सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी

सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी

सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी –

मंगळूरू हे कर्नाटकातील महत्त्वाचे बंदर आहे. नेत्रावती व गुरुपूर या दोन नद्या मंगळूर येथे अरबी समुद्राला मिळतात. कुडल, कोडीयल, मैकल ही मंगळूरूची अनुक्रमे तुळू, कोंकणी आणि ब्यारी भाषेतील नाव आहेत. मंगलादेवीच्या नावावरून या शहराला मंगळूरू नाव पडले आहे अशी लोकांची भावना आहे.(सुलतान बॅटरी)

प्राचीन काळापासून दर्यावर्दी आणि परदेशी लोकांना मंगळूरू बंदराची माहिती होती. रोमन इतिहासकार प्लिनी आणि ग्रीक इतिहासकार टोलेमी यांनी आपल्या प्रवासवर्णनात “नित्रीअस” व “नित्रा” नावाच्या स्थळाचे वर्णन केले आहे. ही दोन्ही नावे मंगळूरू शहराजवळून वाहणाऱ्या नेत्रावती नदीच्या नावाशी साधर्म्य दर्शवतात. त्यावरून प्लिनी व टोलेमी यांनी वर्णन केलेले स्थळ मंगळूरू असावे. बदामी चालुक्यांचे मांडलिक असलेल्या अलुपा घराण्याने या परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केली. संगम साहित्यात या साम्राज्याचे नाव तुळूनाडू, तर शिलालेखात  तुळूविषय असे नोंदून ठेवले आहे. मंगळूरू हे अलुपांच्या राज्याच्या (७वे-८वे शतक) राजधानीचे ठिकाण होते.

कुलशेखर अलुपेंद्र (सन ११६०-१२२०) याच्या राज्यकाळात मंगळूरूला पुन्हा राजधानीचा दर्जा देण्यात आला. होयसाळ राजा तिसरा बल्लाळ (सन १२९१-१३४२) याने सन १३३३ येथे आपला अंमल स्थापित केला. साधारणपणे सन १३४५ मध्ये हा संपूर्ण प्रदेश विजयनगर साम्राज्यात सामील झाला. सन १५२६ मध्ये मंगळुरू पोर्तुगीजांच्या  ताब्यात गेले, तरी त्यांच्या वखारीचे काम सन १६७० मध्ये पूर्ण झाले. १८व्या शतकाच्या पूर्वार्धात नायकांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि मंगळुरूवर सत्ता प्रस्थापित केली. हैदर अलीने सन १७६३ मध्ये मंगळूरू आपल्या ताब्यात घेऊन येथे गोदीची बांधणी केली. सन १७६८ मध्ये ब्रिटीशांनी हैदर अलीचा पराभव केला आणि मंगळूरूवर  आपला झेंडा फडकवला. सन १७९४ मध्ये मध्ये टिपू सुलतान याने मंगळूरूला पुन्हा आपल्या साम्राज्यात सामील केले. सन १७९९ मध्ये श्रीरंगपट्टण युद्धात टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर मंगळूरूवर पुन्हा ब्रिटीशांचा अंमल सुरु झाला.

राज्यकर्त्यांनी मंगळूरू बंदराच्या संरक्षणासाठी मंगळूरू किल्ला आणि सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी असे दोन किल्ले बांधले. त्यापैकी मंगळूरू किल्ला कुठे होता याची काहीही माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु, ब्रिटीश लायब्ररीत सन १७८३ मध्ये अभियंता जॉर्ज गोडार्द याने काढलेले किल्ल्याचे चित्र उपलब्ध आहे. चित्रानुसार हा किल्ला नदीच्या काठावर होता. पण चित्रावरून किल्ल्याच्या जागेची स्थळनिश्चिती होत नाही.

सुलतान बॅटरी गुरुपुरा नदीच्या काठावर टेहेळणीसाठी बांधलेला बुरुज आहे. हा बुरुज टिपू सुलतान याने बांधला असे मानले जाते. पण तो टिपूने बांधला आहे याला कोणताही संदर्भ उपलब्ध नाही आहे. मंगळूरू बंदरात व शहरात शत्रूच्या जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी या बुरुजाची बांधणी करण्यात आलेली आहे.

या बुरुजाच्या बांधकामासाठी काळ्या दगडाचा वापर केलेला आहे. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्हीबाजूला असलेल्या भिंतीत बंदुकींचा मारा करण्यासाठी जंग्यांची सोय करण्यात आलेली आहे. बुरुजावर दहा तोफांसाठी खाचा आहेत. पायऱ्या चढून बुरुजावर गेल्यानंतर गुरुपारा नदीचे आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य बघायला मिळते. बुरुजाच्या खाली दारूगोळ्याचे कोठार आहे. पण, आता या कोठारात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.

मंगळूरू शहराच्या उर्वा परिसरात सुलतान बॅटरी आहे. शहरातून येथे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी हा संपूर्ण परिसर सुशोभित केलेला आहे. मंगळूरू शहरात मंगलादेवी मंदिर, शरयू महागणपती मंदिर, कदरी मंजूनाथ मंदिर, रोजारीओ चॅपेल इ. धार्मिक स्थळे, तसेच पनमबूर, सोमेश्वर, थन्नीरभावी व बेंगरे इ. समुद्रकिनारे आहेत. याशिवाय परिसरात इतरही पर्यटन स्थळे आहेत.

संदर्भ – asibengalurucircle.in/suntan-battery-boloor

© Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा|| 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here