महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,589

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

By Discover Maharashtra Views: 1351 4 Min Read

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती –

इ.स. १८५७ रोजी झालेल्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदा सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली आणि आपल्या भारत वर्षाच्या स्वातंत्र्य समराची सुरवात झाली. ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध झालेला उठाव सैनिकांचे बंड म्हणून मोडीत काढला. पण या उठावाचे परिणाम हळूहळू देशात सर्वदूर दिसू लागले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होत, ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे.(श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती)

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. ते राजवैद्य होते. राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी विचारांचे होते. त्यांचा धार्मिक विषयांचादेखील गाढा अभ्यास होता. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग. या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे म्हणून त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता, या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

इ.स. १८९२ च्या सुरवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते. तेथे त्यांनी तेथील संस्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असलेला त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली. या चर्चेमधून भाऊसाहेबांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागली. भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खंडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या. इ.स. १८९२ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण ३ गणपती बसविण्यात आले; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर गणपती, आणि नानासाहेब खासगीवाले गणपती. या ३ गणपतींची १० दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतृदशी दिवशी मिरवणूक काढण्यात आली. अशा प्रकारे उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र करून समाजाला विधायक दिशा देण्याचं महत्वाचं राष्ट्रकार्य भाऊसाहेब रंगारी यांनी यथोचित पार पाडलं.

भाऊसाहेब रंगारी यांच्या या नव्या अध्यायामुळे आपल्या वैभवशाली संस्कृतीच्या रांगड्या मातीत सार्वजनिक उत्सवाचं रोपटं रुजवण्यात भाऊसाहेबांना यश आलं. समाज गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्र आला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधात एकत्रित समाजाची नवी ताकद जोमाने उभी राहिली. भक्तीचं शक्तीशी नातं सांगणाऱ्या आपल्या पवित्र मातीत क्रांतीचा ध्वज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आसमंतात दौलाने फडकू लागला आणि केवळ पुण्यातच नव्हे तर देशभरातील स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. पुढच्या वर्षी या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. क्रांतीचे लोकशिक्षण या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात भाऊसाहेब यशस्वी झाले होते. सार्वजनिक उत्सवाचा हा नवा पायंडा लोकमान्य टिळकांना खूप पसंत पडला आणि या उत्सवासंदर्भात त्यांनी केसरी या आपल्या वृत्तपत्रामध्ये मंगळवार दि. २६/९/१८९३ रोजी स्फुट लेखन करून भाऊसाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले. या उत्सवातून प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी स्वतः इ.स. १८९४ साली आपला गणपती सरदार विंचूरकर वाड्यात बसविला.

जिथे गणपती बसतो तिथे शेजारीच भाऊसाहेब रंगारी भवन नावाचा दुमजली वाडा आहे. तो इ.स. १८६७ साली बांधला गेला.राक्षसावर प्रहार करणारी मंडळाची गणेशाची मूर्ती प्रतीकात्मक संदेश देणारी आहे. पारतंत्र्यातील समाजाला तत्कालीन राजसत्तेविरुद्ध लढा देणारी प्रेरणादायी मूर्ती बनविण्यात आली. मंडळाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून व इतर पर्यावरणपूरक गोष्टी वापरून तयार करण्यात आली. हा गणपती चतुर्भुज म्हणजेच चार हातांचा आहे. या गणपतीने राक्षसाचा एक हात सोंडेत पकडला आहे. ३ हातात शस्त्रास्त्रे आहेत. पैकी एका हातात गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हातात धरून ठेवला आहे. एक हाताने राक्षसाचे केस पकडले आहेत. एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशमूर्ती भासते. स्थापनेपासून आजतागायत मूर्ती बदलण्यात आली नाही. श्रींच्या सागवानी लाकडी रथही तेवढाच जुना आहे.

भाऊसाहेब रंगारी भवन या वाड्याची डागडुजी करून तिथे एक कायमस्वरूपी प्रदर्शन मांडण्यात आले आहे. भाऊ रंगारीच्या गणेशोत्सवाची माहिती व जुनी छायाचित्रं तिथे पाहायला मिळतात. तसेच वाड्यातील जुन्या खोल्या, गुप्त बैठकांच्या खोल्या, तळघर, भुयार या जगही बघता येतात. दुसऱ्या मजल्यावर जुन्या काळातील शस्त्रसाठा बघायला मिळतो. ठासणीच्या बंदुका, पिस्तुले, गोळ्या अशी अनेक ब्रिटिशकालीन शस्त्रास्त्रे तिथे ठेवली आहेत.

संदर्भ:
https://www.shrimantbhausahebrangariganpati.com/
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन

पत्ता : https://goo.gl/maps/sqZRuZN2BjkNRTYDA

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment