शुक्रवार वाडा, पुणे

शुक्रवार वाडा

शुक्रवार वाडा, पुणे –

पुण्यातील वैभवसंपन्न पेशवेकालीन वास्तूंपैकी काही मोजक्याच वास्तू अजूनही तग धरून आहेत. बाकीच्या बऱ्याचशा वास्तू ह्या इंग्रजांनी नष्ट केल्या. अशीच इ.स. १८२० च्या सुमारास इंग्रजांनी साफ जमीनदोस्त केलेली वास्तू म्हणजे, दुसरे बाजीराव पेशवे यांनी हौसेने राहण्यासाठी बांधलेला शुक्रवार पेठेतील सरकारवाडा किंवा शुक्रवार वाडा. रामेश्वर चौकातून स्वारगेटकडे जाताना, डाव्या बाजूला गाडीखान्याची इमारत आहे आणि उजव्या हाताला अस्सल ब्रिटिश बांधणीची इमारत दिसते. आजूबाजूला असलेल्या इमारतींमधून हि जुनी इमारत लगेच ओळखू येते. याच ठिकाणी हा शुक्रवार वाडा होता.

दुसरे बाजीराव पेशवे, आपल्या अनेक रंगढंगामुळे, नाकर्तेपणाच्या राजकारणामुळे, विलासामुळे आणि त्याबरोबर पेशवाईचा, पर्यायाने मराठी साम्राज्याचा शेवट करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकारणात जरी ते  अगदीच सामान्य होते, तरी इतर छानछोकीच्या गोष्टीत मात्र अग्रेसर होते. वेगवेगळे खानदानी शौक करणे, उत्तमोत्तम इमारती बांधणे, मेजवान्या देणे, नवनवीन वस्तूंची खरेदी करणे, कलावंतांना उत्तेजन देणे, विलासावर तसेच दानधर्मावर भरमसाठ पैसे खर्च करणे, देणग्या देणे आदी गोष्टी त्यांनी मनापासून केल्या.

नारायणराव पेशवे यांची हत्या शनिवारवाड्यात झाल्यामुळे तिथे राहायची त्यांना भीती वाटू लागली. म्हणून त्वरेने दुसरीकडे वास्तव्य करावे या हेतूने दुसऱ्या बाजीरावांनी इ.स. १७९९ च्या आसपास, शुक्रवार पेठेतला एक जुना वाडा खरेदी केला. त्याची डागडुजी करून त्यात राहण्याचा त्याचा मानस होता. त्यानुसार एका चौकाचे नवीन बांधकाम करायला प्रारंभही झाला. नव्या चौकाच्या इमातरीचे बांधकाम जुन्यापेक्षा जास्त दिमाखदार झाले, त्या मानाने पहिला जुना वाडा अगदीच सामान्य दिसू लागला. त्याची विसंगती काढून तोही भाग उत्तम दिसेल अशा तऱ्हेने सुधारणा करण्याचे काम सुरू झाले. नंतर जुना भाग पाडून मनासारखा प्रशस्त, दोन चौकी वाडा बांधण्यात आला आणि  इ.स. १८०३ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दुसऱ्या बाजीरावांनी आपला सर्व लवाजमा या नव्या वाड्यात हलवून, येथे कायमचेच वास्तव्य केले. त्यामुळे शनिवारवाड्याचे महत्त्व संपले आणि तो जुना वाडा किंवा थोरला सरकारवाडा झाला. शुक्रवार वाडा हा दोन चौकी पाच मजली होता, पाचव्या मजल्यावर चार कोपऱ्यांत चार बंगले बांधले होते, असे उल्लेख सापडतात. पाचव्या मजल्यावरील बंगल्यातून सारा आसमंत स्वच्छ निरखता येई.कारण एवढ्या उंच इमारती त्या काळी पुण्यात विशेष नव्हत्या. त्या वेळी फार कोणी मुत्सद्दी राहिलेच नव्हते आणि राजकारणावर खलबते होण्याचे दिवसही संपले होते. त्यामुळे वाड्यातील खासे नाचाचे समारंभ म्हणजे पुण्यातील मातब्बरांना करमणुकीची पर्वणी वाटायची आणि ते नित्याने व्हायचे. शनिवारवाड्यात प्रतिवर्षी होणाऱ्या गणपती उत्सवाप्रमाणे दुसऱ्या बाजीरावांनी श्रीव्यंकटेश उत्सव दर वर्षी करण्याची प्रथा या वाड्यात सुरू केली.

इ.स. १८१८ मध्ये पेशवाई संपली. दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांना शरण आले. त्याची रवानगी विठुरला झाली. शुक्रवारवाडा ओस पडला. त्यातच इ.स. १८२० मध्ये वाड्यात आग लागली. इंग्रजांनी ती विझवायचा प्रयत्न केला नाही आणि आगीत पूर्ण वाडा जळाला. शिल्लक राहिलेली लाकडे इंग्रजांनी गारपिरावर नेली. उरलेसुरले अवशेष लोकांनी पळवून नेले.

संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पुणे वर्णन – ना.वि.जोशी

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here