महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,510

श्री मार्कंडेय देवस्थान, पुणे

By Discover Maharashtra Views: 1416 3 Min Read

श्री मार्कंडेय देवस्थान, पुणे –

रामेश्वर चौकात शिवाजी रोडवर उजव्या बाजूस एक दुर्लक्षित,पण आवर्जून पाहावे असे पूर्वाभिमुख मंदिर आहे. ते आहे, श्री मार्कंडेय देवस्थान. मृकंद मुनी व माता मरुध्वती देवी पुत्रप्राप्तीसाठी नारद मुनींच्या उपदेशानुसार, महादेव शंकरांची घोर तपश्चर्या करतात. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन, महादेव त्यांना पुत्रप्राप्तीचा वर देतात. मात्र वर देताना दीर्घायु लाभलेला पण दुष्ट, अधर्मी व कुरुप पुत्र की १६ वर्षांचा अल्पायु पण परोपकारी, धर्मपरायण,सुस्वरुप व त्रिखंडात कीर्तीमान सुपुत्र, यापैकी एक निवडण्यास सांगतात.

कालांतराने मृकंद मुनी व मरुध्वती देवीच्या पोटी अल्पायु मार्कंडेय यांचा जन्म होतो. एके दिवशी कश्यप ऋषी बाळ मार्कंडेयास ‘चिरंजीवी भव’असा आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद खरा होण्यासाठी, ब्रम्हदेवाच्या सांगण्यानुसार बाळ मार्कंडेय निर्जल, निराहार अशी महादेवांची  आराधना सुरु करतात. त्यांच्या वयाची १६ वर्षे पूर्ण होताच यमराज यमदूतांना बाल मार्कंडेयांचे प्राण हरण करण्यास पाठवितात. त्यात यमदूतांना अपयश येते. मग स्वतः यमराज रेड्यावर बसून नागपाशासह त्वरेने येतात. मात्र बाल मार्कंडेय श्री महामृत्युंजयाच्या जपात यमराजांकडे दुर्लक्ष करतात.

यमराजांनी अनेक वेळा दटावून ही मार्कंडेय तपापासून हटत नाहीत. त्यामुळे यमराज अति क्रोधीत होऊन मार्कंडेयावर यमपाश भिरकावतात. शिव नामात मग्न व महादेवांच्या पिंडीला आलिंगन दिलेल्या अवस्थेत मार्कंडेय व शिवलिंगावर यमराज यमपाश सोडतात. त्यामुळे महादेव अत्यंत क्रोधीत होऊन शिवलिंगातून प्रत्यक्ष प्रकट होऊन यमराजांना लत्ता प्रहाराने व त्रिशूल आघाताने बेशुद्ध करतात. रागावलेल्या महादेवांना ब्रम्हा, इंद्र आणि इतर देव शिवस्तुती करून शांत करतात. त्यानंतर महादेव यमराजांना समज देऊन मार्कंडेयास “तू सप्तकल्पांतपर्यंत अजरामर व चिरंजीवी होशील.” असा आशीर्वाद देतात अशी कथा आहे.

पायऱ्या चढून मंदिरात गेल्यावर छोटा सभामंडप आहे आणि त्यानंतर थोड्या उंचावर गाभारा आहे . आत गाभाऱ्याजवळ छोटासा संगमरवरी नंदी आहे. त्याच्यासमोर चबुतऱ्यावर मार्कंडेयांची मूर्ती गाभाऱ्यात आहे. पिंडीतून प्रकट झालेले हाती त्रिशूळ घेतलेले जटाधारी महादेव उभे आहेत आणि पिंडीला मार्कंडेय मिठी घालून करुणा भाकत आहेत, अशी ही ३ ते ४ फूट उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. विशेष म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला यमराजांची रेड्यावर बसलेली काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूच्या देव्हाऱ्यात मंदिर मालकांचे देव आहेत.

मंदिराचे संस्थापक-मालक कै .श्री. महादेव व्यंकटेश विद्वांस यांना इ. स. १८८५ मध्ये सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्याने निवृत्तीवेतन मिळू लागले. निवृत्ती वेतनातून खर्च वजा जाता शिल्लक रक्कम केवळ धर्मकायार्थ खर्च करण्याचा महादेवराव यांनी निश्चय केला. त्यानुसार वयाच्या ८५ व्या वर्षी, तत्कालिन शुक्रवार पेठ, घर क्र. ४/५ ही जागा खरेदी करुन त्या जागेवर सुंदर दगडी मंदिर बांधून मंदिरात मार्कंडेय व रेड्यासह यमराज अशा अत्यंत रेखीव, देखण्या व दुर्मिळ मूर्ती जयपूरहून आणून वैशाख शुद्ध पंचमी इ. स. १९०९ या सुमुहूर्तावर त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. व्यंकटेशरावांचे तैलचित्र मंदिरात लावलेले आहे.  हे मंदिर म्हणजे तिमजली गॅलरीयुक्त हवेली असून आतमध्ये शंभर माणसं बसतील एवढे ते आहे. हे मंदिर १००-१२५ वर्ष जून आहे.

संदर्भ:
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन

पत्ता :
https://goo.gl/maps/AzkiJBu98PuaGr7w6

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment