महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री जगदंबा संस्थान केळापूर, यवतमाळ

By Discover Maharashtra Views: 1193 3 Min Read

श्री जगदंबा संस्थान केळापूर, यवतमाळ –

विदर्भ आणि तेलंगाना च्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात केळापूर या ऐतिहासिक गावात ‘आई जगदंबा’चे मंदिर आहे. धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील केळापूरला विशेष महत्व असून वर्षभर येथे जगदंबा आईचा उदो उदो सुरु असतो.(श्री जगदंबा संस्थान केळापूर)

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून ४ किमी अंतरावर केळापूर हे गाव आहे. गावात खुनी नदीच्या काठी, आणि वनसंपदेने बहरलेल्या परिसरात आई जगदंबेचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. कुंतलापुरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे. डॉ या. मा. काळे लिखित “व-हाड इतिहास” या पुस्तकात कुंतलापुर म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर असा उल्लेख आढळतो. जेमिनी अश्वमेध या ग्रंथात कुंतलापूर ची भवानी व राजा चंद्रहास यांची कथा आहे. चंद्रहास राजाचे हे नगर होत आणि राजावर प्रसन्न होऊन जगदंबेने कुंतलापूर गावात आपला कायमचा निवास ठेवला. अशी आख्यायिका या ग्रंथात आहे. सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात १८१८ साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अज्ञातवासात असतांना केळापूर येथे आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे.  इतिहासात केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचा पण उल्लेख आहे. आजही जीर्ण व पडझड झालेल्या पुरातन किल्याचे अवशेष नदीकाठावर आढळून येतात.

मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू प्रगटलेली आहे. मूर्तीच्या जागेवर २ बाण आहेत. जीर्णोद्धार कार्य  सुरु असतांना जी मूर्ती सापडली ती भग्न असून चतुर्भुज जगदंबेच्या मांडी खाली राक्षस आहे. आईच्या एकां हातात त्रिशूल असून ती राक्षसाचा वध करीत आहे. देवीवर भक्तांची प्रचंड श्रद्धा असून औरंगाबाद येथील भक्तांने तर एक किलो सोने देवीला दान चढविले. विश्वस्तांनी त्याचा वापर करून देवीचा मुखवटा बनविला आहे.

जगदंबेवर आंध्र व तेलंगणातील भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. देवीला नवस बोलून लाखो भक्त अनवाणी पायाने चालत नवरात्री दरम्यान दर्शनाला येतात. या काळात मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलीत करण्यात येते.  या प्राचीन मंदिराची १९८१ पूर्वी पारवेकर घराण्यांमार्फत देखभाल व्हायची. त्यानंतर पांढरकवडातील तरुणांनी एकत्रित येवून एकता मंडळ जीर्णोद्धार समितीची स्थापना केली. केळापूर गावात प्राचीन चतुर्मुखी गणपतीचे देखील मंदिर आहे. गावात असलेल्या या मंदिरातील गणपतीची अनोखी मूर्ती लोभस आहे. चारही दिशांना गणपतीचे मुख असून गोंड राजाच्या वास्तव्य काळात या चतुर्मुखी गणपतीची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. केळापूर गाव बारा हनुमानसाठी देखील ओळखले जाते. गावात मध्यभागी व वेशीवर हनुमान मंदिर आहे. बाजीराव पेशवाच्या युद्धानंतर काही मूर्ती आसपासच्या गावात स्थापित करण्यात आल्या आहे.

माहिती – Milind Barbade

Leave a comment