परभाषिकांना म्लेंच्छ ही सद्न्या देऊन टाकली तर ते स्वत: ज्या प्रांतात वसले होते तेथील भाग आर्यावर्त व तेथे आर्य भाषा बोलणारे लोक राहतात अशा नोंदी त्यांच्या ग्रंथांत करून ठेवल्या.

हे येथेच मर्यादित राहिले नाही तर त्यांनी म्लेंच्छ (व शुद्रही) हे संबोधन केवळ वैदिकेतर भारतीयांनाच नव्हे तर शक, हुंण, कुशाण, कम्बोज, किरात, बाह्लीक इत्यादींनाही बहाल करून टाकले. हा शब्द एखाद्या शिवीसारखा अवमानजनक अर्थाने वापरला जाऊ लागला व पुढे देशनाम म्हणून हा शब्द गायबच झाला. वैदिक आर्य ज्या भागात वसले त्या भागाला त्यांनी “आर्यावर्त” असे नाव दिल्याने तर आर्यावर्ताच्या बाहेर असलेले सारेच त्यांच्या दृष्टीने म्लेंछ ठरले. हाच शब्द त्यांनी वैदिकेतर शूद्र टोळीलाही आधी वापरून पुढे अन्य सर्वच प्रान्तांतील एतद्देशियांनाही उद्देशून वापरल्यामुळे शुद्र व म्लेंच्छ म्हणजे जेही कोणी वैदिक धर्मीय नाहीत ते येथील मुळचे रहिवासी असा या शब्दाचा अर्थविस्तार झाला. पुढे पुढे तर म्लेंच्छ (मिलीच्छ) आणि शुद्र (प्राकृत सुद्द) हे शब्द समानार्थी झाले.

यात वैदिकांचा दुराभिमान दिसून आला तरी त्यामुळे या देशातील मुळचे लोक स्वत:ला कोणत्या नावाने संबोधित होते हे मात्र जतन होऊन राहिले. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश म्हणजे मेलुहा व वैदिक अपभ्रंश म्हणजे म्लेंच्छ असा आहे. अस्को पार्पोला, मायकेल विट्झेल, अहमद हसन दानी यांसारख्या जागतिक कीर्तीच्या विद्वानांनीही या मताची पुष्टी केलेली आहे.

म्हणजेच सनपूर्व २२०० मध्ये भारताचे नाव बाहेरच्या जगाला मेलुहा म्हणून माहित होते तर भारतीय स्वत:ला मिलीच्छ म्हणवत होते. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश मेलुहा तर वैदिक भाषेतील अपभ्रंश म्लेंच्छ. हा शब्द वेदांमध्ये येत नाही कारण या देशाशी त्यांचा परिचय फक्त सिंधू नदीच्या खो-यापर्यंत सीमित होता. त्यांना येथील लोक आपल्या भूभागाला कोणत्या नावाने ओळखतात हे माहित असण्याचे कारण नव्हते. पण ते जसे भारतात आले. ते येथील लोकांना तुच्छच (अनार्य) समजत असल्याने म्लेंच्छ हे मुलनिवासींचे देशनामही पुढे शुद्र (खरे तर ही सिंध प्रांतातील अभिर, शिबी, किरात, गुर्जर इ. जमातींप्रमाणे एक ऐतिहासिक जमात होती) या टोळीनावाप्रमाणेच ‘हीण’ या अर्थाचे बनले व एतद्देशीय लोकांसाठी सरसकट वापरले गेले.

पण आज आपल्या हाती जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून आपल्या देशाचे सर्वात आधीचे ज्ञात नाव मिलीच्छ (मेलुखा) होते व विदेशी लोक त्याला मेलुहा म्हणत असत हे आता सिद्ध झाले आहे. सिंधू संस्कृतीतील लोक व्यापाराच्या निमित्ताने तेथे जात असल्याने व वसाहतीही वसवल्या असल्याने त्यांना त्यांचे मूळ देशनाम माहित असणे स्वाभाविक असले तरी त्यांना या देशाचा पूर्ण विस्तार व येथे राहणा-या विविध जमाती माहित नव्हत्या असे आपण अन्दाजू शकतो.

पुढे मात्र मिलीच्छ हे देशनाम मागे पडले पण तो शब्द तेवढा मात्र “म्लेंच्छ” व “मेलुहा” या अपभ्रंशीत स्वरूपात जतन होऊन राहिला. पुढे ऋषभनाथपुत्र भरताने विनिय नगराचे राज्य विस्तारले त्यामुळे देशाला भारत असे नाव प्राप्त झाले. त्या इतिहासाची नोंद हिंदू व वैदिक पुराणांनीही करून ठेवली. विनिय नगराचेही नाव इतिहासात बदलत राहिले. ते पुढे इक्ष्वाकूनगर व साकेत झाले तर इसवी सनाच्या तीस-या शतकानंतर त्या नगराचे नाव अयोध्या असे रूढ होऊ लागले. जगभर देश व प्रांत (नगर व गावेही) नाव बदलत राहिल्याचा इतिहास आहे. कधी हे सांस्कृतिक उलथापालथी किंवा सत्ता बदलत गेल्यामुळे झालेले आहे.

-संजय सोनवणी

Leave a Comment