महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,64,508

रामचंद्र यादवांचा तळेगाव ढमढेरे शिलालेख

Views: 3
6 Min Read

रामचंद्र यादवांचा तळेगाव ढमढेरे शिलालेख –

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे नावाचे एक ऐतिहासिक गाव आहे. या गावात काही वर्षांपूर्वी बांधकाम करत असताना एक तळेगाव ढमढेरे शिलालेख असलेला गधेगाळ सापडला. वरच्या भागात चंद्र, सूर्य प्रतिमा मधल्या भागात शिलालेख आणि शेवटी गाढवाचा स्त्रीशी संकर असे याचे स्वरूप आहे.या संदर्भातील बातमी दैनिक सकाळ आणि दैनिक दिव्य मराठी व इतर प्रमुख मराठी या वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. बातमीतील माहिती नुसार हा शिलालेख मंदिर निर्माण आणि देखभाली संदर्भातील आहे. याचे वाचन केले असता तो स्थानिक कराशी संबंधित असल्याचे लक्षात आले. या शिलालेखाचे मी केलेले वाचन असे-

१.स्वस्ति श्री शके१२३५ प्रमा
२.दी संवकर स्रवण सुधा
३.१५ भौमे आद्येह श्रीमत प्रौ
४.ढ प्रताप चक्रवर्ती श्री रा
५.मचंद्रदेवराज्ये वीजयो
६.दई माहामंडलेस्वर श्रीसा
७.मरस दुधवडी देस परनेर
८.संबंध तलेगौ दाई नायक द्यापरे
९.ब्राह्मणासी उडेआचाकरूसा
१०.डिला हा धर्मु प्रतीपाली तेआसि
११.भले होआ नमनि धरी ते हा
१२.ची ऐ मा ऐ गाढो मंगल माहे श्री

शिलालेखाची पूर्व प्रसिद्धी – स्थानिक मराठी वृत्तपत्रे

शिलालेखाची भाषा व लिपी – शिलालेख देवनागरी लिपीत असून मराठी, कन्नड आणि संस्कृत भाषेतील शब्द यात आलेले आहेत. ण या अक्षराचे वळण मोठ्या लिपीतील इंग्रजी H अक्षराला मधोमध विभागल्या नंतर दिसणाऱ्या आकारा सारखे आहे

शिलालेखाचा काळ – शिलालेखाची मिती शके १२३५, प्रमादी संवत्सर, श्रावण शुद्ध १५ , भौम अशी दिली आहे. पिले जंत्रीनुसार ही तारीख इंग्रजी ०७ ऑगस्ट १३१३, वार मंगळवार अशी येते.

शिलालेखाचा अर्थ –
शालिवाहन शकाच्या १२३५व्या वर्षी प्रमादी संवत्सरात श्रावण शुद्ध १५ म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीमत प्रौढ प्रताप चक्रवर्ती श्री रामचंद्र देवाचा विजय असो. दुधवडी देशाचा महामंडलेश्वर सामरस याचा सेवक दाईनायक याने आज्ञा केली की दुधवडी देशातील संबंध पारनेर सह तळेगावातील जनतेने ब्राह्मणास साडी साठी कर द्यावा. ही आज्ञा पाळणाऱ्याचे चांगले होईल जो मानणार नाही त्याचा आईला गाढव.

चर्चा –
शिलालेखा संदर्भात जी बातमी प्रकाशित झाली होती त्यानुसार –
शिलालेखाचा काळ शके १२३५ प्रभादीनाम संवत्सरे म्हणजेच इ. स. १३१३ असा आहे. लेखात रामदेवराय यादवाचा ‘प्रताप चक्रवर्ती रामचंद्रदेव’ असा उल्लेख आहे. रामचंद्र यादवांचा महामंडलेश्वर म्हणजे स्थानिक प्रांत अधिकारी सामळ सदू तसेच स्थानिक पारनेर संघाचा कारभारी गोदाजी नाईकाचा उल्लेख आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर रक्षणासाठी लोकाज्ञा स्वरूपात हा शिलालेख कोरलेला आहे. इतिहासातील नोंदींवरून यादवांचा पराभव १२९४ मध्ये झाला असला तरी १३१३ पर्यंत पुणे व परिसरात यादवांचीच सत्ता होती, हे स्पष्ट होते. तसेच शासन व्यवस्थेतील अधिकारांची उतरंड व नावेही समजतात.

सामरस , दाई नायक –
शिलालेखात उल्लेखित व्यक्ती महामंडलेश्वर सामळ सदू असे नसून सामरस असे आहे. यात आणखी एका व्यक्तीचे नाव येते तो म्हणजे दाई नायक .याचे चुकीचे वाचन गोदाई नायक असे दिले आहे. दाई हा स्त्री वाचक शब्द असून दाई नायक ही एक स्त्री असू शकते. लीळा चरित्रात माहादाइसा असा उल्लेख येतो. याची फोड महा दाई सा अशी करता येते. यादवांच्या इतर लेखातही दंड नायक, देसाई नायक अशा अधिकाऱ्याचा उल्लेख येतो.

दुधवडी देश –
रामचंद्र यादवांचा काळ इसवी सन १३११ पर्यंत मानला जातो. या शिलालेखा नुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे आणि परिसरावर १३१३ पर्यंत त्यांचीच सत्ता असल्याचे दिसते. यात दुधवडी देशाचा उल्लेख येतो. या नावाचे गाव मात्र सध्या आढळत नाही. यादवांच्या लेखात माणदेश, केज देश, अंबे देश अशी नावे आता पर्यंत आलेली आहेत. सांगली जिल्ह्यात दुधोंडी नावाचे गाव आहे. परंतु प्रादेशिक सलगता विचारात घेतली तर दुधवडी हे दुधोंडी संभवत नाही. सातारा जिल्ह्यातील प्रदेशाला माणदेश असे नाव असून सेऊण देश आणि माण देश यांच्या दरम्यान दुधवडी देश येत असावा अशी शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दुधोडी नावाचे गाव आहे. या गावच्या परिसरात कोळवडी, थेरवडी , बेनवडी इ. नावाची गावे आहेत. दुधोडी हेच दुधवडी देशाचे मुख्यालय असावे. दुधोडी हे दुधवडीचे अपभ्रष्ट रूप आहे. भीमा नदीच्या उत्तरेकडील अगदी पारनेर पर्यंतचा बराच मोठा प्रदेश दुधवडी देशात समाविष्ट असावा . देशाचा विस्तार हा ३० ते ४० चौरस मैल असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. दुधवडी देशाचा विस्तार पाहता हे मत योग्य वाटत नाही. देश हा कमीत कमी ३००० ते ४००० चौरस मैल एवढा विस्तीर्ण विभाग असावा.

संघंध की संबंध?
लेखाच्या आठव्या ओळीत संबंध हा शब्द येतो. यातील ब या अक्षराचे वळण हे आधुनिक घ सारखे असल्याने ते चुकून संघंध असे वाचले गेले असावे. यादवकाळात संघ हा प्रादेशिक विभाग असल्याचे आढळत नाही. यादव कृष्ण देवाच्या ( शके ११८०) कान्हेगाव लेखात ‘ खंधार देस संमंध ‘ असा उल्लेख येतो. येथेही हा संबंध म्हणजे संपूर्ण असाच अर्थ निघतो.

ब्राह्मणासी उडेआचा करू साडिला-
शक ११९३ मध्ये आमण देवास पदच्युत करून रामचंद्र यादव सत्तेवर आला. त्यामुळे लोकमत मिळवण्यासाठी त्याने ब्राह्मणांना अग्रहारे देण्यास सुरुवात केली असावी. लीळा चरित्रात (लीळा क्रमांक ६) नवी अघ्ररें: ब्राह्मणासी नवीया वृत्ती दिधलिया : मा: चणेचि पिकति असा उल्लेख येतो. ( देवगिरीचे यादव, ब्रह्मानंद देशपांडे, पृष्ठ १५०) हीच पद्धत पुढे बराच काळ चालू असल्याचे दिसते. रामचंद्र यादवाचा महामंडलेश्वर सामरस याचा सेवक दाई नायक याने पारनेर सह तळे गावातील जनतेला आज्ञा केली की जनतेने ब्राह्मणांना उडे म्हणजेच साडी साठी कर द्यावा. यासाठी उडे आचा करू असा शब्दप्रयोग केला आहे. कन्नड भाषेत उडिगे म्हणजे कमरे भोवती नेसावायचे वस्त्र असा अर्थ होतो.( कन्नड – मराठी शब्दकोश, पृष्ठ ७३) याचे मराठी बोली भाषेतील रूप उडे असे असावे. म्हणजेच ब्राह्मणांना वस्त्रासाठी कर द्यावा असे यात म्हटले आहे. यात पुढे साडीला असाही उल्लेख आहे.

® सतीश भि. सोनवणे
टीप – हा लेख इतरत्र कोठे प्रसिद्ध असल्यास कळवावे

Leave a Comment