महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,531

सोनजाई

By Discover Maharashtra Views: 2847 4 Min Read

सोनजाई –

सहयाद्रीच्या कुशीत वसलेले आणि दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात आणि परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महाबळेश्वर-पाचगणीच्या वाटेवर असलेले हे शहर स्ट्रॉबेरीच्या आंबट-गोड स्वादासोबत येथील निसर्ग, ऐतिहासिक पाऊलखुणा आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमीची नेहमीच वर्दळ असते. तरीही काही ठिकाणे अजूनही दुर्लक्षित आहेत. स्थानिक लोक सोडले तर बाहेरच्या पर्यटकांना ही ठिकाणे क्वचितच माहीत असतील, त्यातीलच एक ठिकाण म्हणजे “सोनजाई”. वाई शहरात प्रवेश करताच पूर्व-पश्चिम पसरलेली एक छोटीशी डोंगररांग नजरेस पडते. याच डोंगरांगेच्या पूर्वेकडील भागाकडे “वैराटगड” आणि पश्चिम भागाकडे पाचगणी शहर वसलेले आहे. हीच डोंगररांग सोनजाईचा डोंगर म्हणून या परिसरात ओळखली जाते.

सोनजाई डोंगराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते – “मछिंद्रनाथांनी गोरक्षाच्या झोळीतील श्रीलंकेहुन आणलेली एक सोन्याची वीट ही कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिली, साधू-संतास संपत्तीचा मोह नसावा असा त्यांचा हेतू होता. परंतु यामुळे गोरक्ष हे मछिंद्रनाथांवर संतापले, मछिंद्रनाथांनी प्रतिउत्तरादाखल वाई शहराच्या पूर्व-पश्चिम पसरलेला संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला आणि “तुला हवं तेवढं सोनं घे” असे सांगितले. यावर गोरक्षांना त्यांची चूक समजली व त्यांनी मछिंद्रनाथांची माफी मागितली. ज्याठिकाणी सोन्याची वीट फेकली ते ठिकाण म्हणजे ओजर्डे गावाजवळील कृष्णा नदीचा “सोनेश्वर डोह” आणि सोन्याचा केलेला डोंगर म्हणजेच “सोनजाईचा डोंगर”.

सोनजाईच्या डोंगरावर मुख्य सोनुबाई/सोनजाई व काळूबाई असे दोन मंदिरे आहेत, शिवाय नाथपंथीय भिक्षुक गोसावी समाजाचा मठही आहे. प्रमुख सोनजाईचे मंदिर हे डोंगराच्या मध्यभागी खडकात खोदलेल्या व वरती लाकडी दुसरा मजला असलेल्या बंदिस्त वाड्यात आहे. सोन्याच्या डोंगरावर असलेली देवी ती म्हणजे “सोनजाई” म्हणून ओळखली जाते. बाजूलाच पाण्याचे खोदीव खांब टाकं आहे (बारमाही येथे पाणी असते).  खडकातील ह्या लेण्या नाथपंथीयापूर्वी बौद्धसंप्रदायाच्या भिक्षुकांसाठी बांधल्या असाव्यात (इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील) असा तर्क लावला जातो. सहयाद्रीची ही डोंगररांग म्हणजे त्याकाळी देशातून कोकणात आणि कोकणातून देशात ये-जाण्यासाठीचे प्रवेशव्दारच, त्यामुळे वाटसरू, व्यापारी यांच्यासाठी पाण्याचे टाकं आणि खडकातील खोल्या(लेण्या) मुक्कामासाठी कदाचित बांधलेल्या असाव्यात.

डोंगराच्या पश्चिमबाजूस चिंचोळ्या कड्याचा आधार घेत काळूबाईचे मंदिर  डौलदार पणे उभे आहे. वाई शहरातून हेच मंदिर डोंगराचा जणू मुकुटमणी आहे असे भासते. काळूबाई मंदिराबरोबर तिथे नवलाई देवीची सुद्धा मूर्ती आहे. काळूबाई मंदिराच्या मागील बाजूस एक दरीवजा खिंड आहे. याबद्दलही एक दंतकथा सांगितली जाते – कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी करण्याचा निश्चय भीमाने केला होता. देवीने एक अट भीमाला घातली की हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला हवे. भीमाने केवळ एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला आणि त्याचा संकल्प अधुरा राहिला. काळुबाई देवीने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला कारण नदीचा प्रवाह नैसर्गिक असावा अशी देवीची इच्छा होती. याच छोट्या दारीला “भीमाचे खोरे” म्हणून ओळखले जाते. डोंगराच्या इतर भागात मठातील लोकांची शेती,  स्मशानभूमी, जनावरांचा गोठाही आहे. बावधनच्या प्रसिद्ध बगाडासाठी येथूनच बैल जोडी पाठवली जाते.

सहयाद्रीतील ही डोंगररांग निसर्गाची जणू चौफेर उधळण करत आहे असेच भासते. येथून पांडवगड, केंजळगड, रायरेश्वरचे पठार, वैराटगड, चंदन-वंदन, मांढरदेवी, सुल्तामपूरची टेकडी सहज नजरेस पडते. धोम धरण, नागेवाडीचे धरण आणि सोबतच वाईचा परिसर नितांत सुंदर दिसतो.

वाई किंवा बावधन मार्गे ४५ मिनिटांची चढाई केल्यानंतर अबाल-वृद्धांना सहज जाता येईल असे हे ठिकाण आहे. निसर्गाचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी आणि पौराणिक/ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी नक्कीच या ठिकाणास एकदा तरी भेट द्यायला हवी.

– समीर शेख

Pic Courtesy: रोहित

Leave a Comment