सातारचे छत्रपती राजपूत सूर्यवंशी भोसले घराण्याची वंशवेल

सातारचे छत्रपती राजपूत सूर्यवंशी भोसले घराण्याची वंशवेल

सातारचे छत्रपती राजपूत सूर्यवंशी भोसले घराण्याची वंशवेल –

इ.स. १८४० साली तत्कालीन सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी भोसले घराण्याची वंशावळ इंग्रज सरकारसमोर सादर केली. सदर वंशावळीस तत्कालीन उदयपूरचे महाराणा यांनी मान्यता दिली. या वंशावळीचे ९ सुटे बंद असून प्रत्येक बंदावर इंग्रज सरकारचा शिक्का आहे.

इ.स. १८३९ पुण्याच्या नातू, पटवर्धन व तत्कालीन शंकराचार्य यांच्या भिक्षुकी खोट्या कारस्थानामुळे इंग्रज सरकारने सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना कैद करून काशीस ठेवले. त्यांचे बंधू शहाजीराणा यांना सातारा गादीवर बसविले. सदर कटकारस्थाना विरोधात छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रज सरकारकडे अपील केले होते. सदर प्रसंगी हि वंशावळ सादर केली गेली.

भोसाजी राणा यांचे पुत्र देवराजजी राणा हे प्रथम दक्षिणेत आले व वसाहत करून राहू लागले. भोसाजी राणा यांच्या नावावरून उदयपूरच्या या सिसोदिया वंशास भोसले हे नाव दक्षिणेत पडले. सदर वंशावळ महादेव गणेश डोंगरे यांनी सिद्धांत विजय या ग्रंथात प्रथम प्रसिद्ध केली.

शककर्ते शीवराय विजयराव देशमुख :- प्राचीन कुळात भोसले हे उपनाम आढळत नाही , महालिंगदासने क्षत्रीयांच्या ९६ कुळांची यादी दिली आहे, त्यातही भोसल्यांचे नाव नाही, यावरून इ.स. १४०० पर्यन्त तरी निदान भोसले हे उपनाम प्रदिध झालेले दिसत नाही

शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व

भोसले घराणे हे रजपूत “ सिसौदिया “ घराण्याची शाखा आहे आहे हे त्यावेळच्या जनसामान्यांना माहित असल्याचे व स्वतः भोसले घराण्यास माहित असल्याचे दिसून येते. उत्तरेतून महाराष्ट्रात आलेले कवी भूषण आपल्या काव्यात लिहितात

राजत है दिनराज को बंस अवनी अवतंस / जामे पुनि पुनि अवतरे कंसमथन प्रभू अंस //
महावीर ता बंस मे भयौ एक अवनीस / लियौ बिरद सिसौदियौ दियौईस को सीस //
ता कलमे नृपवृंद सब उपजे बखत बिलंद / भूमिपाल तिनमे भयौ बडौ माल मकरंद //

या भूमीस आभूषण ठरणारा हा असा तुझा श्रेठ वंश पृथ्वीस शोभतो कंसमर्दन करणाऱ्या त्या प्रभूचा अंश परत परत तुझ्या कुळात अवतार घेतो. महावीरांच्या या वंशात एक पृथ्वीपती जन्माला आला. त्यास सिसोदिया असे बिरूद मिळाले. कारण ईश्वराला त्याने आपले शिरकमल वाहिले होते. या कुळातील नृपनरेश अतिशय भाग्यवान होते त्या कुळात मालोजी नावाचा एक मोठा राजा झाला.

शहाजीराजे भोसले इ.स. १६५६ च्या पत्रात स्वतःचा उल्लेख रजपूत असा करतात “ तरी आपण रजपूत लोक अजी तलग पेशजीही दोघो चौ पादशाहित खिदमत केली “

समकालीन जयरामपिंडे राधामाधवविलास चंपू या ग्रंथात शहाजीराजांचे आडनाव भोसले असून वंशनाम शिसोदिया आहे असे नमूद करतो. शहाजीराजांचे उपनाम भोसले , वंश शिशोदे , वर्ण क्षत्रिय उर्फ रजपूत , गोत्र कौशिक अशी नोंद शहाजीराजांचा समकालीन जयराम पिंडे करतो.

विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या सभासद बखरीतील नोंदीनुसार मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांकडे निरोप पाठवला त्यात ते नमूद करतात “ तुम्ही शिसोदे रजपूत. आम्ही तुम्ही एकाचे एकच आहोत. तुम्ही भेटीस येणे.”

सभासद बखरीतील नोंदीनुसार “राजियांचे वंशाचा शोध करिता राजे शुद्ध क्षत्रिय शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणे आले. तेच राजीयांचे घराणे असे शोधिले.”

सप्तप्रक्ररणात्मक चरित्रातील नोदी नुसार “ शिवाजी महाराज हे उदयपूरच्या राणाजींच्या घराण्यातील शिसोदे कुळातील वंशज , पुरुष पिढ्या लावून या प्रांती हिंदुस्थानातून आले. रजपूतराजवंश महाराष्ट्र देशी म्हराठे म्हणवितात.”

वरील विश्वसनीय नोंदीनुसार त्यावेळच्या उत्तरेतील व दक्षिणेतील लोकांना देखील भोसले घराण्याचे क्षत्रियत्व , रजपूतत्व , शिसोदियावंशत्व मान्य होते.

पेशवे दफ्तरातील काही नोंदी

पेशवे दफ्तर ३० मधील नोंदीनुसार “ ३१-०५-१७२५ रोजीच्या पत्रात छत्रपती थोरले शाहू महाराज लिहितात सिसोदे आमचे चुलतबंधू

पेशवे दफ्तर ४२ मधील नोंदीनुसार “ उदयपूरच्या महाराणाचे कुलगुरू दिपविजय कविराज उदयपूरच्या घराण्याची वंशावळ घेऊन सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या भेटीस आले. सदर वंशावळीनुसार सातारा छत्रपतींचे घराणे हे उदयपूरच्या प्रतिष्ठीत राजघराण्यातील होते.

पेशवे दफ्तर ४२ मधील नोंदीनुसार ६ -०८- १८१९ बापू कान्हो फडणीस यांनी पत्राद्वारे कळविले “ छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चुलते चतुरसिंग हे जोधपुर आणि जयपूरला तर मी उदयपूरला गेलो होतो. तेथील महाराणा चतुरसिंगासह एकाच गादीवर बसले व चतुरसिंहाना मान्यता दिली कि सातारा आणि आमची संस्थान एकच.

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :-
मराठा क्षत्रीयांचा इतिहास लेखक व प्रकाशक :- के. बी. देशमुख
राधामाधवविलासचंपू :- जयराम पिंडे
शिवभूषण :- निनाद बेडेकर
सप्तप्रक्ररणात्मक चरित्र
सभासद बखर
पेशवे दफ्तर ३० शाहू व पहिले दोन पेशवे
पेशवे दफ्तर ४२ राजा प्रताप सिंहाची रोजनिशी व इतर कागद
शककर्ते शीवराय विजयराव देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here